विदर्भातील साखर कारखान्यांमध्ये नीचांकी गाळप

सुमारे पाच वर्षांपूर्वी १८ लाख मेट्रिक टनापर्यंत ऊस गाळप करणाऱ्या विदर्भातील साखर कारखान्यांचे गाळप आता ६ लाख मेट्रिक टनापर्यंत खाली आले असून गाळप हंगाम संपण्याच्या बेतात असताना विदर्भात सध्या सुरू असलेल्या सहा साखर कारखान्यांमधून केवळ ६.४२ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. राज्याच्या एकूण उत्पादनापैकी हा वाटा फक्त १.२ टक्के आहे.

पाच वर्षांत साखर उत्पादनात निम्मी घट
सुमारे पाच वर्षांपूर्वी १८ लाख मेट्रिक टनापर्यंत ऊस गाळप करणाऱ्या विदर्भातील साखर कारखान्यांचे गाळप आता ६ लाख मेट्रिक टनापर्यंत खाली आले असून गाळप हंगाम संपण्याच्या बेतात असताना विदर्भात सध्या सुरू असलेल्या सहा साखर कारखान्यांमधून केवळ ६.४२ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. राज्याच्या एकूण उत्पादनापैकी हा वाटा फक्त १.२ टक्के आहे.
साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार सध्या विदर्भात सहा खाजगी आणि एक सहकारी, अशा ७ कारखान्यांमध्ये ऊसाचे गाळप सुरू आहे. आतापर्यंत ६.८८ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले आहे आणि ६.४२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखरेचा उतारा देखील राज्यात सर्वात कमी म्हणजे ९.४२ टक्के आहे. याबाबतीत मात्र विदर्भाने आपले सातत्य कायम ठेवले आहे. विदर्भातील सहकारी साखर कारखानदारी गेल्या दशकभरात पूर्णपणे संपुष्टात आली असून विदर्भात १९ सहकारी साखर कारखाने होते. गैरव्यवस्थापनामुळे त्यापैकी ११ कारखान्यांना टाळे लागले आणि त्यांचा लिलाव करण्याची पाळी सरकारवर आली. आता विदर्भात केवळ तीनच सहकारी साखर कारखाने शिल्लक आहेत आणि यंदाच्या गळीत हंगामात केवळ एकाच कारखान्यात गाळप सुरू होऊ शकले. यापेक्षा उलट खाजगी कारखान्यांनी मात्र चांगली कामगिरी केली आहे. विदर्भात सध्या सहा खाजगी कारखाने सुरू आहेत. त्यांच्यामुळेच विदर्भ साखर कारखानदारीच्या नकाशावर अजूनपर्यंत टिकून आहे.
अमरावती विभागात १ सहकारी आणि २ खाजगी, अशा ३ साखर कारखान्यांमधून ६ फेब्रुवारीअखेर २.७६ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले असून  २.७२ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. उतारा केवळ ९.८६ टक्के आहे. नागपूर विभागात ४ खाजगी कारखान्यांमधून ४.४२ लाख मे.टन ऊसाचे गाळप आणि ३.७० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. उतारा ८.९८ टक्के आहे. राज्यात सर्वात कमी उतारा नागपूर विभागाचा आहे. सर्वाधिक १२.०३ टक्के उतारा कोल्हापूर विभागात आहे.
गेल्या पाच वर्षांतला विदर्भातील साखर कारखानदारीच्या कामगिरीचा आलेख चिंताजनक आहे. २००६-०७ च्या गाळप हंगामात विदर्भात आठ साखर कारखान्यांनी १३.९९ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले होते आणि १४.८५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. उतारा देखील १०.२० टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. २००७-०८ मध्ये १० कारखान्यांनी १८.४२ लाख मे.टनापर्यंत गाळप आणि १९.६९ लाख क्विंटल साखर उत्पादनापर्यंत विदर्भातील कारखान्यांनी झेप घेतली होती. त्या वर्षी उतारा देखील १०.५० टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. २००८-०९ मध्ये मात्र आठ कारखान्यांमध्ये नीचांकी २.४२ लाख मे.टन गाळप आणि २.९२ लाख क्विंटल साखर तयार झाली. २००९-१० मध्ये तर केवळ चार कारखान्यांजवळ गाळप क्षमता शिल्लक होती. या कारखान्यांनी २.५८ लाख मे.टन गाळप आणि २.६१ लाख क्विंटल साखर तयार झाली. खाजगी कारखान्यांनी गेल्या दोन-तीन वर्षांत गाळप क्षमता वाढवली असली, तरी सहकारी साखर कारखानदारीत मात्र अखेरच्या घटका मोजत असल्याचे चित्र दिसून आले आहे. गेल्या हंगामात विदर्भातील चार खाजगी साखर कारखान्यांसह सहा कारखान्यांनी ८.७२ लाख मे.टनाचे गाळप आणि ८.७७ लाख क्विंटलपर्यंत साखरेचे उत्पादन मिळवले. यंदा हा आकडा गाठता येईल का, हे प्रश्नचिन्ह आहेच.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Low production in vidharbha suger factory