कांदिवलीचे ‘ठाकूर महाविद्यालय’ आणि ‘प्रभात चित्र मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोटरेकिनो’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन १७ आणि १८ जानेवारीला करण्यात आले आहे.   महोत्सवाची थीम ‘सिनेमा१०१’ ही असणार आहे.
यंदाचे महोत्सवाचे दुसरे वर्ष आहे. महाविद्यालयाच्या कांदिवली ठाकूर व्हिलेज येथील प्रांगणात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. लघुपट, जाहिरात पट, माहितीपट, म्युझिक व्हिडीओ, मूक पट आदींचा समावेश या महोत्सवात असेल. तरुणांना कलागुणांचे सादरीकरण करण्यास व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. विद्युत जामवाल, तिमांशू धुलिया, पियुष मिश्रा, मकरंद देशपांडे, रघू राम, अली असगर, निगार खान आणि दिलीप जोशी हे चित्रपट क्षेत्राशी संबंधित मांदियाळी या महोत्सवाचे आकर्षण असेल.‘आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणून कोटरेकिनो अगदीच नवा आहे. तरिही पहिल्याच वर्षी या महोत्सवाची छाप पाडण्यात आम्हाला यश आले होते. त्यावेळी यात तब्बल बाराशे विद्यार्थी सहभागी झाले होते. आमच्याकडे त्या वेळेस ऑस्ट्रेलिया, सिंगापूरहून विद्यार्थी सहभागी झाले होते.  यंदाही आमच्याकडे देशभरातून तसेच देशाबाहेरूनही विद्यार्थी सहभागी होत आहेत,’२ अशी प्रतिक्रिया वैशाली भारद्वाज या विद्यार्थिनीने दिली.