येऊरचे जतन करण्यासाठी लोकचळवळ उभारणार

ठाणे शहराचे नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवणाऱ्या येऊरचे जतन करण्यासाठी लोकचळवळ उभारण्याचा निर्धार रविवारी ठाण्यात पार पडलेल्या ‘लोकसत्ता ठाणे’च्या वाचक मेळाव्यात करण्यात आला.

ठाणे शहराचे नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवणाऱ्या येऊरचे जतन करण्यासाठी लोकचळवळ उभारण्याचा निर्धार रविवारी ठाण्यात पार पडलेल्या ‘लोकसत्ता ठाणे’च्या वाचक मेळाव्यात करण्यात आला. येऊर परिसराला लागलेले ‘काचांचे ग्रहण’, येथील अस्वच्छता, आदिवासींची हलाखीची परिस्थिती याला अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी मेळाव्यात वाचा फोडल्यानंतर सर्वच मान्यवरांनी येऊरसाठी एक दिवस देण्याची ग्वाही एकमुखाने दिली.
‘लोकसत्ता ठाणे’ आवृत्तीच्या निमित्ताने ठाण्यात पार पडलेल्या या वाचक मेळाव्यात बोलताना अनासपुरे यांनी येऊरमधील समस्या मांडल्या. ‘‘ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या वतीने महिन्याभरापूर्वी शहरातील गरीब वस्तीतल्या मुलांसाठी ‘वंचिताचा रंगमंच’ हा उपक्रम राबवण्यात आला होता. या उपक्रमामध्ये येऊर येथील लहान मुलांनी तेथील समस्यांवर आधारित नाटक सादर केले होते. ‘भारत कचरामुक्त करा, मात्र आधी येऊर काचमुक्त करा’ अशी मागणी या मुलांनी आपल्या नाटय़छटेतून केली होती. हे पाहिल्यानंतर मला अत्यंत वेदना झाल्या,’’ असे अनासपुरे म्हणाले. वाचक मेळाव्यास जमलेल्या वाचकांना यासाठी लोकचळवळ राबवण्याचे आवाहन त्यांनी केले.  
शहरात राहणारे नागरिक चांगल्या सुविधांमुळे आधुनिक जीवनशैलीत जगत असतात. मात्र त्याच वेळी जवळच्या येऊरसारख्या आदिवासी पाडय़ांवरील आदिवासींना अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून येऊर सुधारण्याची गरज आहे. ठाण्यातील अनेक सामाजिक संस्थांची येऊरमध्ये कामे सुरू आहेत. या सगळ्यांना एकत्र करून त्यांच्या मदतीने आदिवासींसाठी काम करता येऊ शकते. कुडाच्या आणि बांबूच्या घरांमध्ये राहणाऱ्या या लोकांसाठी सिमेंट, विटांची घरे बांधण्याचा प्रयत्न करू या. तेथील समस्यांचे नियोजन करण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकते. अशा प्रकारचा विचार आपल्या डोक्यात आला आणि आपण त्याप्रमाणे अंमलबजावणी केल्यास हे जगासमोर एक चांगले उदाहरण निर्माण होऊ शकणार आहे.  या वेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, आमदार संजय केळकर आणि अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनीही अनासपुरे यांच्या आवाहनाला पाठिंबा दिला. येऊरचे जतन, संवर्धन करण्यासाठी निर्माण होणाऱ्या या लोकचळवळीला ‘लोकसत्ता’चा पूर्ण पाठिंबा व सहभाग असेल, असे ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी या वेळी सांगितले.
नियोजनबद्ध विकासातच ठाण्याचे भवितव्य!
झपाटय़ाने वाढणाऱ्या नागरीकरणातही स्वत:ची ऐतिहासिक ओळख, संस्कृती, परंपरा आणि निसर्गसौंदर्य ठाणे शहराने आजही जपून ठेवले आहे. मात्र, विकासाच्या नावाखाली होणाऱ्या बांधकामांच्या रेटय़ात आणि राजकीय/प्रशासकीय आशीर्वादाने होणाऱ्या अनधिकृत बांधकामामुळे या शहराची अवस्था ‘क्षमतेपेक्षा जास्त धान्य भरलेल्या गोणीसारखी’ होईल, असे मत ‘लोकसत्ता ठाणे’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वाचक मेळाव्यात मान्यवरांनी व्यक्त केले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, आमदार संजय केळकर, अभिनेते मकरंद अनासपुरे आणि चिन्मय मांडलेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रंगलेल्या या परिसंवादात सर्वानीच ठाणे शहराच्या नियोजनबद्ध विकासाची गरज मांडली. त्याचबरोबर शहराच्या विकासामध्ये योगदान देण्याचा निर्धारही व्यक्त केला.

