धनगर समाजाचा आदिवासींच्या आरक्षणात समावेश करण्यास आदिवासी समाजाचा तीव्र विरोध असून आदिवासींच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार उदासीनता दर्शविणार असेल तर मुंबई शहराचा पाणीपुरवठा धरणातून बंद करण्यात येईल, असा इशारा माजी मंत्री मधुकर पिचड यांनी दिला. येथील अखिल भारतीय विकास परिषदेच्या वतीने महाकवी कालिदास कला मंदिरात शुक्रवारी आदिवासी समाजाचा प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. आदिवासी वास्तव्यास असणारे भाग स्वतंत्र राज्य म्हणून जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
कार्यक्रमास पश्चिम बंगालचे बिरसाजी तिरके, संघटनेच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा डॉ. उर्मी माकरे आदी उपस्थित होते. यावेळी पिचड म्हणाले, आदिवासी समाज आपल्या विविध प्रश्नांबद्दल गेल्या कित्येक वर्षांपासून संघर्ष करत आहे. त्यांच्या सहनशीलतेला काही सीमा असून आदिवासी वाघ आहे. त्याला मागून काही मिळत नसले तर तो लढण्यास तयार आहे. गेल्या काही वर्षांपासून धनगर समाजाचा आदिवासीसाठी असणाऱ्या आरक्षणात समावेश करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यास आदिवासी समाजाचा तीव्र विरोध असून आदिवासी बांधव आपल्या पद्धतीने प्रतिकार करतील. पेसा कायदा- जन, जमीन, जंगल प्रश्न लवकरात लवकर सुटले नाही तर संपूर्ण राज्यात आंदोलन छेडले जाईल असा इशारा पिचड यांनी दिला. आगामी नागपूर अधिवेशनात आदिवासी ज्या ठिकाणी आहेत, तो भाग स्वतंत्र राज्य करा तसेच त्याला स्वायत्तता द्यावी याकडे लक्ष वेधले जाणार आहे. उपरोक्त ठिकाणी आम्ही आमचे राज्य स्वत चालवू असेही पिचड यांनी सांगितले.
मेळाव्यात बोगस आदिवासींचा अनुसूचित जमातीत समावेश न करणे, पेसा कायदा, आदिवासी सांस्कृतिक जोपासण्यासाठी उपाययोजना, अनुसूचित जाती-जमाती अत्यार प्रतिबंधक कायदाविषयक मार्गदर्शन, जल जंगल जमिनीचे संवर्धन व आदिवासींचे अधिकाराबाबत मार्गदर्शन, केंद्र व राज्य शासनाच्या वतीने आदिवासींकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहितीसह अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, मेळाव्यास सुरुवात होण्याआधी सकाळी आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या तसेच सांस्कृतिक कलांच्या जोपासनेसाठी आ. वैभव पिचड यांच्या हस्ते आदिवासी विकास भवन येथून संवर्धन फेरी काढण्यात आली. त्यात विविध पथकांनी आदिवासी नृत्य सादर केले. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी लेझीमचे कौशल्य सादर करत सर्वाचे लक्ष वेधून घेतले. मेळाव्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.