सरकारकडून पोषण आहारासह इतर सुविधांचा पुरवठा होत असलेल्या पावणेतीन हजार अंगणवाडय़ांमध्ये तब्बल ६५ टक्के बालके गरहजर असल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्हय़ातील अंगणवाडय़ांमध्ये २ लाख ५० हजार ६८० बालकांची नोंद असून, त्यानुसार मदतनीस, कार्यकर्ती व पोषणआहार पुरवठा केला जातो. पूर्वसूचना देऊनही केवळ ३५ टक्के बालके आढळून आल्याने आरोग्य विभागाचे कर्मचारी चक्रावून गेले. बालकांची जास्तीची नोंद दाखवून पोषणआहार व इतर सुविधा लाटल्या जात असल्याचा संशय यामुळे बळावला आहे.
जिल्हय़ात २ हजार ४०६ मोठी अंगणवाडी केंद्रे व केवळ कार्यकर्ता असलेल्या ४७३ अंगणवाडय़ा आहेत. त्यातून २ लाख ५० हजार ६८० बालके असल्याची दप्तरी नोंद आहे. महिला व बालकल्याण विभागांतर्गत या अंगणवाडय़ांना सरकारकडून अनेक सुविधा पुरवल्या जातात. यात कार्यकर्ती, मदतनीस यांच्यासह पोषणआहार दिला जातो. या अंगणवाडय़ांमधील बालकांची आरोग्य तपासणीसाठी आरोग्य विभागाने विशेष मोहीम राबवली. पूर्वसूचना देऊन बालकांची तपासणी केली. जिल्हाभरातील पावणेतीन हजार अंगणवाडय़ांतून केवळ १५ हजार ४८९ बालकांची तपासणी करण्यात आली. पकी १० हजार ६७२ बालकांमध्ये विविध आजार आढळून आले. त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचार घेण्याबाबत कळविले आहे. मात्र, आरोग्य विभागाच्या तपासणीत धक्कादायक प्रकार समोर आला तो बालकांच्या उपस्थितीचा. बहुतांशी ठिकाणी बालके गरहजर असल्याचे सांगितले गेले. मात्र, पूर्वसूचना देऊनही आरोग्य तपासणीला ६५ टक्के बालके गरहजर राहिली कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाने या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अहवाल पाठविला.
सरकारकडून पोषणआहार व इतर सुविधा लाटण्यासाठी बालकांच्या उपस्थितीचा आकडा फुगवण्यात आला काय, अशी उघड चर्चा या बाबत होत आहे. यात जिल्हा ते तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांची साखळीच कार्यरत आहे. बनावट संख्या दाखवून हात धुवून घेणाऱ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणीही या निमित्ताने केली जात आहे.