मराठीपण जपण्यासाठीच..
चिन्मय मांडलेकर
मी मूळचा गिरगावकर. माझा जन्मही तेथलाच. आयुष्याची १५ वर्षे तिथेच घालवली. साधारणपणे गिरगावाच्या बाहेर जग असते, याची माहितीच नव्हती. लहानपणी मला राहून राहून वाटायचे की सगळ्यांचा जन्म गिरगावात होतो. लोक येथे जन्म घेतात आणि मग बाहेर जातात, असे वाटत राहायचे. आजही गिरगावाशी ही नाळ जोडलेली आहे. आजी आणि मामाचे घर अजूनही तेथेच आहे. शाळा संपल्यानंतर आम्ही अंधेरीला राहायला गेलो. पाल्र्यात माझे महाविद्यालय होते. त्यामुळे महाविद्यालयीन काळ पाल्र्यात गेला. अंधेरी, पार्ले, गिरगाव या भागांतील संस्कार माझ्यावर झाले. तसेच दादरच्या ‘संवेदना ग्रुप’मधून थिएटर करायला लागलो. मराठी वस्ती आणि मराठी भाषा बोलली जाते, अशा ठिकाणी राहायला मिळाले. त्यामुळे माझ्या रक्तामध्ये ‘मराठी’पण भरून राहिले आहे.
लग्नानंतर कांदिवली येथील ठाकूर व्हिलेज परिसरात राहायला गेलो. ती वस्ती तशी फार सुंदर आहे. गणपतीचे दिवस होते. आमच्या घरी दीड दिवसांचे गणपती येतात. त्याची भरपूर तयारी असते. त्यामुळे अंधेरी, दादर किंवा पाल्र्याच्या बाजारात जाण्याऐवजी खरेदीसाठी कांदिवलीमध्ये गेलो. पण तिथे जास्वंदीचे फूल नव्हते. झेंडूची फुले होती. तेव्हा मी प्रांतवादी नव्हतो, पण त्या दिवशी मला तसे वाटले. गणपतीसाठी जास्वंद मिळणार नसेल तर इथे राहायचे नाही, असा निर्णय मी घेतला आणि ठाण्यात स्थायिक झालो. मी नाटकात काम करतो आणि सर्वाधिक नाटय़गृहे मध्य रेल्वे मार्गावरील आहे. त्यामुळे इतरांना होतो तेवढा वाहतूक कोंडीचा त्रास मला जाणवत नाही. याापूर्वी अंधेरीत राहात होतो. ठाणे शहर लांब कुठे तरी आहे असा बाऊ करणाऱ्यांचे मला हसू येते. उलट ठाण्यातून सुलभ प्रवास होतो. ज्येष्ठ रंगकर्मी सत्यदेव दुबे नेहमी म्हणायचे, ‘ज्याला स्वत:ची भाषा नीट येत नाही, तो दुसऱ्याची भाषाही धड बोलू शकत नाही’. त्यांच्या या वाक्याचा माझ्यावर जबरदस्त पगडा राहिला आहे. त्यामुळे माझ्या मुलांनी मराठीत बोलावे, असा माझा आग्रह असतो. ठाण्यात हे ‘मराठी’ संस्कार त्यांच्यावर होतील, असा विश्वास मला आहे.
‘विकास’ ही संकल्पनाच फसवी
पूर्वी येथे यायचो तेव्हा वाघबीळ, कापूरबावडी परिसरात हिरवीगर्द झाडे दिसायची. आता ती दिसत नाहीत. थेट चायना ब्रिजपर्यंत बांधकामे होताना दिसतात. त्यामुळे या तथाकथित विकासाची भीती वाटू लागली आहे.  नागरीकरण हा शहरांचा गुणधर्म आहे. तरीही ‘विकास’ म्हणजे काय हे पुन्हा तपासून घेण्याची गरज आहे. शहराचा आराखडा निश्चित असायला हवा आणि त्यावर योग्य प्रकारे काम व्हायला हवे. प्रशासन आणि राजकीय पक्ष लक्ष देतील. ‘विकास’ नावाची संकल्पनाच मुळात फसवी आहे. या संकल्पनेच्या आधारे राजकीय नेते मत मागतात, पण प्रत्यक्षात काहीच होत नाही. ठाण्यासारख्या शहरात नव्याने विकासाच्या मागे धावण्याऐवजी आहे ते जपण्यावर फोकस केला तर आपण नक्कीच समस्यांच्या मुळाशी जाऊ.

