मोठय़ा सिंचन प्रकल्पांतील घोटाळ्यांच्या पाश्र्वभूमीवर मोठय़ा प्रकल्पांऐवजी लघु सिंचन प्रकल्पच अधिक प्रभावी ठरू शकतात, असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गेल्या वर्षभरापासून व्यक्त करीत होते. दुष्काळात सिमेंट बंधाऱ्यांस मोठय़ा प्रमाणात निधी दिल्यानंतर काँग्रेस लघु सिंचनाच्या बाजूने, तर राष्ट्रवादी मोठय़ा सिंचन प्रकल्पांच्या बाजूने असे चित्र स्पष्ट दिसू लागले होते. या पाश्र्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्य़ातील वैजापूर येथे ७९ योजनांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.
जिल्ह्य़ात ७९ लघु सिंचन प्रकल्प नुकतेच पूर्ण झाले. त्यावर २ कोटी ४० लाख ४५ हजार निधी खर्च झाला. एक हजार ९९३ हेक्टर सिंचन होऊ शकेल, एवढा पाणीसाठा निर्माण झाल्याचा दावा जलसंपदा विभागाने केला. या प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वैजापूर तालुक्यातील भऊर येथे १३ जानेवारीला सकाळी १० वाजता आयोजित केले आहे.
जलसंधारण विभागाकडून जिल्ह्य़ात २५० हेक्टर सिंचन क्षमतेचे कोल्हापूर पद्धतीचे सिमेंट बंधारे प्रस्तावित करण्यात आले. पैकी ७९ योजना पूर्ण झाल्या. या प्रकल्पांमध्ये ९ दलघमी पाणीसाठा निर्माण झाला. कमी वेळेत हे प्रकल्प बांधून पूर्ण होत असल्याने त्याचे फायदे तात्काळ दिसून येत आहेत. या योजनांमुळे सिंचन क्षमतेत वाढ होत असल्याने शेतकऱ्यांकडून या स्वरुपाच्या कामांची मागणी होत असल्याचा उल्लेखही अधिकारी आवर्जून करतात. सरकारच्या या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमामुळे कृषी उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. पर्यायाने सिंचनही वाढेल, असे जलसंधारण विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.