शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या यशवंत स्टेडियमपासून महापालिकेला लाखो रुपयांची मिळकत होत असली, तरी खेळांच्या विकासाकरता त्यातून काही भरघोस खर्च होत नसल्यामुळे स्टेडियम बांधण्याचा मूळ उद्देशच विसरला गेला आहे.
खेळांसाठी स्टेडियम उपलब्ध व्हावे आणि सोबत महापालिकेलाही उत्पन्न मिळावे या उद्देशाने महापालिकेने यशवंत स्टेडियम बांधले. या स्टेडियममधील भाडय़ाने दिलेली दुकाने हा महापालिकेसाठी उत्पन्नाचा मोठा स्रोत झाला आहे. गेल्या दोन वर्षांत दुकानांच्या भाडय़ापोटी महापालिकेला सुमारे ५९ लाखांचे उत्पन्न झाले आहे.
 या ठिकाणची एकूण १०७ दुकाने भाडय़ाने देण्यात आली आहेत. १ एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१३ या कालावधीत या दुकानांच्या भाडय़ापोटी महापालिकेला ५८ लाख ६४ हजार ५९७ रुपये इतकी रक्कम मिळाली. एकाही दुकानाचे भाडे बुडले नाही, असे महापालिकेचे म्हणणे आहे. याशिवाय प्रत्यक्ष स्टेडियममधील मैदानाचा दोन वर्षांत २३ संस्थांनी वापर केला. त्यांच्याकडून महापालिकेला ३ लाख ९४ हजार रुपये मिळाले. अशारितीने यशवंत स्टेडियमपासून दोन वर्षांत महापालिकेला सुमारे ६२ लाख ५० हजार रुपये, म्हणजेच वार्षकि ३१ लाख रुपयांहून अधिक उत्पन्न झाले. यापैकी निम्मी रक्कमही खेळांच्या किंवा क्रीडा क्षेत्राच्या विकासाकरता वापरली गेली असती, तरी बराच फरक पडला असता. परंतु, यशवंत स्टेडियमकडे पाहता असे दिसून येत नाही.
यशवंत स्टेडियममध्ये भाडे न घेता वापरली जाणारी किती दुकाने आहेत, असा प्रश्न अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराखाली विचारला होता. त्यावर, महापालिका क्रीडा सभागृहासाठी वापरात असलेली ११ दुकाने आणि माँ भगवती मंदिर अशा १२ दुकानांकडून भाडे घेतले जात नसल्याचे उत्तर महापालिकेने दिले आहे. वरील गाळ्यांसाठी डिपॉझिट घेण्यात आलेले नाही. या काळात किती भाडेकरू सोडून गेले व किती डिपॉझिट परत करण्यात आले या प्रश्नावर, कुणीही सोडून न गेल्यामुळे डिपॉझिट परत करण्याचा प्रश्न नाही असे महापालिकेने सांगितले आहे. खेळ वगळता इतर कार्यक्रमांसाठी किती वेळा मैदान देण्यात आले आणि कशासाठी देण्यात आले, अशीही माहिती कोलारकर यांनी विचारली होती, परंतु त्याचे उत्तर महापालिकेच्या बाजार विभागाने दिलेले नाही. यशवंत स्टेडियमचे गाळे किती वेळा दुरुस्त केले, या प्रश्नाच्या उत्तरात गाळे दुरुस्तीचा बाजार विभागाशी संबंध नाही असे महापालिकेने कळवले आहे.