बल्लारपूर शहरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबटय़ावर वनखात्याचे लक्ष राहावे म्हणून त्याला मायक्रोचिप लावून जंगलात सोडण्यात येणार आहे. सध्या या बिबटय़ाचा मुक्काम रामबाग नर्सरीत असून राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
बल्लारपूर शहरातील संतोषीमातानगर प्रभागातील सुरेश रामकिशन पाल यांच्या घरात घुसून बिबटय़ाने काल धुमाकूळ घातला. बिबटय़ाचा हा थरार अनुभवतांना दोन जण जखमी झाले. अथक परिश्रमानंतर बिबटय़ाला बेशुध्दीकरणाचे इंजेक्शन देऊन बेशुध्द करण्यात आले. यानंतर जेरबंद करून चंद्रपूरच्या रामबाग नर्सरीत ठेवण्यात आले आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता जेरबंद करण्यात आलेला बिबट रात्री उशिरापर्यंत बेशुध्दीच होता. त्यामुळे आज सकाळी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. खोब्रागडे यांनी बिबटय़ाची आरोग्य तपासणी केली. यात बिबट काहीसा गुंगीत असलेला दिसून आला. त्यामुळे आज दिवसभर त्याला पिंजऱ्यातच ठेवण्यात येणार आहे. या बिबटय़ाला बल्लारपूर शहरालगतच्या जुनोना किंवा गिलबिलीच्या जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यासंदर्भात मध्य चांदा वन विभागाने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडून मार्गदर्शक सूचना मागविल्या आहेत. त्यानुसारच या बिबटय़ाला जंगलात सोडले जाणार आहे. या बिबटय़ावर वनखात्याचे लक्ष राहावे म्हणून त्याला मायक्रोचिप लावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही महिन्यापूर्वी माना टेकडी व बोर्डाच्या जंगलात धुमाकूळ घालणाऱ्या बिबटय़ाला सुध्दा मायक्रोचिप लावण्यात आली होती. त्यानंतर या दोन्ही बिबटय़ांनी गावात येऊन धुमाकूळ घातला होता तेव्हा मायक्रोचिपमुळेच त्यांचा ठावठिकाणा शोधता आलेला होता. आता या बिबटय़ाला सुध्दा मायक्रोचिप लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकदा बिबट पूर्णत: तंदुरुस्त दिसला की, त्याला ही चिप लावली जाणार आहे. हा जेरबंद करण्यात आलेला बिबट अडीच वर्षांचा असून नर आहे. तिकडे मध्य चांदा वन विभागाचे बिबट प्रथम बल्लारपूर शहरात कोणत्या मार्गाने आला, याचाही शोध घेत आहे. यापूर्वी सुध्दा बल्लारपूर व चंद्रपूर शहरात बिबटय़ाने प्रवेश केला आहे. दोन वर्षांपूर्वी अशाच एका पहाटे चंद्रपूरच्या नागरी वस्तीत प्रवेश केलेल्या बिबटय़ाच्या पिल्लाला संतप्त लोकांनी ठार केले होते, तर इंदिरा नगर व लालपेठ कॉलरीतील नागरी वस्त्यात बिबटय़ाने प्रवेश केला होता. दरम्यान, आता बिबटय़ा शहरात येऊ नये म्हणून ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने वनखात्याच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. यावर एनटीसीएची मार्गदर्शक सूचना सुध्दा मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतरच या संदर्भात ठोस पावले उचलली जाणार आहेत. सध्या तरी मायक्रोचिप लावून बिबटय़ाला तातडीने जंगलात मुक्त करण्यात येणार आहे.

मोहुर्ली प्राणी बचाव केंद्रात तीन मादी बिबट
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहुर्लीच्या प्राणी बचाव केंद्रात तीन मादी बिबट दोन वर्षांंपासून जेरबंद आहेत. बोर्डा, माना व जुनोनाच्या जंगलातून नागरी वस्तीत येऊन नागरिकांवर हल्ला करणाऱ्या या तिन्ही मादी बिबटय़ाला जंगलात मुक्त संचार करण्याची प्रतीक्षा आहे, परंतु यातील एक मादी पिंजऱ्यात राहून वृध्दपणाकडे वाटचाल करीत आहे.