युती/आघाडीच्या राजकारणातील उलथापालथ आणि परिणामी शिगेला पोहोचलेली प्रचाराची रणधुमाळी शमली असून बुधवारी प्रत्यक्ष मतदानाची घटिका समीप येऊन ठेपली आहे. मतदारांनो मतदानाला चला, पण मतदान केंद्रांवर जाताना निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेली मतदारचिठ्ठी सोबत न्यायला विसरू नका. त्यावर आपले छायाचित्र नसेल तर निवडणूक आयोगाने ग्राह्य़ ठरविलेला पुरावा सोबत घेऊन जा. अन्यथा मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागेल.
मुंबई शहरातील मतदारयादीतील एकूण २४,५७,०७६ मतदारांपैकी ९१.२९ टक्के मतदारांकडे ओळखपत्र आहे. तर मतदारयादीत छायाचित्र असलेल्या उमेदवारांचे प्रमाण ९० टक्के आहे. उर्वरित १० टक्के मतदारांचे छायाचित्र निवडणूक आयोगाकडे नाही. परिणामी निवडणूक आयोगाकडून वितरित झालेल्या काही मतदार चिठ्ठय़ांवर मतदाराचे छायाचित्रच नाही.
एखाद्या कुटुंबातील सर्वच मतदारांचे छायाचित्र मतदान चिठ्ठीवर नसल्यास संबंधितांनी एकत्रच मतदान करण्यासाठी जावे. त्यामुळे एकत्रितपणे ओळख पटवून मतदान करणे त्यांना सोपे होईल, तसेच मतदान केंद्रावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांचेही काम हलके होईल. मात्र छायाचित्र मतदार ओळखपत्र अथवा वरील पुरावा नसल्यास मतदारयादीत नाव असूनही मतदाराला मतदानाचा हक्क बजावता येणार नाही.
मतदारयादीमध्ये नाव नसलेले काही मतदार शिधावाटपपत्रिका घेऊन येतात आणि मतदान करण्याचा हट्ट धरतात. शिधावाटप पत्रिकेमध्ये कुटुंबातील सदस्यांचे छायाचित्र नसल्याने ते मतदानासाठी पुरावा म्हणून ग्राह्य़ ठरणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

छायाचित्रांकित ओळखपत्र नसल्यास..
ज्या मतदारांकडे छायाचित्र असलेले ओळखपत्र नाही अशांना मतदानासाठी जाताना मतदान चिठ्ठीसोबत पासपोर्ट, वाहन चालक परवाना, केंद्र, राज्य सरकारी, सार्वजनिक उपक्रम किंवा अन्य सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र ओळखपत्र; छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक, टपाल कार्यालयाकडून दिलेले ओळखपत्र, पॅनकार्ड, आधारकार्ड, आरजीआय/एनपीआरकडून मिळालेले स्मार्टकार्ड, मनरेगा स्मार्टकार्ड, श्रम मंत्रालयाने योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड; छायाचित्रासह निवृत्ती वेतन कागदपत्र यापैकी एखादा पुरावा सोबत घेऊन जावा लागणार आहे.
नावे नसल्याने पुन्हा  गोंधळ होण्याची चिन्हे
लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुंबई शहरातील मतदारयादीतून सहा लाख मतदारांची नावे वगळल्याने मोठा गोंधळ झाला होता. अनेक मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले होते. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारयादीतून वगळलेल्या मतदारांना पत्र पाठवून नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु सुमारे नऊ हजार मतदारांनी नाव नोंदणीचा अर्ज आयोगाकडे पाठविला आहे. वगळलेल्या मतदारांच्या तुलनेत नोंदणी झालेल्यांची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या मतदानापासून काही मतदारांना वंचित राहावे लागण्याची चिन्हे आहेत.