गोदावरी खोऱ्यात दोन वर्षांपासून पाणीवाटपावरून सरकार दरबारी आणि जल नियामक प्राधिकरणाकडे अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. या विषयावर प्रसिध्द जलतज्ज्ञ माधव चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली फेब्रुवारीत चर्चासत्र आयोजित करण्यात आल्याची माहिती येथील भारतीय जल संस्कृती मंडळ शाखेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर आणि चर्चासत्राचे समन्वयक जयप्रकाश संचेती यांनी दिली.
चर्चासत्रात उध्र्व गोदावरी खोऱ्यातील पाण्याची उपलब्धता, औपचारिक मान्यता नसलेला पाणी वापर, प्राधिकरण व इतर कायद्यातील उणिवा, उपलब्ध पाण्याच्या वाटपाचे नियोजन आदी विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. गोदावरी खोऱ्यात पाणी वाटपावरून वाद सुरू आहे. ज्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असते. धरणांमध्ये पुरेसा जलसाठा नसतो. त्या वर्षी पाणी वाटपाची ही समस्या अधिक गंभीर होत जाते. या समस्येचा लाभ आपणांस कसा होईल हे त्या त्या भागातील राजकारण्यांकडून पाहिले जाते. त्यामुळे या समस्येने अनेकवेळा आंदोलनाचे स्वरूप घेतले आहे. सरकार, न्यायालय आणि जल नियामक प्राधिकरण यांच्याकडे यासंदर्भात अनेकांनी दाद मागितली आहे. यापैकी कोणीही कोणताही निर्णय दिला तरी त्यामुळे सर्वाचे समाधान होईलच, अशी परिस्थिती नाही. परस्पर सामंजस्य हा यावर एकमेव उपाय आहे. सिंधू, गंगा या आंतरराष्ट्रीय नद्या तसेच यमुना, कृष्णा, गोदावरी, महानदी या खोऱ्यांमधील पाणी प्रश्नही याआधी सामंजस्याने सोडविण्यात आले आहेत. भंडारदरा धरणातील तालुकावार पाणी वाटपाची समस्याही परस्पर सामंजस्याने सोडविण्यात आली आहे. त्यावर कोणतीही तक्रार नाही. त्यामुळे अशाच प्रकारच्या सामंजस्याची गरज उध्र्व गोदावरी खोऱ्यातील पाणी वाटपासंदर्भात अपेक्षित आहे. त्यामुळेच स्नेहालय आणि सिंचन सहयोग अहमदनगर, नाशिक व औरंगाबाद यांच्यातर्फे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली चर्चासत्र होणार आहे.
या चर्चासत्रासाठी तिन्ही जिल्ह्य़ातून उध्र्व गोदावरी खोऱ्यातील पाणी उपलब्धता, औपचारिक मान्यता नसलेला पाणी वापर, अस्तित्वातील पाणी वापर व्यवस्था जल नितीशी किती सुसंगत आहे, प्राधिकरण व इतर कायद्यातील उणिवा, समतोल विकासाची तत्वे खोऱ्यात कशी वापरता येतील, सध्या उपलब्धता असलेले पाणी वाटप कसे असावे, कोकणातील पाणी उध्र्व गोदावरीत आणणे कितपत शक्य आहे, या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. या विषयावर अभियंते, जलतज्ज्ञ, समाजसेवी संस्था, लाभधारक, उद्योजक, विधीज्ञ, राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी तसेच ज्यांना पाणी विषयात रस आहे त्यांनी त्यांचे विचार पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १५ जानेवारीपूर्वी किशोर कुलकर्णी, अधीक्षक अभियंता तथा प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सिंचन भवन, औरंगाबाद रोड, अहमदनगर यांच्याकडे लेखी स्वरुपात आपले मत पाठवावे. सर्व विचाराची पुस्तिका तयार करण्यात येणार असल्याची माहिती चर्चासत्राचे समन्वयक संचेती, शिवाजी राजळे यांनी दिली आहे. चर्चासत्रात ज्या मुद्यावर एकमत होईल त्याची शिफारस शासनाकडे केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी शिवाजी राजळे ९८२२०२९३५१, प्रा. बी. एन. शिदे ९८२२४५१६०१, डॉ. सुधा कांकरिया ९८५०८६५०७८ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jan 2015 रोजी प्रकाशित
गोदावरी पाणीवाटपावर आता विचारमंथन
गोदावरी खोऱ्यात दोन वर्षांपासून पाणीवाटपावरून सरकार दरबारी आणि जल नियामक प्राधिकरणाकडे अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत.
First published on: 07-01-2015 at 07:38 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhavrao chitale will guide for water distribution of godavari river