अटक केलेल्या चोरटय़ांच्या टोळीत पोलिसाचाही समावेश

चोऱ्या, दरोडे टाकणाऱ्या टोळीला एका पोलिसाचीच मदत असल्याचे शनिवारी उघडकीस आले. याप्रकरणी करवीर पोलिसांनी अप्पा उर्फ प्रकाश रामचंद्र पाटील (रा.पोलीस लाईन कसबा बावडा) या पोलिसाला अटक केली आहे.

चोऱ्या, दरोडे टाकणाऱ्या टोळीला एका पोलिसाचीच मदत असल्याचे शनिवारी उघडकीस आले. याप्रकरणी करवीर पोलिसांनी अप्पा उर्फ प्रकाश रामचंद्र पाटील (रा.पोलीस लाईन कसबा बावडा) या पोलिसाला अटक केली आहे. याचा प्रत्यक्ष चोऱ्या, दरोडय़ामध्ये कितपत सहभाग आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. भोगावती साखर कारखाना येथे २२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री चोरटय़ांनी तेथील एक बँक फोडण्याचा प्रयत्न केला. कारखान्याच्या पहारेकऱ्याच्या सावधगिरीमुळे चोरटय़ांचा दरोडय़ाचा प्रयत्न फसला होता. याप्रकरणी पोलिसांनी कांही चोरटय़ांना अटक केली होती. त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न चालविला होता. त्यामध्ये शनिवारी पोलिसांना एका पोलिसाचाच सहभाग असल्याची धक्कादायक माहिती उपलब्ध झाली. इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारा प्रकाश पाटील (बक्कल क्र.५५५) हा चोरटय़ांना चोऱ्या कोठे व कशा करायच्या याबाबतची गुप्त माहिती पुरवित होता. त्या आधारे चोरटे पुढचा कार्यभाग उरकत असून पाटील याने दिलेल्या माहितीनुसार चोरटय़ांनी पंधरा ठिकाणी दरोडे व चोऱ्यांचा प्रकार केला आहे. प्रत्यक्ष चोरी, दरोडय़ामध्ये प्रकाश पाटील याचा कितपत सहभाग आहे याचा शोध आता पोलिसांनी चालविला आहे. याप्रकरणी करवीर पोलिसांनी प्रकाश पाटील याला भारतीय दंडविधान कलम ४५७, ४५४, ३४०, ३६०, ५११ अन्वये अटक केली आहे. त्याला उद्या न्यायालयामध्ये दाखल केले जाणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Involved of police in arrest theft gang