शिक्षक दिनाचे औचित्य साधत येथील सखारामशेठ विद्यालयात ‘लोकसत्ता यशस्वी भव’ या उपक्रमाचा प्रारंभ कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार रमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.   या  योजनेअर्ंतगत या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल अशा दहावी मार्गदर्शन पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी वर्तमानपत्र हे जसे सामाजिक समस्या मांडण्याचे व्यासपीठ आहे तसेच ते शिक्षणाचे माध्यम असल्याचे सांगितले. हे सूत्र लोकसत्ताने जपले आहे, असे स्पष्ट करुन ते म्हणाले,  दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी  लोकसत्ताने हाती घेतलेल्या यशस्वी भव या योजनेअंर्तगत गणित, इंग्रजी, शास्त्र यांसारखे  अवघड विषय विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत समजून दिले जात आहेत. त्यामुळेच ही योजना अत्यंत उपयुक्त आहे. डोंबिवलीतील ग्रामीण परिसरात ४५ वर्षांपूर्वी सखारामशेठ विद्यालय सुरू करण्यात आले. गेल्या दोन वर्षांत लोकसत्ता यशस्वी भव ही योजना या विद्यालयात सुरू करण्यात आली असून त्याचा लाभ विद्यार्थ्यांना होत आहे. या योजनेचा लाभ घेतलेल्या काही विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुभव या वेळी व्यक्त केले.  या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद भारसके उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उषा सपकाळे यांनी तर आभार मोतीराम ओले यांनी केले.