कलावंत निसर्गाजवळच बहरतो..
मकरंद अनासपुरे
कलावंत म्हणजे भटक्या विमुक्त जमातीचे असे मानले जाते. कारण त्यांचा ठिकाणाच नसतो. आज इथे उद्या तिथे, परवा आणखी कुठे तरी असे सुरू राहते. मी मूळचा मराठवाडय़ाचा. १९९४ पासून मुंबईत राहिलो आहे. पुढे मुंबईतील विविध भागांमध्ये माझे  राहणे झाले, कारण तो संघर्षांचा काळ होता. सुरुवात नरिमन पॉइंटच्या आमदार निवासापासून झाली. पुढे लग्न झाल्यानंतर स्थिरस्थावर होण्यासाठी ठाण्यात घर घेतलं आणि गेल्या आठ वर्षांपासून मी ठाणेकर आहे.
 सुरुवातीला गोरेगावला राहण्याचा प्रयत्न केला होता. फिल्मसिटीच्या जवळ राहण्याची ती संकल्पना असली, तरी कालांतराने त्या भागामध्ये इतके शहरीकरण झाले, की घराच्या हॉलमधून दिसणारी हिरवी टेकडीच नष्ट झाली. दोन मिनिटांच्या अंतरासाठी दीड ते दोन तास लागू लागले. ही सगळी समस्या जाणून मुंबईपेक्षा ठाणेच बरे असा विचार आला. १० किलोच्या पिशवीमध्ये १५ किलोचे धान्य भरल्याप्रमाणे मुंबईची परिस्थिती बनली असून, त्याच्या पलीकडे आता तिथे राहणेच अशक्य आहे.  
ठाण्याच्या घोडबंदर परिसराचा विचार केल्यास हा भाग निसर्गाच्या जवळ आहे. शिवाय त्या भागाचा नियोजित विकाससुद्धा झाला आहे. एखादी वाढलेली वस्ती कमी करताना अडथळा येत असला, तरी एखाद्या गोष्टीचे नियोजन झाले तर तिथली वस्ती वाढून वाढून किती वाढणार आहे, याचा अंदाज येऊ शकतो. ठाण्याच्या सगळ्या गोष्टींचा सर्वागाने विचार केल्यानंतर ठाणे हे चांगले शहर आहे, यावर आमचे शिक्कामोर्तब झाले. शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्टय़ासुद्धा सगळ्या गोष्टी इथे उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा सहवास इथे आहे. तसा मराठीपणाचा सुगंधसुद्धा इथे आहे. खाद्यसंस्कृतीला जागणारे हे शहर शाकाहारी आणि मांसाहारी यांचेसुद्धा चांगले पर्याय इथे उपलब्ध आहेत.
राजकारणी, बिल्डरांचं ‘प्लॅनिंग’ थांबावं!
राजकीय मंडळी आणि बिल्डर यांच्या भ्रष्ट युतीचं काय करायचं, हा प्रश्न आहे. बिल्डिंग बेकायदा बांधायच्या व नंतर त्या मंजूर करायच्या याला कसलं ‘प्लॅनिंग’ म्हणायचे. मालमत्ता कराच्या पावत्यांवर अनधिकृत बांधकाम असे लिहिले जाते. त्यांनाही टॅक्स भरावा लागतो.  माणूस माणसापासून दूर जाण्याचे कारण ते आहे. सोसायटीच्या कचऱ्याच्या ढिगाला वळसा घालून माणसं घरी जातात. त्यात आपण का पडा, असा भाव असतो.
लोकसहभाग हा आत्यंतिक गरजेचा
 लोकसहभाग म्हणजे भोवतालच्या परिस्थितीबद्दल आपण सजग असणे, परिसरातील बऱ्यावाईट घटनांकडे आपले बारीक लक्ष असल्याशिवाय तरणोपाय नाही. राजकीय माणसांची दृष्टी पाच वर्षांची बनवली आहे. हे सोडून सगळ्यांनीच चांगले प्रयत्न करण्याची गरज आहे. गर्दीमुळे असुरक्षितता वाढली आहे. ही असुरक्षितता माणसांनीच दूर केली पाहिजे.
‘रस्ते राजकारणी बांधतात’
 ऑस्ट्रेलियात अनेक रस्ते, टोल यंत्रणांची उभारणी भारतीय नव्हे तर ठाणेकर विजय जोशी यांनीच केली आहे. मात्र त्यांना ‘भारतात तुम्ही असे का करत नाही,’ असे विचारल्यावर इथे अभियंते रस्ते बांधत नाहीत, तर राजकारणी रस्ते बांधतात, असे उत्तर दिल्याची आठवणही मकरंद अनासपुरे यांनी यावेळी सांगितली.

