अवजड हलके झाले हो..

गेली तीस वर्षे पाठीवर किंवा डोक्यावर शे-सव्वाशे किलो वजनाची गोण घेऊन अंगमेहनत करणाऱ्या माथाडी कामगारांच्या पाठीवरील ओझे ३० किलोने मंगळवारपासून कमी झाले असून नारळ बाजारात चढ-उतार करणाऱ्या शेकडो कामगारांना आता केवळ ५० किलो वजनाची गोण उचलावी लागणार आहे.

गेली तीस वर्षे पाठीवर किंवा डोक्यावर शे-सव्वाशे किलो वजनाची गोण घेऊन अंगमेहनत करणाऱ्या माथाडी कामगारांच्या पाठीवरील ओझे ३० किलोने मंगळवारपासून कमी झाले असून नारळ बाजारात चढ-उतार करणाऱ्या शेकडो कामगारांना आता केवळ ५० किलो वजनाची गोण उचलावी लागणार आहे. त्यामुळे नववर्षांच्या पहिल्या दिवशी कामगारांच्या चेहऱ्यावर हसू परसले होते. तीस किलोने झालेल्या वजनामुळे मजुरी कमी झाल्याचे दु:ख होते पण तब्येतीपेक्षा पैसा महत्त्वाचा नाही, असे समजून या कामगारांनी आनंद व्यक्त केला. वृत्तान्तमध्ये याबाबत ‘ओझे झाले डोईजोड’ अशा बातमीने सर्वप्रथम आवाज उठविला होता. तेव्हापासून हे ओझे कमी व्हावे यासाठी कामगार संघटना प्रयत्नशील होती. त्याला आत्ता अखेर यश आले.
मुंबईतील माथाडी कामगार आता नवी मुंबईत एकटवला आहे. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील काही डोंगराळ भागातून आलेला हा कामगार म्हणजे धडधाकट, कष्टाळू, आणि प्रामाणिक म्हणून ओळखला जातो. मुंबईत हा कामगार अनेक ठिकाणी विखुरलेला होता. स्वर्गीय आमदार आण्णासाहेब पाटील यांनी त्यांना एका झेंडय़ाखाली आणले. त्या वेळी या कामगाराकडून जास्तीत जास्त काम करून घेण्यासाठी व्यापारी १३५ ते १४० किलो वजनाच्या गोणी तयार करीत होते. गावाकडील चार तोंडांत अन्नाचे दोन घास जावेत म्हणून या वजनदार गोणीतील शेतमालाची चढउतार करण्याचे काम माथाडी कामगार मुकाटय़ाने इमानेइतबारे करीत आला आहे. त्यानंतर माथाडी कायदा, माथाडी मंडळ आणि मानवी अधिकार, भारतीय कामगार संघटना यांसारख्या संस्थांच्या रेटय़ामुळे माथाडी कामगारांचे हे ओझे नंतर ६० किलोने कमी झाले. तेही काम माथाडी कामगार खाली मान घालून गेली ३० वर्षे करीत असताना युती शासनाच्या काळात हे ओझेदेखील कमी व्हावे, असा एक मतप्रवाह तयार झाला. तरुण कामगारांना हे ८० किलोचे ओझे उचलणे शक्य आहे पण वय झालेल्या कामगारांचे काय असा प्रश्न पडला. त्यामुळे ९९ मध्ये हे ओझे सरसकट ५० किलो करण्यात यावे, असा निर्णय झाला पण त्याची अंमलबजावणी मात्र अद्याप होत नव्हती. त्यामुळे नारळाच्या ८० किलोच्या गोणी उचलताना माथाडी कामगारांना अतोनात वेदना आणि मणक्याचे आजार होत होते. नारळ ट्रकमधून उतरवताना नारळाच्या शेंडय़ा, त्याचा टणकपणा लागून माथाडी कामगार रणकुंडीला येत होता. महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार आणि जनरल युनियनचे नेते आमदार नरेंद्र पाटील यांनी संघटनेचे काम सुरू करताना हा विषय सर्वप्रथम हाती घेतला आणि तो सोडविण्यासाठी सातत्य ठेवले. त्यासाठी अनेक व्यापाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. वाई, भोर तालुक्यात हे मोठे ओझे उचलून वृद्धपणी अंथरुणाला खिळलेल्या माथाडी कामगारांची व्यथा या व्यापाऱ्यांना सांगितली. त्यांचे सर्व निवृत्तिवेतन हे आजारांवर उपचार करण्यासाठी जात असल्याचे निदर्शनास आणले. कायदा तर आहे पण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी व्यापाऱ्याचे सहकार्य हवे, अशी भूमिका मांडली. त्याला एपीएमसी नारळ असोसिएशनचे अध्यक्ष जयंत गाला यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे १ एप्रिलपासून नारळाच्या गोणीचे वजन ५० किलो करण्यात आले आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात लागणारा नारळ हा आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या राज्यांतून येत आहे. तेथील व्यापाऱ्यांना आता ५० किलोची गोण तयार करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे एपीएमसी बाजारात येणारी नारळाची गोण यापुढे ५० किलो वजनाची राहणार आहे. एपीएमसीच्या घाऊक बाजारात दिवसाला ४० ट्रक भरून सुमारे एक हजार टन नारळ येत आहे. सणासुदीला हे आवक मोठय़ा प्रमाणात होत असल्याचा अनुभव आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Labour burden decrease

ताज्या बातम्या