उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या प्रेमीयुगुलाने सोमवारी मागचा-पुढचा विचार न करता दुचाकीसायकलवरून सकाळी थेट वाशी खाडी पूल गाठले. मुलीच्या घरातील मंडळी दोघांच्या लग्नाला तयार होत नसल्याने जिवाचा अंत करण्याच्या इराद्याने या दोघांनी वाशी खाडी पुलाचा पर्याय शोधून काढला होता. सकाळी ११ वाजता या दोघांनी वाशी खाडी पुलाच्या मधोमध गाडी उभी करून दोघांनी एकाच वेळी पाण्यात उडी मारली. मुंबईवरून येणाऱ्या एका दुसऱ्या दुचाकीस्वाराने ही घटना वाशी खाडी पुलावरील वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक युनूस शेख यांना कळविली. शेख यांनी तात्काळ केलेल्या उपाययोजनामुळे या दोन तरुणांचे प्राण वाचले, पण आत्महत्येचा प्रयत्न केल्याने मात्र त्यांना वाशी पोलीस ठाणे गाठावे लागले.
 उल्हासनगर येथे राहणारे सुरेश आणि प्रियंका (दोन्ही नावे बदललेली आहेत) यांचे गेली चार वर्षे प्रेमप्रकरण सुरू आहे. मुलीच्या नातेवाईकांना हा विवाह मान्य नाही. त्यामुळे या दोघांनी घरातील वडीलधाऱ्यांची मिनतवाऱ्या काढण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण मुलीचे आईवडील ऐकत नसल्याचे बघून या दोघांनी आपल्या घरापासून दूर जाऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सकाळी मोटारसायकलवरून हे दोघे वाशी खाडी पुलावर आले. भरतीची वेळ असल्याने समुद्राच्या पाण्याला उधाण होते. दोघांनी शेवटची घट्ट मिठी मारली आणि स्वत:ला पाण्यात झोकून दिले. त्याच वेळी मुंबईकडून वाशीकडे दुचाकीसायकलने येणाऱ्या रवींद्र बोबडे या तरुणाने वाशी खाडी पुलावरील पोलीस निरीक्षक युनूस शेख यांना ही घटना सांगितली. बेलापूर येथील वरिष्ठांच्या बैठकीला जाण्यासाठी तयारी करणाऱ्या शेख यांनी एका क्षणाचा विचार न करता खाडी पुलावर धाव घेतली. तोपर्यंत वाशी अग्निशमन दलाच्या जवानांनाही त्यांनी कळविले. शेख खाडी पुलाच्या मध्यभागी आले असता ते प्रेमीयुगुल गटांगळ्या खात असताना दिसून आले. त्या प्रेमीयुगुलाच्या नशिबाने इंदिरानगरच्या बाजूकडून विनोद गौड याची छोटी नाव येत होती. शेख यांनी बेंबीच्या देठापासून ओरडून त्या नावाडय़ाला थांबविण्याचा प्रयत्न केला. आवाजाच्या गोंधळामुळे तो आवाज त्या नावाडय़ापर्यंत जात नव्हता. अनेक आवाज दिल्यानंतर त्या नावाडय़ाने पुलाच्या वरच्या बाजूस बघितले. त्याच वेळी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाणारे ते प्रेमीयुगुल त्या नावाडय़ालादेखील दिसले आणि वरचा साहेब का हाक मारतोय हे लक्षात आले. त्या नावाडय़ानेही मोठय़ा प्रयत्नाने प्रथम सुरेशला वाचविले. त्यानंतर त्या दोघांनी प्रियंकाला वाचविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. त्यामुळे प्रियंका वाचली. त्यानंतर हळूहळू नाव किनाऱ्यावर आणण्यात आली. मुलीच्या पोटात बरेच पाणी गेले असल्याने ती बेशुद्ध झाली होती. त्यामुळे शेख यांनी तिला प्रथम रुग्णालयात हलविले. प्राथमिक उपचारानंतर प्रियंका शुद्धीवर आली. थोडय़ा वेळाने त्या दोघांची विचारपूस करून शेख यांनी त्यांना आत्महत्येचा प्रयत्न केल्याने वाशी पोलीस ठाण्याच्या हवाली केले. पोलिसांच्या हवाली करतानाही त्यांच्या नजरा शेख यांचे आभार मानत होत्या. या दोघांनी आज एक दुजे के लिए चित्रपटातील दृश्य प्रत्यक्षात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता, पण त्या दोघांचा काळ न आल्याने ते सहीसलामत वाचले.