ठाणे.. सांस्कृतिक.. तरीही आधुनिक
डॉ. अनिल काकोडकर
मी पाच वर्षांपूर्वी सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर ठाण्यात राहायला आलो. माझी कर्मभूमी भाभा अणुशक्ती केंद्र (बीएआरसी) असल्याने सेवानिवृत्तीनंतर याच परिसरात माझे वास्तव्य असावे अशी माझी इच्छा होती. त्यामुळे राहण्यासाठी जागा कोठे निवडावी, यासाठी माझ्यापुढे दोन पर्याय होते. एक  नवी मुंबई आणि दुसरे अर्थातच ठाणे. ज्येष्ठ नागरिकांच्या वास्तव्यासाठी मुंबई हे शहर ‘क्रुएल’ (क्रूर) असल्याचे माझे पहिल्यापासून मत आहे. ठाण्यात माझी बहीण राहते. त्यामुळे या शहरात सतत येणे-जाणे असायचे. मुंबई शहरात दोन किंवा तीनच अशा जागा आहेत, जेथे परंपरा आणि आधुनिकता यांचा एक संगम दिसून येतो. त्यापैकी एक म्हणजे ठाणे तर दुसरे पार्ले. डोंबिवलीतही असेच काहीसे चित्र आहे. ठाण्याचे परंपरांचे जतन केले जाते, तरीही हे शहर रूढीवादी नाही.
‘राजकारण्यांची दृष्टी केवळ पाच वर्षांचीच’
ठाणे शहर झपाटय़ाने वाढत असून त्याचे नियोजन झाले पाहिजे. शहराचा एक आराखडा असतो तसा ठाण्याचाही आहे. आरखडय़ात मोठमोठय़ा गोष्टी असतात, मात्र त्या अनवधानाने वा मुद्दमपणे राहून जातात. त्यामुळे शहराचे नियोजन करताना काळजीपूर्वक केले पाहिजे.ठाणे शहराला तलाव व खाडी लाभलेली असून तिथे ‘वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट’ योजना राबविली तर उद्यान व मनोरंजनाची समस्या सुटेल. ठाण्यात सायन्स सेंटर उभारण्यात येत आहे. त्याचा निश्चितच फायदा होईल.  राजकीय लोकांची दृष्टी पाच वर्षांची तर व्यापाऱ्यांची त्याहून कमी असते. शहराचा विकास इतक्या कमी कालावधीत होऊ शकत नाही. केवळ लांबच्या टप्प्यांची आखणी करून नियोजन करणे तितकेसे योग्य होणार नाही. विकासाचे लहान लहान टप्पेही आखले जायला हवेत. त्यामुळे ठाणे शहराचा नियोजनबद्ध विकास करायचा असेल तर पुढील दहा ते पंधरा वर्षांचा दीर्घकालीन विचार करूनच नियोजन आखले पाहिजे, शिवाय काही ठरावीक टप्प्यांच्या योजनांची आखणीही करायला हवी. या नियोजनाकरिता शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञ मंडळींची ‘थिंक टँक’ गरजेची आहे.

