चार दिवसात २ महिलांना जखमी; गावकऱ्यांमध्ये दहशत
अवघ्या पंधरा दिवसापूर्वी रेडिओ कॉलर लावून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बोर्डा परिसरात निसर्गमुक्त केलेल्या बिबटय़ाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून चार दिवसात दोन महिलांना जखमी केल्याने दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान, बिबटय़ाला पुन्हा जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावून बेशुध्द करण्याचे इंजेक्शन देण्यासाठी वनखात्याचे पथकही दाखल झाले आहे. या घटनेमुळे मानव व वन्यप्राणी संघर्षांवर वाईल्ड लाईफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने सुरू केलेल्या अभ्यासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
चार महिन्यापासून मोहुर्ली प्राणी बचाव केंद्रात जेरबंद असलेल्या दोन बिबटय़ांना रेडिओ कॉलर लावून ३ ऑगस्टच्या मध्यरात्री वन्यजीव विभागाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बोर्डा व आगरझरी येथे निसर्गमुक्त केले. रेडिओ कॉलरमुळे दर पाच तासांनी बिबटय़ांचा वावर नेमका कोणत्या परिसरात आहे, याची सविस्तर माहिती वनखात्याला मिळते. सलग पंधरा दिवस हे दोन्ही बिबट जंगलात मोकळे वावरत होते. परंतु, बोर्डा येथे निसर्गमुक्त केलेल्या बिबटय़ाने १८ ऑगस्टला वलनी गावात वत्सला श्रावण कोरंगे या महिलेला जखमी केले. ही महिला खर्रा थुंकण्यासाठी म्हणून खिडकीजवळ गेल्यावर दबा धरून बसलेल्या बिबटय़ाने हल्ला केल्याने यात ती गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर लगेच चकनिंबाळा येथे २१ ऑगस्टला सायंकाळी ७.१५ वाजता मनीषा शालिक जुनघरे (२६) या महिलेलाही बिबटय़ाने गंभीर जखमी केले असून तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या दोन्ही घटनेनंतर परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले असून त्यात आलेल्या छायाचित्रानुसार बोर्डा येथे रेडिओ कॉलर लावून सोडलेल्या बिबटय़ानेच दोन्ही हल्ले केल्याचे निदर्शनास आले आहे. नरभक्षक बिबटच परिसरातील गावात धुमाकूळ घालत असल्याचे गावकऱ्यांना कळताच दहशतीचे वातावरण आहे. या दोन्ही घटनांची गंभीर दखल घेऊन वनखात्याचे अधिकारी बोर्डा व चकनिंबाळा परिसरात दाखल झाले आहेत. काल मध्यरात्री रेडिओ कॉलरच्या माध्यमातून बिबटय़ा नेमका कोणत्या परिसरात आहे, याची माहिती जाणून घेतली असता चकनिंबाळा परिसरातच तो वावरत असल्याचे दिसून आले. यानंतर आज सकाळीही बिबट गावालगत फिरत असल्याचे दिसले. त्यावरून वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी, तसेच वाईल्ड लाईफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे तज्ज्ञ अभ्यासक डॉ. हबीब बिलाल व डॉ. पराग निगम यांनीही हाच बिबटय़ा असल्याचा अंदाज वर्तवल्याची माहिती वनखात्यातील सूत्रांनी दिली.
दरम्यान, वाढते हल्ले लक्षात घेता वनखात्याने बिबटय़ाला पुन्हा जेरबंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातूनच आज पहाटे २.३० वाजता चकनिंबाळा येथे एक पिंजरा लावून बेशुध्दीकरणाचे इंजेक्शन देण्यासाठी पथकालाही पाचारण केले आहे. बेशुध्दीकरण पथकातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.खोब्रागडे, वनपरिक्षेत्र अधिकारी बलकी घटनास्थळी दाखल झाले आहेत. बिबटय़ाचा नेमका वावर कुठे आहे, याची माहिती मिळताच त्याला बेशुध्द करण्यात येऊन जेरबंद केले जाणार आहे. सध्या ताडोबा बफर झोनचे सर्व अधिकारी या बिबटय़ाचा शोध घेत जंगलात फिरत आहेत.

अभ्यासावरच प्रश्नचिन्ह!
दरम्यान, हल्ल्यांच्या या घटनांमुळे वन्यप्राणी व मानव यांच्यातील संघर्षांवर डेहराडून येथील वाईल्ड लाईफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे तज्ज्ञ अभ्यासक डॉ. हबीब बिलाल व डॉ. पराग निगम यांनी सुरू केलेल्या अभ्यासावर प्रश्न निर्माण झाला आहे. रेडिओ कॉलरच्या माध्यमातून हे दोन्ही तज्ज्ञ अभ्यासक सविस्तर अभ्यास करणार होते. परंतु, या प्रकल्पाच्या अगदी सुरुवातीलाच कॉलर लावलेल्या बिबटय़ाने हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे परिसरातील गावकऱ्यांनीही जेरबंद केल्यानंतर या बिबटय़ांना इतरत्र सोडावे, अशी मागणी लावून धरली आहे. दरम्यान, ताडोबातील गावकऱ्यांवरील हल्ले कमी व्हावेत आणि बिबटय़ावर लक्ष ठेवण्यासाठी दोन ते अडीच लाखाची एक कॉलर बिबटय़ांना लावण्यात आली आहे. मात्र, हा कॉलर लावण्याचा डाव वनखात्यावर उलटल्याचे या घटनांमुळे सिध्द झाले आहे.

नेमका कोणता बिबटय़ा नरक्षभक?
वनखात्याने ३ ऑगस्टला एकूण तीन बिबटे जंगलात सोडले. यातील दोन बिबटय़ांना रेडिओ कॉलर लावण्यात आले. त्यातील बोर्डा येथील बिबटय़ाने धुमाकूळ घालणे सुरू केल्याने इतर दोन बिबटय़ांवरही वनखाते लक्ष ठेवून आहे. मात्र, यातील एका बिबटय़ाला कॉलर लावली नसल्याने तो वनखात्याच्या संपर्कात नाही. त्यामुळे या बिबटय़ाचा शोध आता कसा घ्यायचा, हा प्रश्न वनखात्याला पडला आहे. दरम्यान, दोन बिबट जेरबंदच असल्याचे व त्यातील एक मादी बिबट नरभक्षक असल्याचा संशय वनखात्याला आहे. त्यामुळे निसर्गमुक्त केलेला बिबट नरभक्षक की पिंजऱ्यातील, हा प्रश्नही वनखात्याला पडला आहे.