जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे प्रादेशिक मनोरुग्णालयात लिगल एड् क्लिनिकची स्थापना करण्यात आली आहे. मनोरुग्णांना कायदेविषयक सल्ला मिळावा, हा यामागचा हेतू आहे. या क्लिनिकचे उद्घाटन प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश सुभाष मोहोड यांच्या हस्ते झाले.
यावेळी मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अभय गजभिये, मुख्य न्यायदंडाधिकारी ए.सी. राऊत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व दिवाणी न्यायाधीश किशोर जयस्वाल, सदस्य अ‍ॅड. राजेंद्र राठी, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मनोहर पवार, डॉ. पुरुषोत्तम मडावी, अ‍ॅड. प्रशांत सत्यनाथन प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी न्या. मोहोड म्हणाले, १९८७ मध्ये मानसिक आरोग्य कायदा अस्तित्वात आला आहे. या कायद्यानुसार मानसिक आजारी व्यक्तीला पाठबळ मिळाले आहे.
मानसिक रुग्णास सामान्य नागरिक म्हणून वागणूक दिली तर खऱ्या अर्थाने या कायद्याचा उद्देश यशस्वी होऊ शकेल. शक्यतोवर ६० वर्षांनंतर मानसिक आजार संभवतात. वृद्धापकाळात मानसिक आजार होऊ नये, यासाठी काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉ. मनोहर पवार म्हणाले.
डॉ. अभय गजभिये यांनी रुग्णालयात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. हे लिगल क्लिनिक दर शनीवारी सकाळी १०.३० वाजता सुरू होईल. येथे वकील व विधी स्वयंसेवक निशुल्क कायदेशीर सल्ला देतील, अशी माहिती किशोर जयस्वाल यांनी दिली. डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी स्वागतपर भाषण केले. संचालन संध्या दुर्गे यांनी केले. अ‍ॅड. किशोर जयस्वाल यांनी आभार मानले.