महापालिकेच्या डोक्यावरील कर्जाचा प्रचंड बोजा कमी करण्याच्या उद्देशातून कर्जफेड हा एक कलमी कार्यक्रम राबविणाऱ्या प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनाकडेही दुर्लक्ष केले जात असल्याने कामगार संघटनेने संपाचा इशारा दिला आहे.
शहीद भगतसिंग जळगाव महापालिका कामगार संघटनेने थकित वेतनासाठी आयुक्त संजय कापडणीस यांना निवेदन दिले आहे. कामगारांना वेठीस धरले जात असल्याबद्दल निवेदनात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. १६ मे २०१३ रोजी कापडणीस यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. तेव्हापासून त्यांची कार्यप्रणाली उल्लेखनीय असल्याचेही कामगार संघटनेने नमूद केले आहे. तथापि, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्तीवेतन देण्यात मात्र नियमांची पायमल्ली केली जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. महापालिकेवर कर्जाचा डोंगर असल्याने आवक कमी आणि कर्जाचे हप्ते अधिक असा प्रकार दर्शविण्यात येत आहे. पण खरोखरच तशी स्थिती आहे काय, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. वेतन व सेवानिवृत्ती वेतन प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत देण्यात यावे अशी संघटनेने मागणी केली आहे. त्यासाठी पाच फेब्रुवारीपासून साखळी उपोषण व बेमुदत संप पुकारण्याचा इशाराही दिला आहे.