महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या औरंगाबाद विभागातील नाटय़ स्पध्रेत अतिउच्च दाब बांधकाम मंडळाने सादर केलेल्या ‘वेडा वृंदावन’ या तीन अंकी नाटकातील मुख्य भूमिका साकारणारे वीज कंपनीचे कर्मचारी शशिकांत इंगळे यांना उत्कृष्ट अभिनयाबद्दल परिमंडळाचे मुख्य अभियंता रोहिदास म्हस्के यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
ही नाटय़ स्पर्धा औरंगाबादच्या संत एकनाथ रंगमंदिरात आयोजित केली होती. या स्पर्धेत औरंगाबाद, लातूर व परळी मंडळाची एकूण पाच नाटके सादर झाली. यात  औरंगाबाद अति उच्च दाब बांधकाम विभागाने सादर केलेल्या ‘वेडा वृंदावन’ या तीन अंकी नाटकातील वृंदावनाची मुख्य भूमिका सादर करणारे वीज पारेषण कंपनीचे कर्मचारी शशिकांत इंगळे यांना उत्कृष्ट अभिनय केल्याबद्दल  सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला पारेषण कंपनीचे अधीक्षक अभियंता लव्हाळे, वाघमारे, मानव संसाधन विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक नितीन कांबळे,
कार्यकारी अभियंता वाघ, सुप्रसिद्ध रंगकर्मी दातार यांच्यासह अधिकारी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
वेडा वृंदावन नाटकाला एकूण चार बक्षीसे मिळाली असून शशिकांत इंगळे यांच्यासह उत्कृष्ट बालकलावंताचे बक्षीस पंकज अहिरे यांना मिळाले, तर रंगभूषा व वेशभूषेचेही बक्षीस याच नाटकाला प्राप्त झाले आहे. शशिकांत इंगळे यांनी आपल्या यशाचे श्रेय सुप्रसिद्ध नाटय़कलावंत व दिग्दर्शक नारनवले, नाटकाच्या व्यवस्थापिका व उपकार्यकारी अभियंता रेखा अहिरे पाटील, कार्यकारी अभियंता वाघ, कार्यकारी अभियंता बनसोडे, सहाय्यक अभियंता रवींद्र धनवे यांच्यासह सहकारी कलावंत व आझाद हिंद संघटना, तसेच माऊली प्रतिष्ठानला दिले आहे.