साडेपाच लाख रुपयांचे दागिने तिघा चोरटय़ांनी केले लंपास

देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबीयांना मारहाण करून दोन महिलांकडील सुमारे साडेपाच लाख रुपयांचे दागिने तिघा चोरटय़ांनी लंपास केले. हा प्रकार जैन तीर्थक्षेत्र असलेल्या कुंथुगिरी येथे शुक्रवारी दुपारी घडला.

देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबीयांना मारहाण करून दोन महिलांकडील सुमारे साडेपाच लाख रुपयांचे दागिने तिघा चोरटय़ांनी लंपास केले. हा प्रकार जैन तीर्थक्षेत्र असलेल्या कुंथुगिरी येथे शुक्रवारी दुपारी घडला. याबाबत हातकणंगले पोलीस ठाण्यामध्ये लक्ष्मण अजित हुंडेकरी (रा.नागाळा पार्क, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे.     
लक्ष्मण हुंडेकरी हे व्यापारी आहेत. ते त्यांच्या मारूती अल्टो मोटारीतून (एम.एच.०९-सी.एम.-५८१०) हातकणंगलेजवळील कुंथुगिरी येथे देवदर्शनाला गेले होते. या तीर्थक्षेत्री चोवीस तीर्थंकरांच्या मूर्ती आहेत. प्रति संमेदशिखरजी म्हणून या स्थानाला ओळखले जाते. मंदिराकडे जाणारा रस्ता विचारण्यासाठी हुंडेकरी हे रस्त्यात थांबले. त्यांनी दुचाकीवरून चाललेल्या एका व्यक्तीकडे रस्त्याची विचारणा केली. त्याचवेळी आणखी एका दुचाकीवरून दोघेजण तेथे पोहोचले. त्या तिघांनी मोटारीतून प्रवास करणाऱ्या लोकांना काठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. चोरटय़ांनी महिलांच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने काढून घेऊन पळ काढला.     या प्रकाराबद्दल हुंडेकरी यांनी हातकणंगले पोलिसांशी संपर्क साधला. चोरटय़ांनी सुमारे साडेपाच लाख रुपयांचे दागिने पळविल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यामध्ये पावणेदोन लाख रुपये किमतीचे गंठण, पावणे दोन लाख रुपये किमतीची कर्णफुले, २५ हजार रुपये किमतीची अंगठी, ३५ हजार रुपये किमतीचे गंठण, सात हजार रुपयांची कर्णफुले, सात हजार रुपयांची अंगठी, सव्वा लाख रुपये किमतीचे गंठण, १० हजार रुपये किमतीच्या कानातील सोन्याच्या रिंग या दागिन्यांचा समावेश आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Jwelley of rs 5 50 lakh stolen