कृषिमंत्री शरद पवार यांच्या श्रीरामपूर दौ-याच्या पार्श्र्वभूमीवर पक्षात महत्त्व वाढविण्यासाठीच शंकरराव कोल्हे यांनी मराठवाडय़ात स्वत:च पुतळे जाळून घेण्याचा प्रयोग केला. मात्र पवार यांनी त्याची दखल तर घेतली नाहीच, शिवाय भाषणात मराठवाडा हा आपला बंधू असून त्यांना पाणी द्यावेच लागेल, अशी पक्षाची भूमिका जाहीर केल्याने कोल्हे यांचा प्रयत्न अयशस्वी झाल्याची टीका आमदार अशोकराव काळे यांनी केली आहे.
शिवसेनेच्या खासदार, आमदारांनी जायकवाडीला पाणी नेले असे कोल्हेंचे मत आहे. मग शासन नेमके कोणाचे, शासनाचे मंत्री शिवसेना खासदार आमदारांचे ऐकतात का, असा सवाल काळे यांनी केला. ते म्हणाले, आघाडी सरकारनेच जायकवाडीला पाणी सोडले असतानाही शिवसेनेच्या आमदार, खासदारांवर खापर फोडून कोल्हे वैफल्याचेच दर्शन घडवत आहेत. त्यांनी आयुष्यभर पाणीप्रश्नाचे राजकारण केल्यानेच गोदावरी कालव्याचे लाभक्षेत्र उद्ध्वस्त झाले. कोल्हेंनी पक्ष सोडण्याची धमकी देऊन दोनदा रास्ता रोको आंदोलन केले. शिवाय जायकवाडीला पाणी सोडले म्हणून राष्ट्रवादीच्याच मंत्र्यावर टीका केली. यावर जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी ज्येष्ठ नेते कोल्हे यांना विचारूनच मराठवाडय़ाला पाणी सोडल्याचे सांगितल्याने सगळय़ांनाच धक्का बसला होता. मुलाला आमदार करण्यासाठी ते कोणत्याही पातळीवर जाऊ शकतात याची खात्री पटली आहे. स्वत:चेच पुतळे जाळून सवंग लोकप्रियता मिळविणे हा त्याचाच एक भाग असून, शिवसेना पक्षाचे खासदार व आमदारांचे नाव घेऊन मतांसाठी शिवसेना पक्षाला बदनाम करून मतांसाठी केलेला हा प्रयत्न हास्यास्पद असल्याचा आरोप आमदार काळे यांनी केला.
