लहानांप्रमाणे मोठय़ांनाही खेळावे वाटेल असे आणि बालवाडीच्या मुलांसाठी मांडण्यात आलेल्या खेळातून मोठय़ांनाही एखादी गंमत कळून जाईल असे खेळ, सोप्या पद्धतीने मांडलेला गणितासारखा विषय, यासारख्या अनेक गोष्टींची मजा महाराष्ट्र बालशिक्षण परिषद, ग्राममंगल आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘रचनावादी शिक्षण पद्धती’ या विषयावरील प्रदर्शनामध्ये घेता येणार आहे.
महाराष्ट्र बालशिक्षण परिषद, ग्राममंगल आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) यांच्यावतीने महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या १९व्या राज्यव्यापी अधिवेशनाचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. या वेळी अहमदाबाद येथील कोलोरेक्स टीचर्स युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. अ. गो. भाळवणकर, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले, बालशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अ. वि. जोशी, गोवा राज्याचे शिक्षण सहसंचालक कालिदास मराठे, डॉ. रमेश पानसे, जयवंती दैवळलकर, अदिती नातू उपस्थित होते. या परिषदेच्या निमित्ताने ‘रचनावादी शिक्षण पद्धती’ या विषयावरील प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या उद्घाटन समारंभामध्ये डॉ. भाळवणकर म्हणाले, ‘‘सध्याची शिक्षणपद्धती ही एककेंद्री विचारसरणीची बनली असल्यामुळे विद्यार्थिकेंद्री शिक्षण पद्धतीकडे दुर्लक्ष होत आहे. शालेय स्तरावर वर्षभरात किमान १८० दिवसही अध्यापन चालत नाही. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षित, समर्थ शिक्षकांची फळी उभी करावी लागेल. गुणवत्तेची प्रक्रिया क्रांतीने शक्य होत नाही, तर तिची उत्क्रांती होते. आपल्या शिक्षण पद्धतीचे व्यवस्थापन कमकुवत असल्याने व अध्यापनासाठी पोषक वातावरणाचा अभाव असल्यामुळे गुणवत्तापूर्ण शाळांची कमतरता भासत आहे. परीक्षाकेंद्री शिक्षण व्यवस्थेमुळे विद्यार्थी शिक्षणाच्या आनंदाला मुकला आहे.’’