मुंबईची सावली म्हणणे साफ चुकीचे!
संजय केळकर
मी अस्सल ठाणेकर असून आमच्या कुटुंबातील चौथ्या पिढीचे प्रतिनिधित्व करत आहे. जन्म इथला, त्यामुळे एक चांगल नाते या शहराशी असून इथल्या गावावर आणि शहरावर प्रेम राहिले आहे. ठाण्याबद्दल सांगण्यासाठी खूप गोष्टी असून मुंबईची सावली म्हणून ठाण्याला असलेली ओळख ही संकल्पनाच राग आणणारी अशी आहे. कारण, ठाणे हे स्वतंत्र परिपूर्ण, समर्थ आणि समृद्ध असे शहर आहे. सगळ्या घटकांचा समावेश ठाण्यामध्ये आहे. ठाण्याची भौगोलिक रचना ही एक ऐतिहासिक शहर अशीच आहे. शैक्षणिक हब जरी ठाण्यात नसले तरी इतर सगळ्या गोष्टी ठाण्यात आहेत. संशोधनाच्या क्षेत्रातील काकोडकर ठाण्यात राहतात. तर नवे संशोधकसुद्धा ठाण्यात राहतात. चिल्ड्रन टेक सेंटरच्या माध्यमातून रोबोंविषयीचे संशोधन होते. तलावांचे शहर तितकेच खेळाडूंचे शहर अशीही ठाण्याची ओळख आहे. २०२ तलावांची संख्या कमी झाली असली तरी खेळाडूंचे शहर ही ओळख मात्र कायम आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून स्पर्धा होत असतात. राष्ट्रीय, अंतराष्ट्रीय खेळाडू ठाण्यातून घडले. अजिंक्य राहणेसुध्दा ठाण्यातून खेळत मोठा झाला. कलाकार, लेखक, संपादक ठाण्यात राहत असून ही आनंदायी बाब आहे. अनेक चळवळी येथे जन्मास आल्या. हेमलकसासारख्या सेवाभावी प्रकल्पाला कलेच्या सादरीकरणातून पैसे उभारून सुमारे १५ लाखांचा निधी तेथे पाठवण्यात आला होता. असे वेगळे उदाहरणसुद्धा ठाण्याने दिलेले आहे. ठाण्याचे वेगळेपण निर्माण होण्याची गरज आहे. सांस्कृतिक राजधानीच्या दाव्यामध्ये आपण अडकून पडणार नसलो तरी वर्षभर विविध कार्यक्रमांची मोठी रेलचेल इथे असते. व्याख्याने, मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहून रसिक प्रेक्षकसुद्धा काहीसे बुचकळ्यात पडतात. इथे त्यांना चांगल्या कार्यक्रमाचा पर्याय निवडता येत असतो. चित्रकलेपासून शिल्पकलेपर्यंत, फोटोग्राफी, सामाजिक क्षेत्र, ज्येष्ठ नागरिक संघ, लहान मुलांच्या संस्था, जागरूक नागरिक या सगळ्यांच्या माध्यमातून ठाणे घडवले आहे. त्यामुळे ठाण्यातला एक गावपण आहे.
मराठी ग्रंथसंग्रहालयासाठी शंभर वर्षांपेक्षा मोठी परंपरा असलेले संग्रहालय ठाण्यात आहे. जुन्या ठाण्याप्रमाणे नवे ठाणेसुद्धा बहरत आहे. त्यामुळे त्यांचे जुनेपणही जपणे गरजेचे आहे.  

