‘लिव्ह इन् रिलेशनशिप’ आणि ‘लग्नसंस्था’ यांतले गुण-दोष या विषयावर टोकाचे वादविवाद झडू शकतात. नव्हे, झडतातही. या दोन्हीचे पुरस्कर्ते आपापलं म्हणणं अहमहमिकेनं मांडतात. परंतु कुणालाही आपली बाजू संपूर्णपणे दोषरहित असल्याचा दावा मात्र ठामपणे करता येत नाही.. येणं शक्यही नाही. याचं कारण या दोन्ही प्रकारांत त्यांचे त्यांचे असे काही गुण-दोष आहेतच. आणि माणूस हा प्राणी भावभावना व विकारयुक्त असल्यानं व्यक्तीपरत्वे त्याचं प्रमाण कमी-जास्त असतंच. त्यामुळे या दोन्ही प्रकारांतल्या नात्यांमध्ये ‘आदर्श’ अवस्था गाठणं अशक्य आहे. (पंजाबी कवयित्री-लेखिका अमृता प्रीतम आणि चित्रकार इमरोज यांच्यासारखं निखळ नातं स्वीकारणं आणि ते जन्मभर निभावणं, ही अपवादात्मक बाब होय.) कारण त्यासाठी मुळात ते नातं प्रेम, बांधिलकी, निष्ठा, परस्परांवरील गाढ विश्वास, जोडीदाराला त्याच्या गुणदोषांसह स्वीकारण्याची तयारी अशा ‘आदर्श’ तत्त्वांवर आधारलेलं असायला हवं. मनुष्यप्राण्यांत ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ असल्यानं हे शक्य नाही. त्यामुळे यापैकी कुठल्याही प्रकारचं नातं टिकवायचं आणि जपायचं असेल तर तडजोडीशिवाय पर्याय नाही. विचार आणि भावनांचं संतुलन कुठल्याही नात्यात महत्त्वाचं असतं. तसं ते स्त्री-पुरुष सहजीवनातही आवश्यक असतं.
मराठी रंगभूमीवर लिव्ह इन् रिलेशनशिप आणि लग्नसंस्था यांचा ऊहापोह करणारी नाटकं हल्ली येत आहेत. परंतु त्यांचे कर्ते ‘अमुक एक नातंच आदर्श आणि दुसरं दोषयुक्त’ या निष्कर्षांप्रत अद्यापि येऊ शकलेले नाहीत. कलावैभव निर्मित आणि राजीव शिंदे लिखित-दिग्दर्शित-नेपथ्यित ‘थोडंसं लॉजिक, थोडंसं मॅजिक’ हे नवं नाटकही याच दुविधेतलं आहे.                             
मुलगा आणि सुनेच्या जाचामुळे वृद्धाश्रमाचा रस्ता धरलेले अप्पा (मोहन पेंडसे) त्या दोघांच्या अपघाती निधनानं पोरक्या झालेल्या नातवाला- चैतन्य ऊर्फ चिंत्याला मायेचा आधार देण्यासाठी घरी परत येतात. परंतु तुझे आजोबा वाईट आहेत, हे सतत आईनं त्याच्या मनावर बिंबवलेलं असल्यानं तो त्यांचा राग राग करतो. तशात आपल्या आई-वडिलांच्या मृत्यूसही आजोबाच कारणीभूत असल्याचं त्याच्या मनानं घेतलेलं असतं. त्यामुळे तो त्यांना डोळ्यांसमोर धरत नाही. त्यांनी वृद्धाश्रमात परत जावं म्हणून तो त्यांना घालूनपाडून बोलतो. पण त्याला सोडून जायला अप्पा राजी नसतात. त्याचं विखारी बोलणंही ते हसण्यावारी नेत असतात. अशात एके दिवशी चिंत्या आपल्या एका मैत्रिणीला- जेनीला घरी घेऊन येतो. तिच्यासोबत लिव्ह इन् रिलेशनशिपमध्ये राहण्याचं त्यानं ठरवलेलं असतं. जेनीकडूनच अप्पांना हे कळतं. लिव्ह इन् रिलेशनशिप ही काय भानगड आहे, हे अप्पांना माहीत नसतं. पण जेनीचे आणि त्यांचे सूर लगेचच जुळतात. जेनीला मनमोकळ्या स्वभावाचे अप्पा आवडतात. जेनी त्यांना कॉम्प्युटरचे धडे देते. तेव्हा कुठं ‘लिव्ह इन् रिलेशनशिप’ म्हणजे काय, हे त्यांना कळतं.
