कमी पर्जन्यमानामुळे तलावांमध्ये कमी पाणीसाठा आणि आता उन्हाळ्यात त्यांनी गाठलेला तळ याचा सर्वाधिक फायदा यंदा अमरावती विभागात महात्मा ज्योतिबा फुले जल-भूमी संधारण अभियानाला झाला आहे. आटलेल्या तलावांमधून विभागातील पाच जिल्ह्य़ांमध्ये ६ लाख ७५ हजार घनमीटर गाळ बाहेर काढण्यात आला आहे. यामुळे तलावांची जल साठवणूक क्षमता सुधारण्यासोबतच शेतीसाठी सुपीक मातीही उपलब्ध झाली आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जल-भूमी संधारण अभियानाचा मुख्य उद्देश जलस्त्रोतांचे बळकटीकरण असले, तरी यंदा तलावांमधील गाळ काढण्याच्या कामाला महत्व आले आहे. सरासरी पाऊस कमी झालेल्या भागांमध्ये यंदा मोठय़ा संख्येने तलाव आटले. त्यातील गाळ श्रमदानाच्या माध्यमातून काढण्यासाठी आता लगबग सुरू आहे.
या अभियानाअंतर्गत लोकसहभागातून श्रमदानाने पाझर तलाव, गाव तलाव, सिमेंट नाला बांध यातील गाळ काढणे, तलाव, बंधाऱ्यांची किरकोळ दुरूस्ती करणे, जलस्त्रोतांचे पुनर्भरण करणे, वनराई किंवा कच्चे बंधारे बांधणे, कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट बसवणे, खोल सलग समतल चर बांधणे, विहिरींचे पुनर्भरण आणि खोलीकरण करणे अशा स्वरूपाची कामे घेतली जातात. लघु पटबंधारे विभागामार्फत यातील अनेक कामे केली जातात.
अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये जून अखेपर्यंत सुमारे १४ लाख ५० हजार घनमीटर गाळ तलावांमधून काढण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. बुलढाणा जिल्’ाात सर्वाधिक जलसंकट आहे. या जिल्ह्य़ातील बहुतांश तलाव कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे साहजिकच जास्त गाळ उपलब्ध झाला आहे. चिखली, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, बुलढाणा आणि लोणार तालुक्यांमधून सर्वाधिक गाळ उपसला गेला आहे. जून अखेपर्यंत बुलढाणा जिल्’ाातील तलावांमधून सर्वाधिक ५ लाख घनमीटर, अकोला जिल्’ाात २.५० लाख घनमीटर, वाशीम आणि अमरावती जिल्’ाात प्रत्येकी २ लाख तर यवतमाळ जिल्’ाातील तलावांमधून ३ लाख घनमीटर गाळ खोदला जाईल, अशी शक्यता आहे.
मार्च अखेरीस विभागातील या तलावांमधून साडेतीन लाख घनमीटर गाळ काढण्यात आला होता. महात्मा फुले जलसंधारण अभियानाअंतर्गत अमरावती जिल्ह्य़ातील पाच आणि यवतमाळ जिल्ह्य़ातील ३ तलावांची दुरूस्ती करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्य़ातील १२, वाशीम जिल्ह्य़ातील ६ आणि अमरावती जिल्ह्य़ातील १३ कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांना गेट बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ५२ तर, वाशीम जिल्ह्यात ११८ विहिरींचे जलपुनर्भरण झाले आहे.
तलावांमधील गाळ हा शेतीसाठी पोषक असल्याचे दिसून आले आहे. शेतीची उत्पादकता त्यामुळे वाढण्यास मदत होते. पण, हा गाळ काढण्यासाठी परिश्रम घ्यावे लागत असल्याने सुरूवातीला या अभियानासाठी पुरेसा प्रतिसाद मिळत नव्हता, पण शेतकऱ्यांमधील जागृतीमुळे हा गाळ शेतात नेऊन टाकण्याकडे कल वाढला आहे. गाळाचा हा एक उपयोग आहे आणि त्याचवेळी खोलीकरण झाल्याने तलावांमधील जलसंचय वाढण्यास मदत होणार आहे. तलावांमध्ये गाळ साचण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू असते. गाळ काढला न गेल्यास तलाव- बंधाऱ्यांची पाणी साठवण्याची क्षमता कमी होत जाते. अमरावती विभागातील बहुतांश सिमेंट बंधारे गाळाने भरले आहेत. परिणामी ते निकामी झाले आहेत. आता या सिमेंट बंधाऱ्यांमधील गाळ काढण्याच्या कामाला प्राधान्य दिले जावे, अशी मागणी होत आहे.