राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पदव्युत्तर रसायनशास्त्र विभाग आणि कामठीचे एस.के. पोरवाल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ५ ते ७ फेब्रुवारीला हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये ‘फ्युचरिस्टिक मटेरिअल्स अ‍ॅण्ड इमर्जिग ट्रेण्डस इन फॉरेन्सिक अ‍ॅण्ड लाईफ सायन्सेस’ या विषयावर तीन दिवसांची आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे उद्घाटन सकाळी ९ वाजता कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा करणार असून नीरीचे संचालक डॉ. सतीश वटे समारोपीय कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील.
रसायनशास्त्र विभाग आणि पोरवाल महाविद्यालय यांच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ही परिषद घेण्यात येत असून इंडियन असोसिएशन ऑफ सॉलिड स्टेट केमिस्ट अ‍ॅण्ड अलाईड सायन्टिस्टस्चे (आयएससीएएस) अध्यक्ष एन.बी. सिंग यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या परिषदेत १९ आंतरराष्ट्रीय संशोधक, ४६ राष्ट्रीय दर्जाचे संशोधक आणि ५००च्यावर प्राध्यापक, संशोधक, ख्यातनाम व्यक्ती आणि उद्योजक प्रतिनिधी म्हणून सहभागी होतील. ही आंतरराष्ट्रीय परिषद अभ्यासकांना त्याची सर्जनशीलता, परिवर्तनशील कल्पना यांची अभिव्यक्ती करण्यासाठी आणि उच्च दर्जाच्या तज्ज्ञांनी प्रश्न व संशोधकीय ज्ञानाचे योगदान करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी व्यासपीठ मिळवून देईल.
स्थानिक आयोजन समिती या संदर्भात माहिती पुस्तिका प्रकाशित करणार आहे. देशातील आणि देशाबाहेरील जवळजवळ ५०० प्रतिनिधींची नोंदणी झाली असून नोंदणी बंद केल्याचे रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एच.डी. जुनेजा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. देशभरातून एकूण ४०० शोधनिबंधांचे सारांश प्रकाशनार्थ स्वीकारण्यात आले असून त्यापैकी २५० सारांश हे विदर्भातील आहेत. हे संशोधन मटेरिअल सायन्स, फॉरेन्सिक आणि लाईफ सायन्स इत्यादी विषयांतील होतकरू संशोधकांच्या सर्जनशील संशोधनकार्यावर प्रकाश टाकू शकतील, असा विश्वास संघटन सचिव डॉ. एस. एस. धोंडगे यांनी व्यक्त केला. जर्मनी, अमेरिका, नायजेरिया, कॅनडा, जपान, चीन आणि इटली या देशांतील शास्त्रज्ञ आणि संशोधक यांनी आमंत्रित वक्ते म्हणून या परिषदेचे निमंत्रण स्वीकारले.
भारतातील सीएसआयआर, नीरी, डीआरडीओ, राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा, खरगपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील संशोधक परिषदेत सहभागी होणार आहेत.