राजकारण्यांनी जबाबदारीने वागावे
ठाण्याची परिस्थती अशीच राहील का या विषयी चिंता व चिंतन करण्याची गरज आहे. ठाण्यातील राजकीय परिस्थितीमध्ये बदल होत असून पूर्वी इतका समन्वय सध्याच्या पिढीमध्ये कमी होत जात असल्याचे जाणवत आहे. मात्र राजकीय व्यक्तींना या पुढील काळात अधिक जबाबादरीने वागण्याची गरज आहे. त्याच प्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळांनी आपली क्षेत्र प्रगत करण्याची गरज आहे. त्यामध्ये राजकारण केल्यास त्याचा खेळखंडोबा होऊ शकतो. राजकीय व्यक्तींना दोष देण्याबरोबरीने प्रशासनातील व्यक्तींनासुद्धा या गैरप्रकारांना जबाबदार धरण्याची गरज आहे. अनेक वेळा महापौरांपेक्षा अधिक अधिकार महापालिका आयुक्तांनाच असतो. राजकीय व्यक्ती वेगळ म्हणत असतात अशा वेळी प्रशासनातील व्यक्ती वेगळेच काही तरी करून टाकतात. त्यामुळे त्यांच्याकडेही ही जबाबदारी असते. यासाठी जागरूक नागरिकांप्रमाणेच लोकांमधील तज्ज्ञांचा शहराच्या विकासात सहभाग करून घेणे गरजचे आहे. या शहरासाठी आवश्यक गोष्टींत शैक्षणिक सुविधांची कमतरता भासत असून पालिका शैक्षणिक संस्थांसाठी भूखंड उपलब्ध करून देत आहे.

केजीपासून पदवीधर होण्यासाठी आवश्यक शैक्षणिक संस्था उपलब्ध व्हाव्यात यासाठी महापालिकेने मुंबई विद्यापीठाच्या उपकेद्रासाठीही जागा उपलब्ध करून दिली आहे. येथील मैदानांचा वापर व्यापारीपेठांपेक्षा खेळांसाठी जास्तीत जास्त होण्याची गरज आहे. शहराच्या वाढीप्रमाणेच मैदाने आणि उद्यानांची संख्यासुद्धा वाढणे आवश्यक आहे. राजकीय इच्छाशक्ती असेल तर हे सगळे शक्य होऊ शकेल.

लोकसहभाग हवाच.
लोकसहभाग गरजेचा आहे. काठावर बसून बोलणारी माणसे शंभर आहेत, मात्र काठावरून उतरून काम करणारी खूपच कमी आहे. त्यामुळे लोकसहभागातून काम होण्याची गरज आहे. बस स्थानकाच्या स्वच्छतेसारखे उपक्रम सुरू झाले आहे. लोकसहभाग वाढवण्याची गरज आहे. केवळ रचनात्मक कार्यापुरता हा मर्यादित न ठेवत जेथे गैर गोष्टी घडत आहेत, तिथे विरोधात उभे राहण्याची गरज आहे. जिथे राजकीय शक्ती कमी पडते त्या ठिकाणी जागरूक लोकांच्या गटाने काम करणे गरजेचे आहे. ठाण्यात याची कैक उदाहरणे आहेत. ठाण्यातील प्रदूषणाकारी कंपन्या कधीच गेल्या नसत्या, मात्र लोकांच्या विरोधामुळे हे शक्य झाले. प्रत्यक्ष समस्येने ग्रस्त व्यक्ती प्रत्यक्ष रस्त्यावर उतरतो त्याचा प्रभाव प्रशासनावर पडत असतो. जागरूक नागरिकांनी संर्घष करावा; परंतु त्याचा अतिरेक करू नये. अनधिकृत बांधकाम सरसकट तोडून टाका, असे म्हणून चालणार नाही.

