मोहुर्लीच्या प्राणी बचाव केंद्रात जेरबंद असलेल्या चारपैकी एका नर बिबटय़ाला आज डेहराडूनच्याा वाईल्ड लाईफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया येथून आलेली कॉलर लावण्यात आली. त्यामुळे या बिबटय़ाला आता लवकरच जंगलात मोकळा श्वास घेण्यासाठी सोडण्याचे संकेत वनखात्याने दिले आहेत.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील गावांमध्ये मार्च व एप्रिल महिन्यात धुमाकूळ घालून नरभक्षी बिबटय़ाने आठ लोकांचा बळी घेतला. त्यामुळे वनखात्याने पिंजरे लावून एका पाठोपाठ एक, अशा चार बिबटय़ांना जेरबंद केले. यातील तीन बिबटय़ांना मोहुर्ली येथील प्राणी बचाव केंद्रात, तर एकाला रामबाग नर्सरीत ठेवण्यात आले होते. यातील नरभक्षक बिबट नेमका कोणता, याचा शोध घेण्यासाठी म्हणून अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीने सलग चार ते पाच बैठका घेतल्या. मात्र, नरभक्षक बिबट नेमका कोणता, याचा शोध काही समितीला घेता आला नाही. याच दरम्यान बिबटय़ांना जंगलात सोडण्यात यावे, अशी मागणी वन्यजीवप्रेमींकडून करण्यात आली. त्यामुळे प्रथम बिबटय़ाला माईक्रो चिप लावून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. कालांतराने बिबटय़ाला अमेरिकेतून कॉलर आयडी बोलावून ते लावण्याचा निर्णय घेण्यात आला. कॉलर आयडी लावल्याने बिबटय़ाने जंगलातील नेमके स्थळ कळेल, हा त्या मागचा उद्देश होता. यातील माईक्रो चिप तर तेव्हाच लावण्यात आली. मात्र, कॉलर आयडी उपलब्ध न झाल्यानंतर वनखात्याला आतापर्यंत वाट बघावी लावली.
दरम्यानच्या काळात ग्रीन प्लॅनेट सोसायटीने बिबट पिंजऱ्यात राहून पाळीव प्राणी होत असल्याची तक्रार राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे सचिव राजेश गोपाल यांच्याकडे केली. त्यामुळे प्रकरण आणखीच गंभीर बनले. त्याच वेळी अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक मिश्रा यांनी सात सदस्यीय समितीने तयार केलेला अहवाल सादर केला. यानुसार बिबटय़ांना तातडीने जंगलात सोडण्यात यावे, असे नमूद होते. त्यामुळे कॉलर आयडीला लावण्यास वेळ होत असल्याचे बघून डेहराडूनच्याा वाईल्ड लाईफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया येथून आलेली कॉलर आज एका नर बिबटय़ाला लावण्यात आली. दोन महिन्यापूर्वी या नर बिबटय़ाला बोर्डाच्या जंगलात जेरबंद करण्यात आले होते. हाच बिबट नरभक्षक असावा, असा संशय असल्याने डेहराडून येथून आलेली कॉलर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कडूकर यांनी बिबटय़ाला लावली.