कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींची मंगळवारी प्रदीर्घ बैठक होऊनही त्यामध्ये ऊस दराच्या प्रश्नावर निर्णय होऊ शकला नाही. रविवारी व्यापक बैठक घेऊन सर्वमान्य ऊसदर घोषित करण्यात येईल असे बैठकीअंती पत्रकारांना सांगण्यात आले.
ऊस दराचे आंदोलन उग्र होत चालले आहे. दोन दिवसापूर्वी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनीही कारखाना पातळीवर ऊसदर निश्चित व्हावा अशा सूचना त्यांना भेटलेले आमदार महादेवराव महाडिक यांना केली होती. त्यानुसार ज्येष्ठ आमदार डॉ. सा.रे. पाटील, आमदार महादेवराव महाडिक यांच्या पुढाकाराने आज साखर कारखाना प्रतिनिधींची प्रदीर्घ बैठक झाली. त्या चर्चेत जवाहरचे संचालक माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार के. पी. पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर, शाहू कारखान्याचे एस. के. मगदूम, राजाराम पी. डी. मेढे, आजराचे अमरसिंह पवार यांच्यासह दालमिया व रेणुकाचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वाची मते ऐकून घेण्यात आली. मात्र त्यावर एकमत झाले नाही. त्यामुळे पुन्हा रविवारी बैठक घेऊन निर्णय जाहीर करण्याचे ठरले. तत्पूर्वी मुख्यमंत्री, सहकारमंत्री यांच्यासह बँक प्रतिनिधींची भेट घेऊन चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. ऊसदराची कोंडी फुटली नसली तरी या बैठकीमुळे तोडगा काहीसा दृष्टिक्षेपात आला आहे.