उसने घेतलेले दीड हजार रुपये परत केले नाही म्हणून नंदनवन झोपडपट्टीत एका युवकाच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळून टाकल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन सख्ख्या भावांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश के.के. सोनवणे यांच्या न्यायालयाने तीन भावांना जन्मठेप आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली तर वडिलांची सबळ पुराव्याअभावी संशयाचा लाभ देऊन निर्दोष सुटका केली.
जन्मठेप झालेल्या आरोपींमध्ये विनोद ऊर्फ गोपी उमरेडकर (२६), धर्मेद्र ऊर्फ धम्मा, बाबूराव उमरेडकर (२९) आणि हरिश्चंद्र बाबूराव उमरेडकर (३४) यांचा समावेश आहे. हे सर्व नंदनवन झोपडपट्टीत राहणार आहेत. यात विनोद हा दोन्ही पायांनी अधू आहे. बगडगंज येथील रहिवासी मिथून जगदीश राऊत (२०)याचा खून झाला होता.
आरोपींचा व्यवसाय कबाडीचा आहे. मृत मिथूनने अपंग विनोदला दीड हजार रुपये उसणे मागितले होते. विनोदने अनेकदा पैस परत करण्यास मिथूनला बजावले. परंतु त्याने पैसे परत केले नव्हते. अशात एक दिवस (२२ फेब्रुवारी २०१२ रोजी) मिथून आपल्या भाच्याच्या नामकरणाच्या कार्यक्रमासाठी नंदनवन झोपडपट्टीत आला होता. विनोदला हे कळल्यावर त्याला गाठून पैशाची मागणी केली होती. परंतु तेथे मिथूनचे भरपूर नातेवाईक असल्याने विनोदने त्याला आपल्या तीन चाकी स्कूटीवर बसवून कबाडीच्या दुकानासमोर आणले होते. त्यावेळी रात्रीचे ९.४५ वाजले होते. विनोदने पुन्हा मिथूनला पैशाची मागणी केली. सध्या माझ्याकडे पैसे नाहीत, असे मिथूनने म्हणला होता. हा संवाद सुरू असताना तेथे विनोदचे दोन्ही भाऊ आणि वडील आले होते. मिथून पैसै परत करण्यास चालढकल करीत असल्याने विनोद संतापला आणि आपल्या तीन चाकी वाहनाच्या डिक्कीतून पेट्रोलची बाटली काढून मिथूनच्या अंगावर ओतली होती. तर त्याचा भाऊ धम्माने आगकाडी उगाळली होती. हरिश्चंद्र आणि बाबूराव उमरेडकर यांनी मिथूनला जाळण्याची चिथावणी दिली. मिथूनला जिवंत पेटवून देण्यात आले. त्याचे दोन्ही हात, छाती, चेहरा आणि पोट जळाले होते. तो ४५ टक्के जळाला होता. त्याला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मृत्यूपूर्व जबाब नोंदविण्यात आल्यानंतर १६ मार्च २०१२ रोजी मिथूनचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी न्यायालयात १४ साक्षीदार तपासण्यात आले. परंतु मृत्यूपूर्व जबाबात आरोपींच्या वडिलाचे नाव नसल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.