विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात सर्वत्र पाचपेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असल्याने यावेळी मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी जनतेमध्ये असलेली नाराजी पाहता हे शक्य होईल काय, हा प्रश्न राजकीय मंडळींना सतावत आहे. लोकसभा निवडणुकीत मतदार स्वत:हून मतदानासाठी घराबाहेर पडत असल्याचे चित्र होते. सकाळपासून दिसणारी ही परिस्थिती दिवसभर कायम होती. त्यामुळेच जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघांत १२ ते १५ टक्क्यांपर्यंत अधिक मतदान झाले होते. या पाश्र्वभूमीवर विधानसभा निवडणुकीतही मतदानाच्या टक्केवारीचा हा ओघ कायम राहण्यासाठी निवडणूक आयोग, प्रशासन, विविध संस्था व संघटना यांच्या वतीने मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. त्याचे प्रतिबिंब मतदानाच्या दिवशी उमटावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाच्या टक्केवारीत वाढ होणे आवश्यक असल्याने यावेळी निवडणूक आयोग आणि प्रशासनाच्या वतीने विशेष प्रयत्न करावे लागले. ठिकठिकाणी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना तर थेट सामूहिक शपथ देण्याचे उपक्रम राबविण्यात आले. ही मोहीम ग्रामीण भागातही पोहोचली. विद्यार्थ्यांना सोबत घेऊन गावागावांत जनजागृती फेरी काढण्यात आली. अगदी मतदानाच्या पूर्वसंध्येपर्यंत जनजागृतीसाठी जे जे शक्य आहे ते सर्व यंत्रणेकडून करण्यात आले. लोकसभेच्या अलीकडेच झालेल्या मतदानात टक्केवारी ६०च्या पुढे गेल्याने विधानसभा निवडणुकीत ती ६५ टक्क्यांपुढे जाण्याची आशा निवडणूक यंत्रणेस आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या मतदान केंद्रांवर कमी मतदानाची नोंद झाली होती. अशा केंद्रांवर मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी विशेष लक्ष देण्यात आले. त्यातच यावेळी प्रत्येक मतदारसंघात प्रमुख पक्षांचे किमान पाच उमेदवार रिंगणात असल्याने मतदानाच्या टक्केवारीत वाढ होऊ शकेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
असे असले तरी निवडणूक प्रचारादरम्यान राजकीय नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना जनतेमध्ये असलेली नाराजी स्पष्टपणे दिसून आल्याने मतदानाच्या दिवशी मतदार किती प्रमाणात घराबाहेर पडेल, याविषयी त्यांच्यामध्ये साशंकता आहे. प्रचाराची घसरलेली पातळी, आपल्या योजनांची मांडणी करण्याऐवजी प्रतिस्पर्धी नेत्यांवर आरोप करण्याचे प्रकार, जनतेसमोरील प्रश्न सोडविण्यासाठी काय करणार हे सांगण्याऐवजी आपल्या पक्षावर कसा अन्याय झाला याचे रडगाणे, या गोष्टींमुळे मतदारांमध्ये सर्वच राजकीय पक्षांविषयी असंतोषाचे वातावरण आहे. त्यातच ऐन दिवाळीच्या उंबरठय़ावर निवडणूक होत असल्याने दिवाळीच्या तयारीत मग्न असलेल्या मतदारांना केंद्रापर्यंत आणणे हे राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी एक दिव्यच ठरणार आहे. प्रत्येक उमेदवाराने आपल्यास अनुकूल असलेल्या भागातून अधिकाधिक मतदारांना मतदानासाठी प्रेरित केल्यास त्याचा परिणाम मतदानाची टक्केवारी वाढण्यात होऊ शकेल, असा दावा करण्यात येत आहे. निवडणूक यंत्रणेने मतदान याद्यांमधील घोळ दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले असले तरी मतदार चिठ्ठय़ा घरोघरी पोहोचविण्यात आलेल्या विविध प्रकारच्या अडथळ्यांचा विचार करता मतदानाच्या दिवशी अनेकांना केवळ आपले नाव कोणत्या केंद्रात आहे, याची माहिती मिळू न शकल्याने मतदानापासून वंचित राहावे लागेल की काय, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीप्रसंगी हजारोंच्या संख्येने मतदारांची नावे याद्यांमधूनच गायब असल्याचे दिसून आले होते. अन्यथा लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कितीतरी अधिक वाढली असती असे म्हटले जाते. विधानसभेसाठी मतदानाच्या दिवशी अशा प्रकारचे अडथळे निर्माण न झाल्यास टक्केवारी वाढू शकेल, असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.