कल्याण-डोंबिवली, टिटवाळा, विठ्ठलवाडी, शहाड रेल्वे स्थानकांभोवती फेरीवाल्यांचा वेढा पडला असून प्रवाशांना या परिसरातून चालणेही अवघड झाले आहे. रेल्वे पोलीस तसेच महापालिकेचे कर्मचारी या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यास असमर्थ ठरत असून विभाग कार्यालयांचे अर्थकारण त्यास जबाबदार असल्याचा आरोप नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला.
डोंबिवलीतील रामनगर विभागाच्या नगरसेविका कोमल पाटील यांनी फेरीवाल्यांचा विषय सर्वसाधारण सभेत उपस्थित केला. रामनगर प्रभाग डोंबिवली रेल्वे स्थानक भागात येतो. या भागातील पदपथ, रस्ते फेरीवाल्यांनी वेढले आहेत. केळकर रस्ता, कामत मेडिकल पदपथ, पाटकर रस्ता, रॉथ रस्त्यावर, पदपथावर दुतर्फा फेरीवाले बसलेले असतात. महापालिकेच्या ‘ग’ प्रभागाचे अधिकारी चंदुलाल पारचे यांच्याकडून या फेरीवाल्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशी टीका नगरसेविका कोमल पाटील यांनी केली.
महापालिकेच्या सातही प्रभागांमधील फेरीवाला हटाव पथकात १५ वर्षांपासून ठरावीक कर्मचारी काम करीत आहेत. त्यांची कोठेही बदली केली जात नाही. हे कर्मचारी फेरीवाल्यांकडून ४० रुपये, पदपथावर साहित्य ठेवणाऱ्या दुकानदाराकडून २०० रुपये वसूल करतात, असा आरोप नगरसेवक उदय रसाळ यांनी केला.
अनेक महापालिका कर्मचारी आपल्या फावल्या वेळेत डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या स्कायवॉकवर डबे विक्रीचा व्यवसाय करतात. महापालिकेत प्रभाग कार्यालयापासून मुख्यालयापर्यंत फेरीवाल्यांना संरक्षण पुरविणारी एक टोळी गेल्या काही वर्षांपासून सक्रिय झाली असून आयुक्तांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. जोपर्यंत या ‘टोळीतील’ कर्मचाऱ्यांच्या विविध विभागात बदल्या केल्या जात नाहीत, तोपर्यंत फेरीवाल्यांचा बंदोबस्त अशक्य असल्याचे हर्षद पाटील, सुनील वायले या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत सांगितले.
नवीन विकसित होत असलेल्या खडकपाडा, कल्याण पूर्व, संत नामदेव पथ, पाथर्ली भागाला या फेरीवाल्यांचा उपद्रव होत असल्याचे नगरसेवकांनी निदर्शनास आणले. येत्या चार दिवसात या फेरीवाल्यांचा बंदोबस्त केला जाईल. ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांच्या फेरीवाला हटाव विभागातून बदल्या केल्या जातील असे आश्वासन आयुक्त शंकर भिसे यांनी सभागृहाला दिले.