‘लोकसत्ता ठाणे’चा हा अनोखा उपक्रम खूपच छान आहे. या कार्यक्रमामध्ये मकरंद अनासपुरे यांनी सांगितल्याप्रमाणे शहराच्या विकासामध्ये लोकसहभागाचे महत्त्व आम्हाला आज खऱ्या अर्थाने जाणवते. लोकसत्तासारखे वृत्तपत्र कायमच नागरिकांचे प्रतिनिधित्व करते आणि समस्या प्रशासनापर्यंत पोहचवते. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
 -वंदना प्रधान

लोकसत्ता आणि आमचे नाते हे फार वर्षांपूर्वीचे आहे. या वृत्तपत्राने नेहमीच कोणताही पक्षपातीपणा न करता लोकहितासाठीच काम केले आहे. या कार्यक्रमामध्ये ठाण्यातील विविध क्षेत्रांतील मंडळींना एकत्रपणे ऐकण्याची संधी ‘लोकसत्ता’मुळे मिळाली. ठाण्यातील समस्या आणि त्यावरील उत्तम उपाययोजना काकोडकरांनी सुचवल्या. भविष्यातही असे दर्जेदार परिसंवाद  ‘लोकसत्ता ठाणे’ ने आयोजित करावेत.  
– मीरा रणदिवे
 
ठाण्यासारख्या विकसनशील शहराला अशा एका स्वतंत्र माध्यमाची गरज होती. ‘ठाणे’ हे स्वतंत्रपणे अधोरेखित करणारे ‘लोकसत्ता ठाणे’ हे पहिलेच सहवृत्तपत्र आहे. डॉ. काकोडकर, चिन्मय मांडलेकर, मकरंद अनासपुरे आणि संजय केळकर अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींचे आपल्या शहराबद्दलचे स्पष्ट मत ऐकण्याची संधी ‘लोकसत्ता’मुळे मिळाली. आजच्या परिसंवादामुळे आपल्या शहराच्या विकासामध्ये सहभागही महत्त्वाचा आहे, हे प्रकर्षांने जाणवले. ठाणे शहराच्या विकासामध्ये ‘लोकसत्ता ठाणे’सारख्या सहवृत्तपत्राने पुढाकार घेतला तर नक्कीच या विकासाला गती मिळेल, असे मला वाटते.
-नैनेश पाटणकर

ठाणे हा गाव आणि शहर संस्कृतीचे एक संगम आहे. झपाटय़ाने वाढणाऱ्या ठाणे शहाराला त्याचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी लोकसत्तासारख्या नि:पक्षपाती वृत्तपत्राने पुढाकार घेणे, यांसारखी दुसरी चांगली गोष्ट नाही. ‘लोकसत्ता ठाणे’ या सहवृत्तपत्रास उत्तरोत्तर असाच प्रतिसाद मिळो. ठाण्यातील स्थानिक कलाकार, शास्त्रज्ञ, आणि राजकारणी यांचा एकत्रित परिसंवाद ऐकताना ठाण्याच्या चांगल्या वाईट गोष्टी समोर आल्या. त्यावर एक जागृत ठाणेकर म्हणून ठाणे शहराच्या विकासात माझाही खारीचा वाटा असावा असे मला वाटते.
-श्रीश ब. जोशी

या सर्व दिग्गज मान्यवरांच्या संवादावरून ठाणे शहरात उद्यानांचा अभाव असल्याचे समोर आले. मात्र त्याचबरोबरच पर्यटनाविषयीसुद्धा ठाणे परिसरात उदासीनता आहे. परिसरातील पर्यटन स्थळांचाही विकास व्हावा, असे वाटते. ‘लोकसत्ता’सारख्या वृत्तपत्राने पुढाकार घेतला तर त्याला चालना मिळू शकेल. भविष्यातही लोकसत्ता ठाणे शहराचा निर्भीड चेहरा असेल. आमच्या शुभेच्छा आहेत.   
– अ‍ॅड. स्वाती दीक्षित

