जानेवारी महिन्यापासून सुरू झालेला कोकणातील हापूस आंब्याचा मोसम आता संपुष्टात आला असून, गेल्या सहा महिन्यांत सुमारे बारा लाख हापूस आंब्याच्या पेटय़ा तुर्भे येथील एपीएमसीच्या फळबाजारात आल्याची नोंद आहे. त्यामुळे कोकणातील फळाच्या राजाने अलविदा केले असून, आता फळबाजाराचा ताबा पश्चिम महाराष्ट्रातील जुन्नर तालुक्यातील हापूस आंब्याने घेतला आहे. जाड सालीचा हा आंबा चवीला खूपच गोड असून दिवसाला बाजारात १५ हजार पेटय़ा येत आहेत. या आंब्याबरोबरच गुजरातमधील केसर, राजापुरी आंब्यांची रेलचल असून लवकरच उत्तर प्रदेशातील दशेहरा, लंगडा आणि चौसा आंबा बाजारात पिंगा घालणार आहे.

 अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे यावर्षी कोकणातील हापूस आंब्याचे गणितच कोलमडून गेले आहे. तरीही वाढत्या आंबा लागवडीमुळे बारा लाख हापूस आंब्याच्या पेटय़ा आल्याचे समजते. ही आवक गतवर्षीपेक्षा ४० टक्के आहे. त्यामुळे यावर्षी आवक कमी आणि दर जास्त अशी स्थिती फळबाजाराची होती. कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम जूनच्या पहिल्या आठवडय़ात आता संपुष्टात आला असून, फळबाजाराचा ताबा जून्नरच्या हापूस आंब्याने घेतला आहे. शिवनेरीच्या पायथ्याशी असणाऱ्या मावळ पट्टय़ात अलीकडे येथील शेतकऱ्यांनी हापूस आंब्याची लागवड मोठय़ा प्रमाणात केली असून, पाच-दहा हापूस आंब्याची झाडे असलेल्या बागायतदारांकडे आता हापूस आंब्याच्या बागा तयार झाल्या आहेत.

कोकणातील मातीशी व वातावरणाशी साम्य असलेल्या या भागात आता हापूस आंब्याची लागवड चांगली होत असून, लहरी पावसामुळे इतर पिकांपेक्षा येथील शेतकऱ्यांनी हापूस आंब्याची लागवड करण्यास प्राधान्य दिले आहे. कोकणातील हापूस आंबा पाऊस पडला की काळवंडतो किंवा त्यावर अ‍ॅन्थ्रेक्ससारख्या रोगांचा प्रादुभाव जडतो, मात्र मावळ पट्टय़ातील हापूस आंब्याला पाऊस पडला की वेगळीच गोडी आणि चकाकी येत असल्याचे येथील बागायतदारांचे मत आहे.

कालपरवापर्यंत केवळ शेताच्या बांधावर पाच-सहा हापूस आंब्याची झाडे लावून हौस भागवणाऱ्या येणेरे गावातील बाजीराव जगन्नाथ ढोले यांनी चक्क १७ झाडांवर मोसमात साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळविण्याची किमया केली आहे. त्यामुळे या भागात आता हापूस आंब्याची लागवड हेच एक लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सध्या या आंब्याच्या दीड व साडेतीन डझनाच्या १५ हजार पेटय़ा येत आहेत. हापूस आंब्याच्या लागवडीचे उत्पन्न पाहता येत्या काळात ही संख्या वाढून ५० हजाराच्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणातील हापूस आंब्याला खरे आव्हान ठरणार आहे. जुन्नरी हापूस आंब्याच्या मोसमाबरोबरच आता गुजरातचा केसर व राजापुरी काही प्रमाणात बाजारात येत असून, उत्तर प्रदेशातील लंगडा, दशेहरा आणि चौसा या आंब्याची ऑगस्ट महिन्यापर्यंत रेलचल राहणार आहे. सर्वसाधारपणे पाऊस पडला की खवय्ये हापूस आंबा खाणे थांबवत असल्याचे दिसून येते. मात्र, हे आंबे खाणारा एक वेगळा वर्ग आहे. 

हापूस जुन्नरी नावानेच विकण्याचा आग्रह

कोकणातील हापूस आंब्याने फळ बाजाराला अलविदा केल्यानंतर तात्काळ सुरू झालेला जुन्नरी हापूस आंबा दिसायला कोकणातील हापूस आंब्यासारखाच आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेते तो कोकणातील हापूस आंबा म्हणून विकत आहेत. ते जुन्नरच्या बागायतदारांना मंजूर नसून हा हापूस जुन्नरी ब्रँडनेच विकला जावा अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यासाठी ग्राहकांनी हापूस आंब्याची खात्री करून घ्यावी. हा आंबा आकाराला थोडा मोठा, जाड सालीचा व चवीला साखरेपेक्षा गोड असल्याचे आंबा व्यापारी संजय पानसरे यांनी सांगितले आहे.