कल्याण परिसरातील रिक्षा चालकांच्या मुजोरीने आता टोक गाठले असून शहरातील वेगवेगळ्या भागात वाटेल त्या पद्धतीने भाडेदरांची आकारणी सुरू असल्याने प्रवाशी हैराण झाले आहेत. रेल्वे स्थानकापासून शहरातील वेगवेगळ्या भागात जाण्यासाठी मनमानेल त्यापद्धतीने भाडेआकारणी सुरू आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून अशा मुजोर रिक्षाचालकांविरोधात यापूर्वी मोहीम राबविण्यात आली आहे, तरीही प्रवाशांची लूट अद्याप थांबलेली नाही.
कल्याणमध्ये मीटरप्रमाणे भाडे आकारले जात नाही. शहरातील रिक्षा प्रवासासाठी मीटर पद्धतीचा अवलंब करावा, असा नियम आहे. मात्र, या नियमाची सर्रासपणे पायमल्ली केली जाते. मीटरऐवजी शेअरप्रमाणे भाडे आकारण्याची येथे पद्धत आहे. रिक्षा चालक-मालक संघटनेने उपप्रादेशिक परिवहन विभागाशी सल्लामसलत करून शेअरिंगचे दर निश्चित केले आहेत. या आखलेल्या दराप्रमाणेच रिक्षा चालकांनी भाडे आकारणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात तसे होताना
दिसत नाही.
दरम्यान, निश्चित केलेल्या दराप्रमाणेच प्रवाशांनी भाडे द्यावे व रिक्षाचालकांनी अतिरिक्त भाडे आकारू नये. तसेच अनुचित प्रकार घडत असल्यास त्यांनी आमच्याकडे तक्रार करावी” अशी माहिती रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी दिली.

वाट्टेल ते भाडे
कल्याणातील टिळक चौक ते कल्याण रेल्वे स्थानक- ८ रुपये, लाल चौकी ते कल्याण रेल्वे स्थानक- १०रूपये , कल्याण रेल्वे स्थानक ते खडकपाडा- १२रूपये, कल्याण रेल्वे स्थानक ते बेतुरकरपाडा १०रूपये असे रिक्षा भाडे निश्चित करण्यात आले आहे. मात्र, या दरांचे रिक्षा चालकांकडून पालन होताना दिसत नाही. प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे घेतले जातात.