मुंबईत वक्तृत्व स्पर्धेचा जागर रंगला!

‘काही बोलायचे आहे’ अशी इच्छा असणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनातील विचारांना मंगळवारी व्यासपीठ मिळाले. ‘लोकसत्ता’ आयोजित ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ वक्तृत्व स्पर्धेतील मुंबई विभागीय प्राथमिक फेरीचा जागर मंगळवारी मुंबईत रंगला.

‘काही बोलायचे आहे’ अशी इच्छा असणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनातील विचारांना मंगळवारी व्यासपीठ मिळाले. ‘लोकसत्ता’ आयोजित ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ वक्तृत्व स्पर्धेतील मुंबई विभागीय प्राथमिक फेरीचा जागर मंगळवारी मुंबईत रंगला. ‘एक्स्प्रेस टॉवर’मध्ये झालेल्या या स्पर्धेत मुंबई शहर आणि उपनगरातील विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. ‘नाथे समूह’प्रस्तुत आणि ‘पृथ्वी एडिफाइस’ व ‘भारतीय आयुर्विमा महामंडळ’ यांच्या सहकार्याने तसेच ‘जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड’ व ‘तन्वी हर्बल’ यांच्या मदतीने ही स्पर्धा पार पडली.
आजच्या तरुण पिढीला सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करण्याची संधी मिळत असली तरी एखाद्या विषयावर थेट बोलण्याची संधी तशी कमीच मिळते. या तरुण पिढीमधून उत्तम वक्ते घडावेत, त्यांना आपले विचार मांडण्याचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ‘लोकसत्ता’ने संपूर्ण राज्यभरात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.
मुंबई विभागाच्या प्राथमिक फेरीत सहभागी झालेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी काही जण आपण तयार केलेल्या भाषणाची पुन्हा पुन्हा उजळणी करत होते. तर काही विद्यार्थी आपल्या आधीच्या विद्यार्थ्यांने कसे भाषण केले, तो कुठे कमी पडला हे पाहून आपल्यात काही सुधारणा करण्याची धडपड करताना दिसत होते. ‘सामाजिक चळवळींचा राजकीय परिणाम’, ‘अतिसंपर्काने काय साध्य’, ‘जगण्याचे मनोरंजनीकरण’, ‘आपल्याला नायक का लागतात?’, ‘जागतिकीकरणात देश संकल्पना किती सुसंगत?’ असे विषय स्पर्धकांना देण्यात आले होते. या विषयांवर विद्यार्थी स्पर्धकांनी आपले विचार मनमोकळेपणाने व्यक्त केले. काही जणांच्या देहबोलीतून आणि बोलण्यातून प्रचंड आत्मविश्वास जाणवत होता. ‘जगण्यासाठी मनोरंजन की मनोरंजनासाठी जगणे याचा ताळमेळ घातला गेला पाहिजे’, असंतोषातून सामाजिक चळवळ उभी राहते किंवा ‘सामाजिक चळवळींनी तयार केलेला जनाधार राजकीय पक्ष आणि नेते वापरून स्वत:च्या पोळ्या भाजून घेतात’, ‘माध्यमांना आपण वापरतो की माध्यमे आपल्याला वापरतात’ अशी मते विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. बहुतांश विद्यार्थ्यांनी ‘जगण्याचे मनोरंजनीकरण’, ‘सामाजिक चळवळींचा राजकीय परिणाम’, ‘आपल्याला नायक का लागतात?’ या विषयांवर आपली मते मांडली. कवितांच्या ओळी, शब्दांच्या कोटय़ा करत आपल्या भाषणाला अधिक रंगतदार करणे, थोरा-मोठय़ांच्या प्रसिद्ध विधानांचा चपखल दाखला देत विद्यार्थी आपले भाषण कसदार करण्याचा प्रयत्न करत होते.

मुंबई विभागीय पातळीवरील प्राथमिक फेरीतील स्पर्धकांच्या प्रतिक्रिया
* संजय दाभोळकर- लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धा हे महाविद्यालयीन तरुणांच्या कलागुणांना वाव देणारे उत्तम व्यासपीठ आहे. विषयांची निवडही प्रासंगिक आणि योग्य होती.
* सुस्मिता भदाणे- विषय खूप वेगळे आणि चांगले होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील वक्तृत्व कलेला उत्तेजन देणारी ही स्पर्धा आहे. आम्हाला याचा भावी आयुष्यात नक्कीच उपयोग होईल.
* शुभम सुर्यवंशी- विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व आणि नेतृत्व गुणांची जोपासना करणारा लोकसत्ताचा हा उपक्रम अत्यंत स्तूत्य आहे. स्पर्धेसाठी निवडण्यात आलेले विषयही चौफेर विचार करायला लावणारे होते.
* प्रियांका तुपे- ही वक्तृत्व स्पर्धा तुल्यबळ होती. वैचारिक पातळीवरील स्पर्धा असल्याने विषयही खूप वेगळे होते. त्यामुळे पूर्ण विचार करून विषयाची मांडणी करणे हे एक आव्हान होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta vaktrutva spardha in mumbai