याचदरम्यान बागेत फिरायला गेलेले असताना योगायोगानं अप्पांची शकूशी.. लहानपणी त्यांच्या चाळीत राहणाऱ्या मुलीशी गाठ पडते. तिच्यावर मनोमन प्रेम करणाऱ्या अप्पांनी त्याकाळच्या सामाजिक बंधनांमुळे शकूपाशी ते व्यक्त करू न शकल्याने पुढे नाइलाजानं दुसऱ्या मुलीशी लग्न केलं होतं. परंतु पत्नीशी त्यांचे सूर कधीच जुळले नाहीत. अर्थात तरीही त्यांनी संसार केला. तिचं निधन झाल्यावर अप्पा एकाकी पडले. मुलगा-सूनही विचारेना. म्हणून त्यांनी स्वत:हूनच वृद्धाश्रमाचा रस्ता धरला होता.
आता इतक्या वर्षांनी शकू अकस्मात भेटल्यानं अप्पांना खूप आनंद होतो. ते परस्परांची विचारपूस करतात. त्यातून दोघंही समदु:खी असल्याचं त्यांना कळतं. परस्परांना अधूनमधून भेटत राहूया असं अप्पा सुचवतात. शकूही होकार देते. लिव्ह इन् रिलेशनशिपचा अर्थ कळल्यावर आपणही शकूबरोबर लिव्ह इन् रिलेशनशिपमध्ये का राहू नये असा विचार अप्पांच्या मनात येतो. आणि ते शकूला राजी करून घरी घेऊन येतात.
चिंत्यासाठी हा मोठाच धक्का असतो. या वयात अप्पांनी असले उद्योग करावेत? तो खूप आकांडतांडव करतो. पण जेनी अप्पांच्या या निर्णयाला पाठिंबा देते. जेनीचं आणि शकूचं मेतकूट जमायलाही वेळ लागत नाही. परंतु त्यांच्या जवळिकीमुळे चिंत्या अस्वस्थ होतो. आता ही दोघं आपल्याविरोधात जेनीला फितवतील असं त्याला वाटतं. अशात जेनीला ऑफिसतर्फे तीन वर्षांकरता अमेरिकेला पाठवायची ऑफर येते. चिंत्या तिला ‘ही ऑफर तू स्वीकार,’ असं सांगतो. तीन वर्षे आपल्याला एकमेकांपासून दूर राहावं लागणार याचं त्याला काहीच वाटलेलं नाही, हे जेनीच्या ध्यानी येतं. त्यामुळे आपल्या नात्यासंबंधात तिच्या मनात प्रश्नांचं काहूर माजतं. आधीच आपण आई-वडिलांना दुखावून आलोय आणि आता ज्याच्या जीवावर आपण हे धाडस केलं त्याच्यासोबतच्या नात्याचंही काही खरं नाही. तिचं मन तिला कुरतडू लागतं. ती माझ्या वडिलांना भेटायला जाऊया म्हणून चिंत्याला सांगते. पण तो राजी होत नाही. त्यामुळे ती अधिकच खंतावते. या असुरक्षित, अधांतरी नात्यात आपण सुखी होऊ शकणार नाही, हे जाणवून ती चिंत्याला काहीही न सांगता आपल्या घरी निघून जाते..
