पाण्याचे दुर्भिक्ष्य, पीक देणाऱ्या जमिनीचा ऱ्हास आणि लोकसंख्येच्या विस्फोटामुळे अन्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यक्तिगणिक पाणी आणि जमीन दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे अन्न उत्पादनावर त्याचा परिणाम होत आहे. हे आव्हान पेलण्यासाठी संशोधक आणि शेतकरी यांच्यातील दरी भरून निघण्याची गरज आहे. त्यासाठी कृषीला व्यवसायाच्या रूपात पाहिला पाहिजे. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीबरोबरच उत्पादन वाढीसाठी त्यांना नवनवीन प्रयोग करण्यासाठी उद्युक्त करायला हवे, असे प्रतिपादन तेलंगणातील पाटनचेरू इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिटय़ूट फॉर सेमी अरिड ट्रॉपिक्सचे संचालक डॉ. सुहास वाणी यांनी केले.
डॉ. अशोक जुवारकर स्मृती व्याख्यान सीएसआयआर राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत (नीरी) आयोजित करण्यात आले. डॉ. सुहास वाणी यांनी हे स्मृती व्याख्यान गुंफले. एन्व्हार्नमेंटल जेनोमिक्स डिव्हिजनचे मुख्य वैज्ञानिक डॉ. हेमंत पुरोहित आणि संशोधन व विकास विभागाचे प्रमुख प्रकाश कुंभारे व्यासपीठावर उपस्थित होते. शेती करताना तंत्रज्ञानाचा वापर आणि बहुपीक पद्धतीवर भर देण्याचा सल्ला डॉ. वाणी यांनी दिला. संशोधकांनी शेतीविषयक ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले पाहिजे. अजूनही आपल्या देशात शेती करणे हा प्रतिष्ठेचा व्यवसाय समजला जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आपल्याला ग्रामीण भागाचा विकास करणे गरजेचे आहे. पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर करण्यात आपण कमी पडतो. पावसाच्या पाण्याचा योग्य वापर हे वर्तमानातील आव्हानांवर मात करण्यासाठी शेती व्यवसायात निरंतर प्रयत्नांची गरज आहे. डॉ. पुरोहित यांनी नैसर्गिक स्रोतांचा ऱ्हास आणि टाकावू जमिनीचे वाढते क्षेत्र याविषयी खंत व्यक्त केली.