मतदारराजाची आज परीक्षा

जिल्हय़ातील १५ विधानसभा मतदारसंघांत बुधवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत मतदान होणार असून तब्बल ४० लाख ९९ हजार १२८ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

जिल्हय़ातील १५ विधानसभा मतदारसंघांत बुधवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत मतदान होणार असून तब्बल ४० लाख ९९ हजार १२८ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे, यासाठी सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदानाच्या नेहमीच्या वेळेत दोन तासांनी वाढ झाली असून लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदाही मतदानाची विक्रमी टक्केवारी नोंदविली जाते काय, याकडे सर्वाचे लक्ष आहे.
जिल्हय़ातील १५ विधानसभा मतदारसंघासाठी ४,२०८ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. मतदान प्रक्रियेसाठी राखीव धरून तब्बल २६ हजार ३१३ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मंगळवारी संबंधितांना मतदानासाठी लागणारे साहित्य सोपवून आपापल्या केंद्राकडे रवाना करण्यात आले. त्यांच्यासमवेत प्रत्येक केंद्रावर बंदोबस्तासाठी तैनात राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. विविध निकषांच्या आधारे पोलीस यंत्रणेने येवला, चांदोरी अतिसंवेदनशील तर सुरगाणा तालुक्यातील काही भागातील केंद्र संवेदनशील म्हणून निश्चित केले आहेत. जिल्हय़ातील १५ मतदारसंघात ११४ सूक्ष्म निरीक्षकांच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. तसेच संवेदनशील मतदान केंद्रावर नियमित पोलीस बंदोबस्तासह राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडय़ांचा अतिरिक्त बंदोबस्त राहील. नाशिक मध्य, नाशिक पश्चिम आणि नाशिक पूर्व या शहरातील तीन मतदारसंघात प्रथमच ‘व्हीव्ही पॅट’ यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे.
आपण केलेले मतदान यंत्रात योग्य पद्धतीने नोंदविले गेले की नाही याची माहिती मतदारांना मतदान केल्या क्षणी समजणार आहे. आपण कोणत्या उमेदवारास मतदान केले हे दिसण्याची व्यवस्था या यंत्राद्वारे प्रत्यक्षात आली आहे. चुकीच्या पद्धतीने नोंद होत असल्याचे आढळून आल्यास मतदान यंत्र बदलले जाईल. पण दोन ते तीन तास विलंबाने निदर्शनास आल्यास आधीचे मतदान बाद ठरविले जाईल, असे जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी सांगितले.
या यंत्रामुळे मतदान भलत्याच उमेदवाराला गेले या नेहमी घेतल्या जाणाऱ्या आक्षेपास चाप बसणार आहे.
मतदान प्रक्रियेसाठी ४२१० ‘बॅलेट युनिट’ व तितक्याच संख्येने ‘कंट्रोल युनिट’चा वापर केला जाणार आहे. एखाद्या मतदान यंत्रात अचानक काही तांत्रिक दोष उद्भवल्यास अतिरिक्त यंत्रांची तजवीजही करण्यात आली आहे. देवळाली वगळता उर्वरित मतदारसंघांतील केंद्रात एक मतदान यंत्र लागणार आहे. देवळालीमध्ये मात्र दुप्पट मतदान यंत्रे लागणार आहेत. कारण, या मतदारसंघात उमेदवारांची संख्या १८ असून एका यंत्रात केवळ १५ उमेदवारांची नावे समाविष्ट होऊ शकतात. मतदारांना यापैकी कोणीच नाही अर्थात ‘नोटा’ हा पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. १५ मतदारसंघांत ३७८ सेक्टर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ४६३१ मतदान केंद्राध्यक्ष, १३८९३ मतदान अधिकारी, ४६३१ शिपाई असा कर्मचाऱ्यांचा फौजफाटा कार्यरत राहणार आहे. मतदार चिठ्ठीसाठी विशेष अभियान राबविण्यात आले होते. परंतु, या चिठ्ठी ज्या मतदारांपर्यंत पोहोचल्या नाहीत, त्यांना आपल्या घराजवळील मतदान केंद्रांवर त्या देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत चिठ्ठी वितरणाचे काम करणाऱ्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे हाल झाले होते. यंदा तशी स्थिती ओढवू नये म्हणून मतदान केंद्राबाहेर त्यांच्यासाठी खास व्यवस्था करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली होती.
मतदानासाठी छायाचित्र मतदार ओळखपत्राबरोबर पारपत्र, वाहनचालक परवाना, केंद्र व राज्य शासन, सार्वजनिक कारखान्यांची छायाचित्रे, ओळखपत्रे, पॅनकार्ड, बँकेचे छायाचित्र असलेले पुस्तक, मनरेगा स्मार्टकार्ड, श्रम मंत्रालयाने दिलेले स्मार्ट कार्ड, निवडणूक यंत्रणेने जारी केलेली मतदार चिठ्ठी सादर करता येईल. मतदार यादीत नाव स्थलांतरित अथवा वगळले गेल्याचा शेरा असेल तर मतदाराने आपण तिथे वास्तव्यास असल्याचे पुरावे सादर केल्यास संबंधिताला मतदान करता येईल असे पाटील यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक यंत्रणेने वेगवेगळ्या पातळीवर जनजागृती केली. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांनी उत्स्फूर्त व निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मतदारांसाठी मदतवाहिनी
मतदार यादीतील नाव आणि मतदान केंद्र यांची माहिती घेण्यासाठी १८००२३३२०१५ या मोफत मदत वाहिनीवर संपर्क साधता येईल. आपले नांव यादीत आहे की नाही, मतदान केंद्र कोणते या स्वरूपाची माहिती मदत वाहिनीवरून दिली जाणार आहे. मतदार यादीतील नांव शोधण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची १८००२२१९५० ही अतिरिक्त मदतवाहिनी आहे. तसेच लघुसंदेशाद्वारे माहिती प्राप्त करून घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी मतदारांना एढकउकऊ स्पेस आपला ओळख क्रमांक मतदार आयडी क्रमांक टाकून ९८६९८८९९६६ या क्रमांकावर पाठविल्यास लघुसंदेशाद्वारे मतदार यादीतील भाग क्रमांक, मतदान केंद्र यांची माहिती दिली जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही मतदार यादीतील आपले नाव शोधण्याची व्यवस्था आहे.

कडेकोट बंदोबस्त
बुधवारी होणारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी शहर व ग्रामीण पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. त्यात ग्रामीण पोलिांकडून ३० अधिकारी, ८५० कर्मचारी, १२५० गृहरक्षक दलाचे जवान, तीन राज्य राखीव तर सात केंद्रीय राखीव दलाच्या तुकडय़ा तैनात राहणार आहेत. शहर पोलिसांकडून ३० हून अधिक अधिकारी, १३५५ कर्मचारी, चार केंद्रीय राखीव दलाच्या तर एक राज्य राखीव दलाच्या तुकडय़ा तैनात राहणार आहेत. ४६ पेट्रोलिंग झोन राहणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Maharashtra assembly election voting day in nashik

ताज्या बातम्या