लेखक-दिग्दर्शक राजीव शिंदे यांनी लिव्ह इन् रिलेशनशिप आणि लग्नसंस्था यांच्यातलं द्वंद्व या नाटकात मांडलं आहे. लिव्ह इन् रिलेशनशिपमध्ये दोघांनाही संपूर्ण स्वातंत्र्य (?) असलं तरी त्यात बांधिलकी ही गोष्ट सोयीनंच येते. कुणीच कुणाला बांधील नसल्यानं नाही पटलं तर सरळ वेगळा मार्ग पत्करण्याची मुभा दोघांनाही असते. पण या नात्यात भावनिक व मानसिकदृष्टय़ा जोडीदारात एखादी व्यक्ती खूपच गुंतली असेल आणि अचानक तो तिला सोडून गेला तर मग त्या व्यक्तीनं करायचं काय? तिचं आयुष्य उद्ध्वस्त होणारच ना? अशा असुरक्षित नात्याचे बंध किती काळ टिकणार? आणि किती वेळा योग्य जोडीदाराच्या शोधात ‘लिव्ह इन्’चा हा मार्ग पत्करणार? ते करूनही सर्वार्थानं अनुरूप, ‘आदर्श’ जोडीदार मिळेलच याची काय शाश्वती? या शोधाशोधीत वय वाढत जाऊन तशीच वेळ पडली तर एकाकी आयुष्य कंठण्याची तयारी असेल तर ठीकच; नाहीतर काय?.. अशा अनेक गहन प्रश्नांची उत्तरं ‘लिव्ह इन्’च्या समर्थकांकडेही नाहीत.              
दुसरीकडे लग्नसंस्थेतील घुसमटीचा मुद्दाही रास्त आहे. चिंत्या अप्पांना लग्नसंस्थेच्या समर्थनावरून एक बिनतोड सवाल करतो : ‘तुम्ही तुम्हाला न आवडणाऱ्या स्त्रीशी सूर न जुळताही आयुष्यभर संसार केलात. त्यातून तुम्ही किंवा ती सुखी झाली का?’ याचं अप्पांनी दिलेलं उत्तर असं : ‘तू म्हणतोयस ते खरंय. या लग्नानं ती किंवा मी- आम्ही दोघंही सुखी झालो नाही. परंतु तिच्या अखेरच्या आजारात मी तिची मनापासून सेवा केली. तिलाही ते जाणवलं. तिनंही जाताना मला माफ केलं.’
अर्थात अप्पांच्या या म्हणण्यानं लग्नसंस्था दोषमुक्त ठरत नसली तरी एक गोष्ट मात्र निश्चितच अधोरेखित होते, की माणसाच्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी काही त्याच्या मनासारख्या होत नाहीत. तेव्हा तडजोड ही आलीच! ‘थोडंसं लॉजिक, थोडंसं मॅजिक’मध्ये लेखक-दिग्दर्शक राजीव शिंदे यांनी हसत-खेळत हे वास्तव मांडलं आहे. त्यांचा स्वत:चा झुकाव जरी लग्नसंस्थेच्या बाजूने असला, तरीही त्यातल्या दोषांचीही त्यांना जाणीव आहे. आयुष्यात काही वेळा विचारांपेक्षा भावनांना महत्त्व देणं गरजेचं असतं, कारण आपण आधी ‘माणूस’ आहोत; ‘यंत्र’ नव्हे! हे नाटकात त्यांनी बिंबवायचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक पात्राचं ठाशीव रेखाटन करतानाच त्यांना ‘स्व-भाव’ देण्यातही ते यशस्वी झाले आहेत. भावनात्मक प्रसंगांबरोबरच नर्मविनोदी प्रसंगही त्यांनी छान खुलवले आहेत. गंभीर प्रसंगांचा शेवट मिश्कील नोटवर करण्याची त्यांची शैली नाटकाला प्रसन्नता देऊन गेली आहे. भावनात्मक प्रसंगही उरबडवेपणापर्यंत ताणायचं त्यांनी टाळलं आहे. नेपथ्यही सुटसुटीत केलं आहे. बाग, घर, बाल्कनी यांचा योग्य वापर त्यांनी केला आहे. नंदलाल रेळे यांचं पाश्र्वसंगीत नाटय़ांतर्गत मूड्स ठळक करतं. रंगभूषेद्वारे कृष्णा बोरकर-दत्ता भाटकरांनी पात्रांना बाह्य़रूप दिलं आहे.
