कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील ४० टक्के बसचालक दररोज गैरहजर राहत असल्याने आगारातून बस गाडय़ा काढणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रवाशांना नियमितपणे सेवा देणे परिवहन उपक्रमाला अवघड झाले आहे. बस जागीच उभ्या राहात असल्याने प्रवासी वाहतुकीतून मिळणारे दररोजचे हजारो रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. दांडी बहाद्दरांमुळे उपक्रम दिवसेंदिवस आर्थिक संकटात चालला असल्याची माहिती परिवहन समितीच्या बैठकीत उघडकीला आली आहे.
डिझेल दरवाढीचे कारण देत परिवहन प्रशासनाने प्रवासी तिकीट दरवाढीचा प्रस्ताव परिवहन समितीत मंजुरीसाठी आणला होता. यावेळी झालेल्या चर्चेच्यावेळी प्रशासनाने उपक्रमातील चालकांची अनुपस्थिती, त्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीचा पाढा सदस्यांसमोर वाचला. उपक्रमात सुमारे २७५ ते ३०० चालक आहेत. बहुतांशी चालक अन्य उपक्रम, खासगी सेवांमध्ये नोकरी करीत आहेत. चालक नसल्याने बस जागीच उभ्या राहत आहेत. परिवहन उपक्रम आर्थिक आघाडीवर खिळखिळा झाला आहे. पगार वेळेवर मिळत नाही. बहुतांश बस भंगार झाल्या आहेत. नवीन बस उपक्रमात आल्या तरी त्या तांत्रिकदृष्टय़ा कमकुवत आहेत. कल्याण परिवहन उपक्रमात हक्काची नोकरी असल्याने तेथूनही हक्काचा पगार आणि खासगी नोकरी केल्याने तेथील पगार असा मिळून एक बस चालक दरमहा दोन्ही ठिकाणी नोकरी करून ३५ ते ४० हजार रुपये कमाई करीत असल्याचे उपक्रमातील एका विश्वसनीय सूत्राने सांगितले. उपक्रमामध्ये नगरसेवक प्रकाश पेणकर, बाळ हरदास यांच्या कर्मचारी संघटना आहेत. बहुतांशी कर्मचारी या मामा (बाळ हरदास)-भाच्यांच्या(प्रकाश) संघटनांचे सदस्य आहेत. चालक, वाहक, कार्यशाळेतील कामगार नेतेपणा करण्यात संघटनेतील कर्मचारी जागोजागी अग्रभागी असतात. त्यामुळे संघटनेचा रोष नको म्हणून कर्मचाऱ्यांच्या अनागोंदीकडे नेहमीच पाठ फिरवते. परिवहन उपक्रमात अनागोंदी माजली असून बस चालक अनुपस्थितीत त्यामधील हा एक भाग असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. अशीच परिस्थिती वाहक, कार्यशाळांमध्ये आहे, असे सूत्राने सांगितले.
भाडेवाढ नाकारली
उपक्रमाच्या भाडेवाढीच्या प्रस्तावातील अनेक त्रृटी दाखवत सदस्यांनी भाडेवाढीचा प्रस्ताव फेटाळून लावला.
१२ किमीपुढील टप्प्यासाठी १ रुपया व २० किमीच्या पुढील प्रवासासाठी २ रुपये दरवाढ सूचित करण्यात आली होती. ठाणे, नवी मुंबई उपक्रमांच्या तुलनेत केडीएमटी प्रशासन लांब पल्ल्याच्या प्रवासाठी वाढीव दर आकारत आहे. पहिल्या तीन टप्प्यांसाठी प्रशासनाने १ ते ३ रुपये कमी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे प्रशासन एकीकडे प्रवासी घटतात म्हणून दरवाढ कमी करण्याची मागणी करते तर दुसरीकडे लांब पल्ल्याच्या प्रवासाठी तिकीट दरवाढ करण्याची मागणी करते, अशी टीका करीत सदस्यांनी भाडेवाढीचा प्रस्ताव फेटाळून लावला. आतापर्यंत केडीएमटीने केलेल्या भाडेवाढीमुळे उपक्रमाच्या बसमधून प्रवास करणारे सुमारे ५० हजारांहून अधिक प्रवासी घटले आहेत. रिक्षा आणि केडीएमटीचे भाडे सारखेच असल्याने प्रवासी रिक्षेला सर्वाधिक प्राधान्य देतात.
संग्रहित लेख, दिनांक 13th Feb 2014 रोजी प्रकाशित
दांडीबहाद्दर चालकांमुळे ‘केडीएमटी’ खड्डय़ात
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील ४० टक्के बसचालक दररोज गैरहजर राहत असल्याने आगारातून बस गाडय़ा काढणे शक्य होत नाही.
First published on: 13-02-2014 at 12:35 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kdmt suffers huge loss