इच्छुकांना महानगरपालिकेच्या नव्या आरक्षणाची चिंता होतीच, मात्र अनेकांना अधिक धास्ती होती ती प्रभागरचनेची. राजकीय पक्ष आणि इच्छुकांच्या वर्तुळात त्याचीच आतुरतेने प्रतीक्षा होता. याबाबत गेल्या दोन महिन्यांपासून चर्चाही झडत होती. आरक्षणांच्या सोडतीबरोबरच शुक्रवारी ही उत्सुकताही संपुष्टात आली. प्रभागरचनेचे प्रारूप पाहता काहींची अडचण झाली असेल, मात्र मनपातील विद्यमान पदाधिकारी व प्रमुखांनी सुस्कारा टाकला आहे. एका अर्थाने हे सगळेच तेल लावलेले पहिलवान ठरले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या सुरुवातीच्या कार्यक्रमानुसार नव्या प्रभागरचनेचे प्रारूप येत्या दि. २७ ला जाहीर करण्यात येणार होते. आज केवळ आरक्षणाच्या सोडतीच काढण्यात येणार होत्या. मात्र नंतर त्यात बदल करून सोडतीबरोबर आजच हे प्रारूप नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले. मनपाच्या प्रवेशद्वारावरच पूर्ण शहराचा म्हणजेच ३४ प्रभागांचा नकाशा फलकावर प्रसिद्ध करण्यात आला होता. शिवाय आतील बाजूला सर्व प्रभांगाचे स्वतंत्र नकाशे व त्यात समाविष्ट परिसराची माहिती खुली करण्यात आली होती. हे सर्व प्रारूप येत्या दि. २७ ला प्रसिध्द करण्यात येणार असून दि. ३ सप्टेंबपर्यंत त्यावर हरकती दाखल करता येतील.
प्रभागरचनेतील ठळक बाबी     

  •  महापौर शीला शिंदे (शिवसेना) व उपमहापौर गीतांजली काळे (भाजप) या दोन प्रमुख पदाधिका-यांचा प्रभाग एक झाला. शिवाय, आरक्षणे दोघांच्या सोयीचीच आहेत. त्यांच्या प्रभाग क्रमांक २७ मधील अ जागेवर ओबीसी महिला आणि ब जागा सर्वसाधारण वर्गासाठी आहे. यातील उपमहापौर काळे गेल्या वेळी ओबीसी महिला जागेवरच निवडून आल्या होत्या, त्या पुन्हा यातील अ जागेवर निवडणूक लढवू शकतील. प्रभागातील ब जागा सर्वसाधारण वर्गासाठी असल्याने महापौर शिंदे यांनाही पुन्हा रिंगणात उतरण्यात अडचण नाही.
  •  मनपाच्या स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे (भाजप) यांना प्रभाग रचना व आरक्षणही सोयीस्कर ठरले आहे. त्यांचा प्रभाग क्रमांक ७ झाला आहे. यातील दोन्ही जागा सर्वसाधारण गटाच्या असून त्यातील अ जागेवर सर्वसाधारण महिलेचे आरक्षण आहे. दुसरी जागा (ब) खुल्या वर्गासाठीच आहे. गेल्या वेळी ते ओबीसी जागेवर निवडून आले होते.   
  •  माजी महापौर तथा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संग्राम जगताप हेही नशीबवान ठरले आहेत. त्यांचा प्रभाव असलेला सारसनगर परिसर प्रभाग २९ मध्ये समावला असून बहुतांशी भाग अबाधित राहिला आहे. शिवाय आरक्षणेही सोयीचीच आहेत. या प्रभागातील दोन्ही जागा सर्वसाधारण वर्गासाठी खुल्या असून त्यातील अ जागेवर सर्वसाधारण महिलेचे आरक्षण आहे.
  •  मनपा सभागृहातील विरोधी पक्षनेते विनीत पाऊलबुध्दे (राष्ट्रवादी) यांच्या प्रभाग २ मधील दोन्ही जागांवर आरक्षणे पडली आहेत. अ जागेवर ओबीसी आणि ब जागेवर सर्वसाधारण महिलेचे आरक्षण झाले आहे. इंदिरा काँग्रेसचे प्रमुख नगरसेवक निखिल वारे यांचही बराचसा भाग याच प्रभागात आला आहे. पाऊलबुद्धे यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र असल्याने त्यांची फारशी अडचण होणार नाही.
  •  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनपातील गटनेते गणेश भासले यांचा प्रभाग तर सुरक्षित राहिलाच. शिवाय आरक्षणांमुळे ते अधिकच सुखावले आहेत. त्यांचा एकहाती प्रभाव असलेल्या प्रभाग ३० मधील दोन्ही जागा सर्वसाधारण गटात आल्या असून त्यातील अ जागेवर सर्वसाधारण महिला आणि ब जागा सर्वसाधारण आहे, त्यामुळेच भोसले दाम्पत्यच निवडणूक रिंगणात उतरण्याची आत्तापासूनच सुरू झाली.

 प्रशासनाचे कौतुक
नव्या प्रभागरचनेबाबत शहरात गेल्या काही दिवसांपासून विविध चर्चा सुरू होत्या. मात्र कोणताही विरोधाभास न होता ही प्रक्रिया पार पडली, याचे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींनी विशेष कौतुक केले. मनपाचे आयुक्त विजय कुलकर्णी यांच्या मागर्शनाखाली नगररचनाकार विश्वनाथ दहे यांनी ही प्रक्रिया पार पाडली. अत्यंत पारदर्शकतेने आणि कमालीची गुप्तता पाळून आम्ही ही प्रक्रिया पार पाडू शकलो याचा आनंद आहे असे कुलकर्णी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.