गोंदिया जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजकुमार कुथे यांच्यासह इतर संचालकांवर कारभारात अनियमितता असून आर्थिक व्यवहारात गडबड झाल्याचा ठपका दुग्धविकास मंत्रालयाने ठेवला आहे. त्यामुळे व्याजासह एकूण ३ लाख ६ हजार २४७ रुपये संबंधितांकडून वसूल करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
याप्रकरणी प्राप्त माहितीनुसार २०१०-११ मधील ऑडिट रिपोर्टमध्ये उपनिबंधक (दुग्धव्यवसाय) यांनी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजकुमार कुथे, तसेच संचालक व माजी आमदार दयाराम कापगते, श्रीराम खरे, लक्ष्मण भगत, सूर्यभान टेंभुरकर, राजाराम लांजेवार, हितेश्वरी चौधरी, निशा राठोड, व्यवस्थापक कल्पना बोकडे आदींवर ठपका ठेवला होता. त्यात अध्यक्ष राजकुमार कुथे यांनी आपल्या मालकीच्या गाडीच्या नावावर १ लाख ३० हजार ३३२ रुपयांचे डिझेल बिल सादर करून ते पसे वसूल केले होते. तसेच इतर गाडय़ांसाठी १ लाख ७५ हजार ९१४.७९ रुपयांचे बिल वसूल केल्याबद्दल आक्षेप घेण्यात आला होता. उपनिबंधकांनी यानंतर ही रक्कम त्या संचालकांकडून वसूल करण्याचे आदेश दिले होते, परंतु अध्यक्ष राजकुमार कुथे यांनी त्यावर सहनिबंधकांकडून अपील केले. त्यांनी ते आक्षेप खारीज केल्यानंतर दूध संघाचे एक संचालक प्रेमकुमार जायसवाल यांनी दुग्धविकास मंत्रालयाकडे अपील करून दोषींवर कारवाईची मागणी केली होती. त्यावर दुग्धविकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी बिलाची वसुली करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.
या संदर्भात गोंदिया जिल्हा सहकारी दुग्ध संघाचे अध्यक्ष व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजकुमार कुथे यांना विचारणा केली असता याप्रकरणी ४ सप्टेंबरला सुनावणी होती, परंतु त्याचे पत्र मला उशिरा मिळाले. त्यामुळे मी जाऊ शकलो नाही. डिझेल किंवा प्रवासावर जो काही खर्च झालेला आहे तो संघाच्या कामासाठीच झालेला आहे.
मंत्रालयाने काय निर्णय दिला, याची मला कल्पना नसल्याचे ‘लोकसत्ता’शी बोलताना त्यांनी सांगितले.