शहर व जिल्ह्यात वक्तृत्व, निबंध स्पर्धा, कुसुमाग्रजांना अभिवादन, चित्र प्रदर्शन अशा विविध माध्यमातून मराठी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सुभाष वाचनालय
नाशिकमधील सुभाष सार्वजनिक वाचनालयात ज्येष्ठ चित्रकार नारायण चुंबळे यांच्या उपस्थितीत मराठी दिनाचा कार्यक्रम झाला. यावेळी चुंबळे यांनी कुसुमाग्रजांच्या सहवासांत दीर्घकाळ राहण्याचे भाग्य आपणांस मिळाल्याची आठवण सांगितली. त्यांच्या कवितेतून समाजासाठी जगण्याची प्रेरणा मिळाली. कुसुमाग्रजांच्या कविता म्हणजे केवळ कवि कल्पनेचा विलास नाही तर त्यांच्या कवितेतून सार्थ जीवनाची अनुभूती मिळते, असेही त्यांनी नमूद केले. प्रास्तविक ग्रंथपाल दत्ता पगारे यांनी केले. आभार कार्यवाह मारूती तांबे यांनी मानले. समारंभास महेंद्र वाघ, वाचनालयाचे उपकार्याध्यक्ष प्रभाकर खंदारे, विश्वस्त रामदास सोनवणे आदी उपस्थित होते
नाटय़ परिषद
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या वतीने कालिदास कलामंदिरात परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. रवंींद्र कदम यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज हे मराठी साहित्यातले प्रतिभावंत लेखक, नाटककार होते. मराठी भाषा समृध्दीसाठी युवकांनी कुसुमाग्रजांच्या साहित्याचे वाचन करावे, असा सल्ला प्रा. कदम यांनी दिला. बागेश्री वाद्यवृंदातील बाल कलाकार शर्वरी पद्मनाभी हिने कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांचे वाचन केले. प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपाध्यक्ष शाम दशपुत्रे, राजेंद्र जाधव, चारूदत्त दीक्षित, मुकूंद गायधनी आदी उपस्थित होते. चंद्रशेखर कुलकर्णी यांनी आभार मानले.
मनसे करिअर विभाग
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या करिअर विभागातर्फे जिल्हा बँक परिसरात आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर आ. वसंत गिते, महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, राजेंद्र डोखळे, बाळासाहेब दुगजे, राम खैरनार आदी उपस्थित होते. प्रारंभी कुसुमाग्रजांच्या कवितांचे वाचन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या विविध कविता, साहित्य, मायमराठी विशेष, महाराष्ट्राची मराठी अस्मिता, मराठी माणसाने अनुभवलेले मराठीपण, महाराष्ट्रातील मराठी वीरांगणांचा इतिहास, गौरव मराठी भाषेचा, मराठी भाषेसमोरील आव्हाने, महाराष्ट्रातील मराठी कवी, साहित्यक, नाटय़ संस्कती, परंपराचा इतिहास, मराठी संत परंपरा व तिचे जनसामान्यांच्या जीवनातील योगदान अशा विविध विषयांचे वाचन, कथन सादर करण्यात आले. काव्य वाचनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्तविक करिअर विभागाचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले. धनंजय कर्पे यांनी आभार मानले.
पुष्पावती रूंगटा कन्या विद्यालय
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालयात मराठी दिन कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. निशा पाटील उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी मुग्धा कुलकर्णी होत्या. मान्यवरांचा परिचय कुणाल जोशी यांनी करून दिला. पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे गायन केले. प्रमुख पाहुण्यांनी मराठी विषयांचे महत्व सांगून कुसुमाग्रजांच्या विविध पैलूंचे विद्यार्थ्यांना दर्शन घडविले. संयुक्ता कुलकर्णी यांनी आभार मानले. मनिषा हलकंदर यांनी सूत्रसंचालन केले.
पंचवटी वाचनालय
पंचवटी सार्वजनिक वाचनालयात मराठी दिनानिमित्त आयोजित समारंभाच्या अध्यक्षस्थानी नथुजी देवरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचवटी प्रभाग सभापती प्रा. परशराम वाघेरे होते. वाचनालयात कुसुमाग्रजांच्या निवडक साहित्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. वाघेरे यांनी मराठी दिनाचे महत्व प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे, असे मत मांडले. युवकांनी वर्षभरात तात्यांसाहेबांच्या एकातरी पुस्तकाचे वाचन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. प्रास्ताविक हिरालाल परदेशी यांनी केले. योगिता भामरे यांनी आभार मानले.
हिरे कृषी तंत्रनिकेतन
कळवण तालुक्यातील मानूर येथे आदिवासी सेवा समिती संचलित कर्मवीर भाऊसाहेब हिरे कृषी तंत्रनिकेतनमध्ये वि. वा. शिरवाडकर उर्फ तात्यासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन जनराज्य आघाडीचे कळवण तालुका अध्यक्ष हिरामण वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून एकनाथ भालेराव उपस्थित होते. मराठी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी कथा, कवितांचे वाचन केले. सूत्रसंचालन व्ही. यु. सोनवणे यांनी केले. पी. के. बिरारी यांनी आभार मानले.