उरण तालुक्यातील आवरे कडापे परिसरातील जंगलात एका ग्रामस्थाला बिबटय़ा दिसला असल्याची माहिती येथील पोलीस पाटलाने उरणच्या वनसंरक्षक विभागाला दिली असून वन विभागाने सतर्कता म्हणून आवरे परिसरातील कडापे येथे बिबटय़ाला पकडण्यासाठी पिंजरा नेऊन ठेवला आहे. त्यामुळे या परिसरात अफवांचा बाजार पसरला असून चिरनेर तसेच उरण परिसरातही बिबटय़ा दिसल्याची अफवा आहे. मात्र या परिसरात बिबटय़ा असल्याचा कोणताही पुरावा वन विभागाला मिळालेला नसल्याचे वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे माहिती नंतर वन विभागाचा या परिसरात शोध सुरू आहे.
तीन ते चार वर्षांपूर्वी उरणमधील करंजा परिसरात बिबटय़ा आढळला होता. त्यामुळे उरणमध्ये बिबटय़ा असल्याची खात्री पटली होती.
तसेच उरणच्या करंजा नौदल परिसरात वाघ तसेच बिबटय़ा असल्याचे बोलले जात होते. मात्र राज्यातील अनेक ठिकाणच्या नागरी वस्तीत बिबटय़ा आढळून आल्याने बिबटय़ाची दहशत अवघ्या राज्यात पसरलेली असताना दोन दिवसांपूर्वी आवरे कडाप्पे भागांतील जंगलात एका व्यक्तीने बिबटय़ा पाहिल्याचे सांगताच येथील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याचा वनवा आता चिरनेर परिसरातही पसरला असून चिरनेर मध्येही बिबटय़ा दिसल्याची अफवा सुरू झाली आहे.

सतर्कता म्हणून वनविभागाचा सापळा  
बिबटय़ाचा वावर हा २५ चौरस मीटर परिघात असतो, या परिसरात बिबटय़ा असल्याच्या काही खुणा आढळल्यास बिबटय़ा असल्याचे निश्चित होईल. यामध्ये बिबटय़ाच्या पावलांच्या खुणा, विष्ठा आदींचा शोध वन विभागाचे कर्मचारी घेत आहेत. मात्र सतर्कता म्हणून वन विभागाने या परिसरात पिंजरा नेऊन ठेवल्याची माहिती उरण विभागाचे वन संरक्षक सी. यू. मराठे यांनी दिली आहे.