मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या ‘आपले सरकार’ या वेबपोर्टलवर तक्रारींचा पाऊस पडत असून गेल्या २१ दिवसांत २३७९ तक्रारी करण्यात आल्या आहेत. रस्त्यांवरील खड्डे, ओबीसी शिष्यवृत्तीच्या प्रश्नांपासून शासकीय अधिकाऱ्यांनीही आपली बाजू मांडण्यासाठी या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या आहेत. मंत्रालय पातळीवरील तक्रारी करण्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली असली, तरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हाधिकारी पातळीवरील तक्रारी मोठय़ा प्रमाणावर आलेल्या आहेत.
जनतेच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांपर्यंत थेट याव्यात, यासाठी २६ जानेवारीपासून ‘आपलं सरकार’ ही सुविधा सुरू करण्यात आली. त्यामध्ये महसूल (१९२), शालेय शिक्षण (१४७), उच्च व तंत्रशिक्षण (१३२), नगरविकास (१५९) आणि ग्रामविकास (१३९) या खात्यांबाबतच्या तक्रारींची संख्या अधिक आहे. त्यापैकी ५१२ तक्रारींचे निराकरण करण्यात आले असून ८० टक्के तक्रारदार समाधानी असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे यांनी सांगितले.
काही तक्रारदारांनी प्रश्न उपस्थित केले, माहिती मागितली, काहींना आपली तक्रार कोणत्या खात्यासंबंधी आहे, याविषयीही माहिती नव्हती. त्यामुळे संबंधित खात्याकडे त्या तक्रारी पाठविण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कामे होत नसल्याच्या तक्रारीही आहेत. त्या संबंधितांकडे कारवाईसाठी पाठविण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांचे तक्रारीवर लक्ष आहे, हे समजून आल्याने तातडीने पावले टाकली जाणे अपेक्षित आहे.
मात्र ज्यांना इंटरनेट आणि संगणकाचा वापर करता येतो, त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. मंत्रालयात दररोज येणाऱ्या हजारो लोकांकडून निवेदने व तक्रारी दिल्या जातात. टपालानेही असंख्य तक्रारी येतात. त्या तक्रारी या संगणकीय प्रणालीत समाविष्ट करण्यात आल्या, तर त्यांचे निराकरण करणे अधिक सुलभ होणार आहे. त्यादृष्टीनेही भविष्यात विचार केला जाईल, असे संबंधितांनी स्पष्ट केले. मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी या तक्रारींचा आढावा घेण्यासाठी २० फेब्रुवारीला सचिवांची बैठकही बोलाविली आहे.

हेडलाइट फोडल्याची तक्रार
वाहतूक हवालदाराने गाडी उचलून नेताना हेडलाइट फोडल्याची तक्रारही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. ही तक्रार मुंबईतील एका नागरिकाची असून नो पार्किंगमधून गाडी उचलून नेणाऱ्या हवालदाराच्या निष्काळजीपणामुळे हेडलाइट फुटला व आर्थिक नुकसान झाले, अशी तक्रार करण्यात आली. ती गृह विभागामार्फत वाहतूक विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांकडे पाठविली गेली. नो पार्किंगमध्ये गाडी उभी केल्यास कारवाई करणे योग्य असले, तरी वाहनचालकाचे आर्थिक नुकसान केल्याने संबंधित हवालदाराची कानउघडणी करण्यात आल्याचे समजते.