शास्त्रीय गायनापासून व्याख्यानापर्यंत आणि सांगितीक कार्यक्रमांपासून तर पुरस्कार प्रदान सोहळ्यांपर्यंत विविध कार्यक्रमांची मेजवानी येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘कुसुमाग्रज स्मरण’ अंतर्गत २७ फेब्रूुवारी ते १० मार्च या कालावधीत मिळणार आहे.
गुरूवारी पहाटे पाच वाजता अनिल दैठणकर यांचे व्हायोलिन वादन व कृष्णेद्र वाडीकर यांचे शास्त्रीय गायन, दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजता कोलकात्याचे स्वभाव नाटक दल निर्मित ‘विस्थापन’ या विषयावर एकांक ‘मि. इंडिया’, एक मार्च रोजी अभिजित ताम्हणे यांचे ‘आधुनिक चित्रकला ते समकालीन दृष्यकला’ या विषयावर सचित्र व्याख्यान, दोन मार्च रोजी सायंकाळी स्वच्छंद निर्मित ‘गीत नवे गाईन मी’ हा सांगितिक कार्यक्रम रंजना जोगळेकर व विनायक जोशी हे कलाकार सादर करतील. दोन मार्च रोजी मुरलीधर खैरनार यांचे ‘कादंबरीचा शोध’ या विषयावर व्याख्यान, चार मार्च रोजी नाशिकमधील महिला कलाकारांचा ‘नाद आणि लय’ हा वाद्य वादनाचा कार्यक्रम, पाच मार्च रोजी जनस्थान पुरस्कारप्राप्त कविंचा काव्यदर्शन ‘शब्दांचे धन’ या कार्यक्रमात किशोर पाठक, मकरंद हिंगणे यांसह इतर सहभागी होतील.
सहा मार्च रोजी विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या संयुक्त विद्यमाने पंजाबी साहित्यिक सुरजित पातर यांना कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळा, आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्रातील निवडक दहा कवयित्रींचे ‘छंदोमयी’ कवयित्री संमेलन, नऊ मार्च रोजी प्रविण काळोखे दिग्दर्शित ‘सावधान- एक योग कथा’ (लेखक – विजय कान्हेरे), मंजुळा (लेखक – निशिकांत कामत) या दोन एकांकिका सादर होतील.
याशिवाय २७ फेब्रुवारी ते दोन मार्च या कालावधीत पुस्तक प्रदर्शन, पाच ते १० मार्च या कालावधीता चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम गंगापूर रस्त्यावरील कुसुमाग्रज स्मारकात सायंकाळी होणार आहेत. १० मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता कालिदास कलामंदिरात गोदावरी गौरव पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना नाशिककरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.