प्रेमीजनांची कॉलेज रोड ऐवजी शहरालगतच्या परिसरास पसंती

महाविद्यालयाबाहेर पोलिसांचा गराडा आणि महाविद्यालय व्यवस्थापनाकडून टाकली जाणारी बंधने याचा विचार करत तरुणाईने शुक्रवारी जागतिक प्रेम दिवस मॉल्स, मल्टिप्लेक्स, हॉटेल्स व शहरालगतचे गंगापूर धरण, सोमेश्वर, टेम्पल हिल यासारख्या ठिकाणी उत्साहात साजरा केला.

महाविद्यालयाबाहेर पोलिसांचा गराडा आणि महाविद्यालय व्यवस्थापनाकडून टाकली जाणारी बंधने याचा विचार करत तरुणाईने शुक्रवारी जागतिक प्रेम दिवस मॉल्स, मल्टिप्लेक्स, हॉटेल्स व शहरालगतचे गंगापूर धरण, सोमेश्वर, टेम्पल हिल यासारख्या ठिकाणी उत्साहात साजरा केला. कॉलेज रोडवर ‘धूम स्टाईल’ने रपेट मारणाऱ्यांच्या संख्येत लक्षणिय वाढ झाली असली तरी वाहतूक पोलिसांनी मात्र महिला व इतर वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात धन्यता मानली. बहुतांश महाविद्यालयात विद्यार्थ्यांची तुरळक उपस्थिती असल्याने नेहमीसारखे तासही झाले नाहीत.
काही वर्षांपासून राजकीय वादात सापडलेला हा दिवस आता पोलिसी खाक्याचा सामना करत साजरा करावा लागत असल्याची तरूणाईची भावना आहे. टारगटांकडून उच्छाद घातला जाऊ नये, महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या छेडखानीचे प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा ही दक्षता घेत असते. परंतु, ज्या तरूणाईला हा दिवस मनापासून साजरा करण्याची ईच्छा आहे, त्यांनाही पोलिसांचा ससेमिरा चुकविताना नाकीनऊ येते. शुक्रवारी महाविद्यालयात असणारी तुरळक उपस्थिती हे त्याचे निदर्शक. बहुतांश तरूण-तरुणींच्या गटाने हा दिवस महाविद्यालयाऐवजी इतरत्र साजरा करण्यावर भर दिला. घरातून महाविद्यालयाच्या नावाने ते बाहेर पडले. परंतु कोणी मॉल्समध्ये तर कोणी सोमेश्वरकडे प्रियजनांबरोबर मार्गक्रमण करताना दिसत होते. काहींनी मल्टिप्लेक्समध्ये चित्रपटाचा आस्वाद घेतला तर कोणी आईस्क्रिम पार्लरमध्ये ठिय्या मारला. आपल्या जोडीदाराला खुश करण्यासाठी अनेकांनी भेटवस्तुंच्या दुकानात गर्दी केली होती. कॉलेजरोडवर गुलाब पुष्प घेण्याकरिता धडपड सुरू होती. शहरालगतचे टेंम्पल हिल, आसाराम बापू आश्रमापलीकडील गोदावरी नदीकाठ, सोमेश्वर, गंगापूर धबधबा व धरणाचा परिसर असे अनेक परिसर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुलले होते.
या दिवशी कॉलेज रोडचा नूर एकदम पालटलेला असतो. त्यामुळे सकाळपासून महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त लागला होता. वाहतूक पोलीसही वाहनधारकांवर नजर ठेवून होते. यामुळे टारगटांचा बंदोबस्त झाला असला तरी हा दिवस उत्साहाने साजरा करू इच्छिणाऱ्यांचा हिरमोड झाला. रस्त्यावर धूम स्टाईलने मोटारसायकल दामटणाऱ्यांचा गोंधळ सुरू होता. काही युवक वाहनधारकांच्या हाती लागले. पण काहीनी त्यांना चकमा दिला. वाहनधारकांवर कारवाईचे लक्ष्य गाठावयाचे असल्याने पोलिसांनी मग या रस्त्यावरून मार्गस्थ होईल, त्या सर्वाची तपासणी मोहीम हाती घेतली. त्याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना घरी घेऊन निघालेल्या काही पालकांनाही सहन करावा लागला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Lovers fevers city area instead college road for valentine day

ताज्या बातम्या