काँग्रेसचे विद्यमान खासदार जयवंत आवळे यांचा पत्ता कापला गेल्यानंतर आता पंतप्रधानांनीच आपणास लातूरमधून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश दिल्याचे सांगत डॉ. नरेंद्र जाधव यांच्या वतीने प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी मात्र केवळ अर्ज सादर केला गेला. दरम्यान, उमेदवार कोणी का असेना, लाखाच्या फरकाने निवडून आणू, असा दावा काँग्रेसने केला. भाजपनेही उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी बघून लाखाचीच बात भाषणातून मांडली.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने लातुरात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. शासकीय विश्रामगृहावर पाय ठेवायला जागा नाही एवढी गर्दी त्यावेळी होती. मात्र, या मतदारसंघात गर्दी बघण्याची सवय भाजप नेत्यांना नसल्यामुळे या गर्दीमुळे ते हुरळून गेले. गेल्या वेळी लातूरची जागा भाजपला केवळ साडेपाच हजार मतांनी गमवावी लागली. त्यामुळे लाखाच्या मताने भाजप उमेदवार निवडून येईल. उमेदवाराची मागणी मोठय़ा प्रमाणावर असली व तिकीट कोणालाही मिळाले तरी सर्वजण एकदिलाने काम करतील आणि नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावर आरूढ करण्यासाठी योगदान देतील, असा दावा भाजपच्या वतीने करण्यात आला होता.
काँग्रेसतर्फे प्रकाश येलगुलवार, टी. पी. मुंडे या पक्षनिरीक्षकांसह पशुसंवर्धनमंत्री मधुकरराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत मंगळवारी काँग्रेसभवनात इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. तब्बल २९जणांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले. स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. विद्यमान खासदार आवळे यांनी स्थानिकांना प्रतिनिधित्व मिळणार असेल तर आपण उमेदवारी मागणार नाही, असे महिनाभरापूर्वीच जाहीर केले होते. मात्र, मंगळवारी त्यांच्या समर्थकांनी आवळे यांनाच पुन्हा संधी मिळावी, अशी आग्रही भूमिका मांडली.
दुसरीकडे केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनीही आपला अर्ज दाखल केला. स्वत: मुलाखतीस ते उपस्थित नव्हते. काँग्रेसचा उमेदवार कोण? हेही अजून गुलदस्त्यात असताना काँग्रेसभवनात मंगळवारी नेत्यांची जोरदार भाषणबाजी झाली. आमदार देशमुख यांनी उमेदवार कोणीही असला, तरी काँग्रेसचा विचार गावोगावी पोहोचला आहे. येथील नेत्यांनी जिल्हय़ाचा विकास केलेला असल्यामुळे या वेळी एक लाखाच्या फरकाने काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल, असा दावा केला.
संग्रहित लेख, दिनांक 20th Feb 2014 रोजी प्रकाशित
लोकसभा विजयाची ‘लाखाची बात’!
काँग्रेसचे विद्यमान खासदार जयवंत आवळे यांचा पत्ता कापला गेल्यानंतर आता पंतप्रधानांनीच आपणास लातूरमधून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश दिल्याचे सांगत डॉ. नरेंद्र जाधव यांच्या वतीने प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी मात्र केवळ अर्ज सादर केला गेला.

First published on: 20-02-2014 at 01:15 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakhachi bat of parliamentary win