जालन्यात अतिवृष्टीग्रस्तांची सव्वाकोटीची प्रतीक्षा कायम!

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून ३ कोटी १२ लाखांचे अर्थसाह्य़ देण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने पाठविला. प्रत्यक्षात यापैकी १ कोटी ९१ लाख रुपयेच प्राप्त झाले. एक कोटी २१ लाख रुपये अनुदानाची प्रतीक्षा कायम आहे.

गेल्या जून-जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे जिल्ह्य़ातील परतूर, मंठा तालुक्यात ९६ गावांमध्ये पिकांना मोठय़ा प्रमाणात फटका बसला. दोन्ही तालुक्यांमधील जवळपास साडेसात हजार शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून ३ कोटी १२ लाखांचे अर्थसाह्य़ देण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने पाठविला. प्रत्यक्षात यापैकी १ कोटी ९१ लाख रुपयेच प्राप्त झाले. एक कोटी २१ लाख रुपये अनुदानाची प्रतीक्षा कायम आहे.
मदत व पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या नुकत्याच झालेल्या जिल्हा दौऱ्याच्या निमित्ताने ही बाब समोर आली. परतूरचे आमदार सुरेश जेथलिया यांनी कदम यांची भेट घेऊन या संदर्भात लक्ष वेधले होते. परतूर व मंठा तालुक्यात अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रश्न विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना, औचित्याद्वारे उपस्थित केला होता. विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या धर्तीवर परतूर व मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी आमदार जेथलिया यांनी केली होती.
मंत्री कदम यांनी जिल्ह्य़ात मागील दुष्काळी स्थितीत सरकारकडून प्राप्त झालेल्या मदतीची माहिती जिल्हाधिकारी श्याम देशपांडे यांच्याकडून घेतली. दुष्काळी स्थिती व त्यानंतर अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्य़ात ८ अब्ज २४ कोटींचे अर्थसाह्य़ सरकारकडून आले असल्याचे या वेळी सांगण्यात आले. गेल्या वर्षी दुष्काळात जिल्ह्य़ात पाणीपुरवठा, गुरांच्या छावण्या, रोजगार हमी, साखळी सिमेंट बंधारे, पीक अनुदान, पीक विमा आदी अनेक बाबींसंदर्भात सरकारने जिल्ह्य़ास भरीव मदत केल्याचे कदम यांनी सांगितले. परंतु गेल्या जून-जुलैमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना द्यावयाच्या मदतीपैकी अपेक्षित निधीतील १ कोटी २१ लाख रुपयांची प्रतीक्षा जिल्ह्य़ात कायम असल्याचे स्पष्ट झाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Jalana waiting for 1 25 crore funds