चाळीस वर्षे मी ‘लोकसत्ता’चा वाचक आहे. ‘लोकसत्ता’ने सुरू केलेला ‘लोकसत्ता ठाणे’ हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. पुरवणीपेक्षा ठाण्यासाठी वृत्तपत्र सुरू झाल्याचा आनंद वाटतो. या नव्या वृत्तपत्रात खूप छान सदर सुरू झाले असून ठाण्याचे अंतरंग यातून उलगडले आहेत. ‘ठाणेच का’ हा कार्यक्रम करून सर्वच क्षेत्रातल्या मान्यवरांना आमंत्रित केल्याने बऱ्याच घडामोडींवर प्रकाश टाकण्यात आला. भविष्यात प्रश्नांवर तोडगा निघू शकेल.
    – प्रसाद दीक्षित, ठाणे.

ठाणे पुरवणीपेक्षा लोकसत्ता ठाणे हे स्वतंत्र वृत्तपत्र सुरू केले ही एक ठाणेकर म्हणून माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे, त्यासाठी मी लोकसत्ताचे खूप आभार मानतो. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या परंतु ठाणेकर असणाऱ्या दिग्गजांना एकाच व्यासपीठावर बोलवून ठाणे का निवडले व ठाण्याचे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले प्रश्न ऐकून वाचक म्हणून आमची जबाबदारी वाढली आहे. तसेच लोकसत्ताने माध्यम म्हणून ठाण्याच्या समस्यांसाठी घेतलेला पुढाकाराचे निश्चितच मी स्वागत करतो. वाचक म्हणून आम्हीही पुढाकार घेऊन इथून पुढे लोकसहभागाच्या माध्यमातून सहाय्य करू.
– प्रसाद सहस्रबुद्धे, ठाणे.

लोकसत्ता ठाणेच्या माध्यमातून यापुढे उभ्या केलेल्या प्रश्नांना राजकारण्यांनी गांभीर्याने घ्यावे. तसेच राजकारण्यांनीही विकास कामे करताना दूरदृष्टीने निर्णय घ्यावेत, ज्याची त्यांच्यात कमतरता आढळून येते.
तसेच या नव्या अंकात लोकसत्ताने ठाणे स्थानक परिसरातील फेरीवाले, गर्दी, शहरातील अनधिकृत बांधकामे आदींचे विषय घेऊन त्यांच्याबद्दल आवाज उठविणे अपेक्षित आहे. तसेच पुढील काळात ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये उपस्थित झालेल्या प्रश्नांचा माग काढून त्यावर वारंवार आवाज उठवावा हीदेखील आमची अपेक्षा आहे. लोकसत्ता ठाणेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.
– मनोज कदम, ठाणे.

लोकसत्ताची मी खूप जुनी वाचक असून ठाण्यासाठी सुरू केलेले हे स्वतंत्र वृत्तपत्र पाहून छान वाटले. या कार्यक्रमाच्या रूपाने राजकीय पुढारी व माध्यमे आणि कलाकार यांनी एकत्र येऊन ठाण्यातील येऊर, उद्याने व ठाण्यातील तलाव यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी घेतलेला पुढाकार स्वागतार्ह आहे. यांमुळे ठाण्यातील प्रश्न मार्गी लागू शकतील. लोकसहभागाच्या माध्यमातून स्थानिक लोक प्रतिनिधींना आम्ही मदतच करू. लोकसत्ता ठाणेने सुरू केलेले नवीन सदर मला मनापासून आवडली आहेत. असेच नवे काही इथून पुढे वाचायला नक्की आवडेल.
अश्विनी पटवर्धन, ठाणे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta thane vachak melava