किन्ही (ता. पारनेर) येथील कामगार तलाठी राजाराम बबन भांड यास आज ६ हजार रुपयांची लाच घेताना नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. यासंदर्भात अनिल भाऊसाहेब तांबडे (रा. तिखोल, पारनेर) यांनी विभागाकडे तक्रार केली होती.
तांबडे यांच्या तिखोल येथील गट क्र. १९४, १९९, ५२३ व १४५ चे न्यायालयाच्या आदेशानुसार खातेफोड करून, त्यांचा भाऊ व आई यांची नावे महसूल रजिस्टरला लावून, सुधारित सात-बारा उतारा मिळण्याची मागणी केली होती. परंतु कामगार तलाठी भांड याने त्यासाठी तांबडे यांच्याकडे ६ हजार रु. लाचेची मागणी केली. तांबडे यांच्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक राजेंद्र माळी, हवालदार राजेंद्र खोंडे, प्रमोद जरे, रवींद्र पांडे, श्रीपादसिंह ठाकूर, दशरथ साळवे यांच्या पथकाने तलाठी कार्यालयातच आज दुपारी सव्वा वाजता तांबडे यांच्याकडून लाच घेताना भांडला पकडले. भांडविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.