विद्यार्थी व पालकांच्या मनात भीती निर्माण होते, असे कारण समोर करून परीक्षा केंद्रावर भरारी पथकाचा छापा किंवा विद्यार्थी निलंबनाची माहिती माध्यमांना देऊ नये, असे लिखित आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी, केंद्र संचालक व केंद्राधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळेच यावर्षी भरारी पथकाची स्थापना झाली असली तरी विद्यार्थी निलंबनाची माहिती देण्यास शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट नकार दिला.
बारावीची लेखी परीक्षा शनिवार, २१ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. राज्यातील सात हजार ९५४ कनिष्ठ महाविद्यालयांमधून १३ लाख ३९ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. यासाठी राज्यात २ हजार ३८९ परीक्षा केंद्रे आहेत. नागपूर विभागातून यंदा १ लाख ५७ हजार १३२, तर अमरावती विभागातून १ लाख २७ हजार विद्यार्थी परिक्षेला बसले आहेत. २६ मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार असून कॉपीचा सुळसुळाट रोखण्यासाठी भरारी पथकाची स्थापना केली आहे. या  पथकाने परीक्षा केंद्रावर छापा मारल्यानंतर विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. मात्र, विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईची माहिती माध्यमांना देण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश शिक्षणाधिकारी, केंद्र संचालक व परिरक्षक केंद्राधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. या काळात विद्यार्थी व त्याचे कुटुंबीय प्रचंड तणावात असतात. विद्यार्थ्यांवरील तणाव कमी करण्यासाठी म्हणून उत्साही व आनंदी वातावरणात परीक्षा व्हावी, या दृष्टिकोनातून मंडळाने प्रयत्न चालविले आहे.
त्याचाच एक भाग म्हणून भरारी पथकांनी मारलेल्या छाप्यांचे वृत्त माध्यमांपर्यंत पोहोचले आणि ते वृत्तपत्रात प्रकाशित झाले तर विद्यार्थी व पालकांवर त्याचा वाईट परिणाम होतो. प्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. एकदा का विद्यार्थी घाबरला तर मग त्याचे अभ्यासात मन लागत नाही. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी मंडळानेच हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच दहावी व बारावीचे विद्यार्थी वयाने अतिशय लहान असतात. या वयात त्यांचे नाव माध्यमात अतिशय बदनामीकारकरीत्या प्रकाशित होऊ नये, तसेच शिक्षण संस्था व संबंधित शाळेची बदनामी होऊ नये म्हणूनही हा निर्णय घेतला गेला असल्याची माहिती येथील शिक्षणाधिकारी रामदास पाटील यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.
नागपूर विभागात एकूण ६३ संवेदनशील परीक्षा केंद्रांचा समावेश असून त्यातील गोंदिया जिल्ह्यात १९, चंद्रपूर २० व गडचिरोलीत २४ केंद्र आहेत. यातील चंद्रपूर जिल्ह्यात कॉपी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी पाच भरारी पथकांची स्थापना मंडळाने केलेली आहे. हे पाचही भरारी पथके जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांना भेटी देतात आणि कॉपी सुरू असेल तर विद्यार्थ्यांवर कारवाई करतात, परंतु कारवाईची माहिती सरळ मंडळाच्या अधिकाऱ्यांनाच देण्यात यावी, असे आदेश आहेत. त्याच आदेशान्वये कामकाज सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, कारवाई करताना शेजारच्या विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून कडक भाषा वापरायची नाही, विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर त्रास होईल, असे वर्तन करायचे नाही, अशा खूप साऱ्या सूचना मंडळाकडून देण्यात आल्या आहेत. भरारी पथकांच्या कारवाईची संपूर्ण माहिती बोर्डाचे अध्यक्ष व सचिवांकडेच थेट देण्यात यावी, असेही निर्देश दिले असल्यामुळेच यावर्षी भरारी पथकांच्या बातम्या वृत्तपत्रात प्रकाशित होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
‘प्रश्नपत्रिका थेट व्हॉट्सअ‍ॅपवर’
विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अगोदर व केंद्र संचालक, परिरक्षक केंद्राधिकाऱ्यांच्या हाती ३० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका मिळत असून त्या थेट व्हॉट्सअ‍ॅपवर टाकल्या जात आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी केला. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे लेखी तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र संचालक व कोचिंग क्लासेसच्या संचालकांच्या संगनमतातून हे काम होत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. यात २० ते २५ गुणांचे ऑब्जेटिव्ह प्रश्न थेट विद्यार्थ्यांपर्यंत तात्काळ पोहोचविले जात आहेत. तेव्हा शिक्षणाधिकारी, केंद्र संचालक व परिरक्षक केंद्राधिकाऱ्यांना परीक्षा केंद्रावर मोबाईल घेऊन येण्यास बंदी करावी, अशीही मागणी त्यांनी मंडळाकडे केली असल्याचे लोकसत्ताशी बोलताना सांगितले.