मोहन जोशी यांनी आयुष्यातील कटु-गोड अनुभवांनी पक्व झालेले अप्पा त्यांच्या हुकमी शैलीत वठवले आहेत. अप्पांच्या वरवरच्या विनोदी बोलण्या-वागण्यात, मिश्कीलपणात दडलेली वेदनेची एक किनार सतत जाणवत राहील याची दक्षताही त्यांनी घेतली आहे. शकूच्या भूमिकेत माधवी गोगटे यांनी म्हातारपणीचं नकोसेपणाचं दु:ख आणि प्राप्त परिस्थितीतून आलेलं समंजसपण सहजतेनं व्यक्त केलं आहे. चैतन्यानं भारलेली, ‘लिव्ह इन्’च्या अधांतरी प्रवासात अप्पा-शकूच्या अनुभवी सोबतीमुळे आयुष्याला नव्या जाणिवेनं सामोरी जाणारी जेनी- डॉ. प्रचीती सुरू यांनी उत्कटपणे साकारली आहे. पूर्वग्रहापायी एकांगी, हेकेखोर झालेला, आत्मकेंद्री विचारांच्या तरुणाईचा प्रतिनिधी असलेला चैतन्य त्याच्या राखाडी छटेसह विकास पाटील यांनी नेमका उभा केला आहे.  
प्रचलित सामाजिक विषयावर हसत-खेळत प्रकाश टाकणारं हे नाटक प्रेक्षकांना आवडायला काहीच हरकत नाही.
रवींद्र पाथरे
‘Besharam’ film review: Even Ranbir Kapoor can’t save this one
Besharam, Movie review Besharam, Ranbir Kapoor, Ranbir Kapoor Besharam, Besharam movie review,, Besharam review, Pallavi Sharda, Rishi Kapoor, Neetu Kapoor, Javed Jaffrey, Abhinav, Kashyap, entertainment news
बेसुमार मसालापट
बॉलिवूडच्या रूपेरी पडद्यावर अधूनमधून बडय़ा कलावंतांचे चांगले कथानक असलेले बरे चित्रपट येत असतात. तेव्हा या बडय़ा कलावंतांचे स्टारपद चांगल्या चित्रपटासाठी दिग्दर्शक बाजूला ठेवतो आणि चित्रपट बनवितो. परंतु, असे हाताच्या बोटावर मोजण्याइतके चित्रपट सोडले तर या बडय़ा कलावंतांचे अन्य चित्रपट म्हणजे टाईमपास बिनडोक मसालापट म्हणून झळकतात आणि हे स्टार कलावंत आणखी बडे स्टार होत राहतात. ‘बेशरम’ हाही तद्दन कमर्शियल मसालापट आहे आणि रणबीर कपूरसारखा बडा स्टार कलावंतसुद्धा यात आहे. अ‍ॅक्शन कॉमेडी हा चित्रपट प्रकार आपणही करू शकतो हे दाखविण्याचा प्रयत्न रणबीरने केला आहे. बेसुमार कर्कश संगीताचा मसालापट असे या चित्रपटाचे वर्णन करावे लागेल.
‘ये जवानी है दिवानी’ हा सबकुछ रणबीर असा चित्रपट होता. आता हा आणखी एक सबकुछ रणबीर एके रणबीर असा चित्रपट आला आहे. प्रत्येक चित्रचौकटीत चित्रपटाचा नायक दिसलाच पाहिजे हा लेखक-दिग्दर्शकाचा अट्टाहास इथे आहे. सलमान खान, अजय देवगण यांच्यासारखीचे आपणही अ‍ॅक्शनदृश्ये करू शकतो आणि आणखी बडा स्टार कलावंत बनू शकतो हे जणू रणबीर कपूरला दाखवायचे होते म्हणूनही त्याने हा चित्रपट केला आहे. ढीगभर गाणी, थोडा शोले, थोडा दबंग, थोडा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे अशा चित्रपटांचे वेगवेगळे फॉम्र्युले एकत्र करून लेखकाने गोष्ट रचली आहे.
