काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावरून पक्षाचे स्थानिक नेते पुन्हा एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असून मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीतही एका नावावर एकमत होऊ न शकल्याने आता पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात, याकडे सामान्य कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
दहा वषार्ंपासून पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेले विनायक बांगडे यांनी गेल्या वर्षी महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी देण्याच्या मुद्यावरून माजी खासदार नरेश पुगलिया यांच्याशी मतभेद झाल्याने राजीनामा दिला होता. तेव्हापासून या पदावर अद्याप कुणाची वर्णी लागलेली नाही. आता निवडणुका जवळ आल्याने या पदावर आपल्याच समर्थकाची वर्णी लागावी, यासाठी येथे सक्रीय असलेले दोन्ही गट सध्या प्रयत्न करत आहेत. पालकमंत्री संजय देवतळे यांच्या गटाला हे पद हवे आहे, तर आजवर या पदावर ताबा ठेवून असलेल्या पुगलिया गटाला आपल्या समर्थकाची वर्णी लावायची आहे. बांगडे यांनी राजीनामा दिल्यापासून माजी खासदार पुगलिया यांनी या पदावर गजानन गावंडे किंवा अविनाश ठावरी यांची नेमणूक व्हावी, यासाठी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरला आहे. देवतळे गटाला आता या पदावर सुभाष गौर, जैनुद्दीन जव्हेरी किंवा विनायक बांगडे यांची नियुक्ती हवी आहे.
या पाश्र्वभूमीवर हा वाद सोडवण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी गेल्या रविवारी पालकमंत्री देवतळे यांच्यासह आमदार सुभाष धोटे, विजय वडेट्टीवार आणि माजी खासदार नरेश पुगलिया या चौघांना मुंबईत चर्चेसाठी बोलावले होते. चव्हाण व ठाकरे यांनी आधीच्या बैठकीचा अनुभव लक्षात घेऊन या चौघांची एकत्रित बैठक न घेता प्रत्येकाशी स्वतंत्रपणे चर्चा केली. सर्वात आधी देवतळे यांनी गौर, जव्हेरी व बांगडे यांची नावे या पदासाठी दिली. आमदार धोटे यांनीही याच नावांना समर्थन दिले. चिमूरचे आमदार वडेट्टीवार यांनी नागभीडचे पंजाबराव गावंडे यांचे, तर पुगलिया यांनी अविनाश ठावरी व गावंडे यांचे नाव समोर केले. या चारही नेत्यांचे एका नावावर एकमत होते का, याची चाचपणी चव्हाण व ठाकरे यांनी यावेळी करून बघितली. पण, त्यात त्यांना यश आले नाही. गेल्या अनेक वर्षांंपासून हे पद पुगलिया गटाकडे आहे. त्यामुळे आता या पदावर आपलाच माणूस हवा, असा आग्रह देवतळे व धोटे यांनी यावेळी धरला. पुगलिया यांनी मात्र मंत्रीपद व आमदारकी असल्यामुळे त्या गटाकडे अध्यक्षपद नको, अशी भूमिका मांडली. स्थानिक नेते ऐकायला तयार नाहीत, हे बघून अखेर मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी आता पक्षश्रेष्ठी या पदाबाबतचा निर्णय घेतील, असे शेवटी जाहीर केले. त्यामुळे आता अध्यक्षपद कुणाला मिळणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
देवतळे गटाने बांगडे यांचे नाव समोर केले असले तरी ते या पदासाठी इच्छूक नाहीत. तसे त्यांनी प्रदेशाध्यक्षांना कळवून टाकले आहेत. सध्या पुगलिया गटासोबत असलेले आमदार वडेट्टीवार यांनी गावंडे यांचे नाव समोर केल्याने या गटाला सुद्धा धक्का बसला आहे. या पाश्र्वभूमीवर सर्वाना मान्य होईल, असे नाव शोधण्याची जबाबदारी चव्हाण व ठाकरे यांच्यावर येऊन पडली आहे. या पदासंदर्भातला अंतिम निर्णय या   महिन्याअखेरीस   होईल, असे आज पक्षाच्या वर्तुळातून सांगण्यात आले.