जगभरातून मस्कुलर डिस्ट्रॉफी बाधितांमध्ये प्रथम व एकमेव अभियंता (बी.ई.) बनणाऱ्या जयराज सरमुकद्दम या नागपुरातील तरुणाच्या विक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली आहे.
वयाच्या दहाव्या अकराव्या वर्षांपासून व्हिल चेअरवर असलेल्या नागपूरच्या जयराज मुकुंद सरमुकद्दम या विद्यार्थ्यांने दुर्धर व असाध्य अशा डय़ुशेन मस्कुलर डिस्ट्रॉफीग्रस्तांमध्ये संपूर्ण विश्वातील प्रथम पदवीधारक अभियंता होण्याचा सन्मान पटकाविला आहे. त्याला जी.एच. रायसोनी कॉलेजमधून बी.ई. मध्ये ७२ टक्के तर शासकीय तंत्रनिकेतमध्ये ७० टक्के गुण प्राप्त झाले आहेत. दहावीच्या परीक्षेतही त्याला ८२ टक्के गुण मिळाले होते. सध्या तो परसिस्टंट सिस्टम येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर या पदावर कार्यरत आहे.
जयराज वयाच्या आठव्या वर्षांपर्यंत धावत खेळत होता. नंतर हळूहळू चालणे मंदावत त्याला दहाव्या अकराव्या वर्षी व्हिल चेअर्सचे सहाय्य घ्यावे लागले. मस्कुलर डिस्ट्रॉफी या जणुकीय आजारात संपूर्ण शरीरातील स्नायूंच्या पेशी व तंतू चेतनाहीन होत जातात. ज्याचा परिणाम सर्वप्रथम पायांवर होतो. नंतर हात निकामी होऊन उठणे बसणेही अशक्य होते. त्यामुळे अशा मुलांचे शिक्षण दुरापास्त असते. जयराजचीही हीच अवस्था असूनही त्याने जिद्दीने लेखनिकाची मदत न घेता स्वत: उत्तरपत्रिका, जर्नलबुक, स्वाध्याय, प्रात्याक्षिक पुस्तिका लिहून खडतर परिश्रमांसह हे अभूतपूर्व यश संपादन केले. जयराज संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान असल्याचे मत लिम्का बुकने व्यक्त केले आहे.
काय करू शकत नाही यापेक्षा आपण काय करू शकतो याकडे लक्ष केंद्रित करून तसेच आपले उद्दिष्ट ठरवून त्यासाठी निग्रह, संयम, चिकाटी व कष्ट केल्याने यश मिळाले, असे जयराज सांगतो. जयराजसाठी सोपे काहीच नव्हते, पण त्याच्या ध्येयाला अशक्य न मानल्याने व जीवनात सदोदित सकारात्मक दृष्टिकोन बाळगल्याने मार्ग सुलभ झाला, असे जयराजचे वडील मुकुंद सरमुकद्दम यांचे मत आहे.
जयराज आपल्या यशाचे श्रेय जगप्रसिद्ध क्रिकेट खेळाडू सचिन तेंडूलकर, माजी कसोटीपटू प्रशांत वैद्य, सोमलवार सर, सुनील रायसोनी व परसिस्टंट सिस्टिमचे प्रमुख समीर बेंद्रे यांना देतो.