बब्ली नावाचा अनाथालयात मोठा झालेला अनाथ तरूण गाडय़ा चोरून विकतो आणि त्याचा आणि अनाथालयाचा उदरनिर्वाह चालवितो. टिटू या मित्रासोबत गाडय़ा चोरून विकायच्या आणि अख्खा दिवस पैसे उडवत धमाल करायची, कुणाची तरी टर खेचायची, रस्ताभर नाचायचे असा या दोघांचा नित्यक्रम आहे. बब्लीची गाठ तारा शर्माशी पडते आणि पाहताक्षणी तो प्रेमात पडतो. चोरीच्या गाडय़ा विकणारा तरुण मग प्रेमात पडल्यावर अच्छा आदमी वगैरे बनायचा प्रयत्न करतो.
प्रेमकथेला गाडी चोरीतून उद्भवणारे घोटाळे, चंडोल नावाच्या गुंडांशी हाणामारी, आधी चोर-पोलीसचे नाटय़ आणि नंतर याच पोलिसांच्या साथीने गुंडाचा नि:पात वगैरे तद्दन फिल्मी गोष्टींचा भरणा असलेला हा सिनेमा म्हणजे प्रेक्षक बिनडोक आहे आणि त्याला करमणूक म्हणून काहीही चालते हे गृहित धरून बनविलेला हा चित्रपट आहे.
पल्लवी शारदा ही नवीन नायिका रूपेरी पडद्यावर आली आहे. सबकुछ रणबीर असलेल्या या चित्रपटात नायिकेला फारसे काम नाही. रणबीर-पल्लवी शारदा यांची प्रेमदृश्ये फारशी नाहीतच. त्यामुळे मारधाड-विनोद आणि बब्लीची फिल्मी डायलॉगबाजी यावर दिग्दर्शकाचा सगळा भर आहे. चुलबूल चौटाला आणि बुलबुल चौटाला या पोलीस व्यक्तिरेखांचे जोडपे ऋषी-नीतू सिंग यांनी साकारले आहे. जावेद जाफरीने उभा केलेला हवाला रॅकेट चालविणारा चंडोल भाव खाऊन जातो. बॉलिवूडचे पंजाबी प्रेम आणि दिल्ली-पंजाबमधील दृश्ये, वरचेवर गाण्यांचा तडका देत करमणूक करण्याचा फिल्मी प्रयत्न पडदाभर दिसत राहतो. नऊ-दहा गाण्यांचे भरताड आणि भडक पंजाबी रंग, भांगडा याची रेलचेल असलेल्या या सिनेमाद्वारे आपणही हाणामारी आणि कॉमेडी करू शकतो हे रणबीरने दाखवून दिले आहे. परंतु, रणबीर कपूरची आतापर्यंतची त्याच्या चाहत्यावर्गाच्या मनातली प्रतिमा भेदायचा प्रयत्न करण्याचा धोका त्याने पत्करला आहे. अर्थात बिनडोक, प्रेक्षकशरण सिनेमाचा भाग बनल्यानंतर अनेक कलावंत स्टारपदी पोहोचले आहेतच. त्यामुळे हा सिनेमाही त्या पठडीतला सरधोपट सिनेमा ठरलाय.

बेशरम
निर्माते – हिमांशू मेहरा, संजीव गुप्ता
पटकथाकार – दिग्दर्शक – अभिनव कश्यप
कथा – अभिनव कश्यप, राजीव बरन्वाल
संगीत – ललित पंडित
छायालेखन – मधु व्ॉनियर
कलावंत – रणबीर कपूर, पल्लवी शारदा, नीतू सिंग, ऋषी कपूर, अमितोष नागपाल, हिमानी शिवपुरी, कुणाल अग्रवाल, कमल किरी, मोहन कपूर, विशाल सिंग, जावेद जाफरी व अन्य.