‘इचलकरंजी जनता बँकेच्या वतीने महिला बचतगटांना कर्ज देऊ’

कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेच्या वतीने सक्षम आणि उद्योग उभारणाऱ्या महिला बचतगटांना १० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची तयारी आहे.

कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेच्या वतीने सक्षम आणि उद्योग उभारणाऱ्या महिला बचतगटांना १० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची तयारी आहे. यासाठी बचतगटांनी पुढे यावे. तसेच महिलांना अत्याधुनिक शटललेस व अन्य यंत्रमागावर काम करण्यासाठी प्रशिक्षणही दिले जाईल, असे प्रतिपादन माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे यांनी केले.     
बँकेच्या अल्पबचत गट विभागामार्फत बचत गटाला प्रत्येकी २ लाख रुपये कर्ज मंजुरीचे पत्र व आधार कार्डच्या सेव्हिंग्ज खाते पासबुक वितरण अशा संयुक्त कार्यक्रमात आवाडे बोलत होते. बँकेचे डेप्युटी जनरल मॅनेजर विजय कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जनरल मॅनेजर पी.टी.कुंभार यांना जानेवारी २००९ पासून विविध महिला बचत गटांना केलेले अर्थसाहाय्य व बचत गटांच्या कार्याचा आढावा घेतला. अध्यक्ष अशोक सौंदतीकर यांनी या योजनेतून अनेक महिलांना लघुउद्योगाचा फायदा झाल्याचे नमूद केले.    
या वेळी विविध महिला बचतगटांच्या प्रतिनिधींनी बँकेच्या अर्थसाहाय्यामुळे झालेली मदत व त्यातील झालेली उद्योगाची प्रगती याबाबत विचार मांडले. कार्यक्रमात दोन लाख रुपये कर्ज मंजूर झालेल्या बचतगटांना तसेच आधार कार्डशी संलग्न पाच सेव्हिंग्ज खात्याचे पासबुक वाटण्यात आले.    
या वेळी बँकेचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, संचालक राजेश पाटील, पांडुरंग बिरंजे, सुनील कोष्टी, प्रमोद बरगे, राजेंद्र बचाटे, सुजाता जाधव, आशादेवी लायकर, शाखेचे व्यवस्थापक नंदू कांबळे आदी उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Loan will give to women saving groups by ichalkaranji janata bank

ताज्या बातम्या