ज्येष्ठ अभिनेते मदन गडकरी आणि ज्येष्ठ अभिनेत्री लीला मेहता यांची अ. भा. मराठी नाटय़ परिषदेच्या जीवनगौरव पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. तर महाराष्ट्र शासन पुरस्कृत राम गणेश गडकरी पुरस्कारासाठी नाटककार अभिराम भडकमकर, बालगंधर्व पुरस्काराकरता निर्मला गोगटे, चिंतामणराव कोल्हटकर पुरस्कारासाठी चंदू डेगवेकर आणि केशवराव भोसले पुरस्कारासाठी निर्माते अनंत पणशीकर व प्रल्हाद जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
शुक्रवार, १४ जून रोजी नाटककार गो. ब. देवल स्मृतिदिनी सायं. ६ वा. माटुंग्याच्या यशवंत नाटय़मंदिरात होणाऱ्या वार्षिक सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. रंगभूमीच्या सर्वागीण विकासासाठी कार्य केल्याबद्दल ‘आविष्कार’ संस्थेचे अरुण काकडे यांचा, तसेच संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ दिग्दर्शक प्रा. वामन केंद्रे यांचा आणि दहा हजार नाटय़प्रयोगांचा विक्रमी टप्पा पार केल्याबद्दल अभिनेते प्रशांत दामले यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
याखेरीज बापू लिमये, मंगेश तेंडुलकर, गिरीश जोशी, संतोष पवार, तेजस्विनी पंडित, उमेश कामत, भालचंद्र कदम, नंदू माधव, राजकुमार तांगडे, चंद्रकांत येडुरकर, दिलीप खन्ना, कमल ढसाळ, धनंजय वाखारे आदींनाही विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
यंदाच्या पुरस्कार सोहळ्याचे वैशिष्टय़ म्हणजे यावेळी प्रथमच झाडीपट्टीपासून बेळगावसहित संपूर्ण महाराष्ट्रातील नाटय़ परिषदेच्या सर्व शाखांतील रंगकर्मी आपले कलाविष्कार त्यात सादर करणार आहेत. हे कार्यक्रम सकाळी १० ते सायं. ६ वा.पर्यंत आणि पारितोषिक वितरणानंतर रात्री ९ वा.नंतर सादर होतील.